Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

१२. शहाजीराजांनी जयरामकवीला "शतचंद्रं नभस्तलं" ही समस्या स्वत: घातली, राधामाधवविलास हा संस्कृत चंपू सहृदयतनेने ऐकिला व बारा भाषांत लिहिलेली पद्ये सरसतेने श्रवण केली. तोच प्रकार शहाजीचा पुत्र व शिवाजीचा वडीलभाऊ संभाजीराजा त्याने केला. तोच कित्ता शिवाजीराजाचा धाकटा भाऊ जो एकोजीराजा त्याने गिरविला आणि ह्या तिघांचे अनुकरण शहाजीचा रक्षापुत्र जो कोयाजीराजा त्यानेही संपादिले. तेव्हा प्रश्न असा उभा राहतो की, शहाजीचा पुत्र, संभाजीचा धाकटा भाऊ, आणि एकोजी व कोयाजी यांचा ज्येष्ठ बंधू जो प्रतिभासंपन्न शिवाजीराजा तोच तेवढा अक्षरशत्रू कसा निपजावा व डफसरकारादी लेखकांनी काय म्हणून अपगायिला जावा? सर्व बखरी लिहितात की, शिवाजीराज उच्चशिक्षित होता, ते अप्रमाण धरून व शिवाजीचे जे शत्रू त्यांची साक्ष प्रमाण
मानून सत्येतिहासाचे काम भागणार नाही. बखरकार शिवसमकालीन नव्हता म्हणून व शत्रुपक्षीय साक्षी कलुषित म्हणून त्यांचा पुरावा सध्या आपण बाजूस ठेवू आणि जयरामासारखा द्वादशभाषाप्रवीण शिवकालीन कवी काय म्हणतो ते पाहू. जयराम शिवाजीसंबंधाने खालील उद्गार काढितो :

"श्रीशाहराजात्मजतिलकस्य कलियुगसकलप्रबलयवनह्न
बलवनविदलनकरकलितकरवालोदितप्रतापदिनकरस्य
स्फुरणद्रुणगणयुतपंडितमंडलीमंडित कविवरविरचितप्रबंधह्न
सिंधुसमुद्रभूतशाश्वतनिष्कलंककीर्तिशीतकरस्य प्र ह्न
चंडक्ष्मापतिमंडलविजयसमासादितवसुवसुंधरादिकप्रदानप्र
मुद्रितयाचकजनस्तुतिवचनांनंदिताष्टदिग्जननिवहस्य
श्रीशिवराजस्य"

ह्या उद्गारातील स्फुरद्रुण इत्यादी पद लक्ष्य आहे. ह्या पदात जयराम स्पष्ट सांगतो की शिवराजाच्या ठायी अनेक गुणांचे वास्तव्य होते, त्याचा दरबारव्याप अनेक पंडितांनी सुशोभिलेला असे आणि त्याची निष्कलंक कीर्ति कवीवरांनी वर्णिलेली होती. प्रस्तुत चंपू शक १५७५ पासून शक १५८० पर्यंतच्या कालात क्रमाक्रमाने रचिला जात होता. ह्या सुमारास शिवाजींचे वय तिशीच्या घरात येत चालले होते आणि त्याने औरंगजेब, अदिलशाहा बेरीदशाहा व कुतुबशाहा इत्यादी प्रबल-दुर्बल यवनांच्या ताब्यातील काही मुलुख काबीज केला होता किंवा लुटला होता. तसेच अनेक मराठा सरदारास त्याने वठणीस आणिले होते. बापाप्रमाणे व आपल्या भावाप्रमाणे तो आपल्या दरबारात संस्कृत विद्वान व प्राकृत कवीवर बाळगीत असे व त्यांनी रचिलेले स्वत:च्या कीर्तीचे संस्कृतप्राकृत पवाडे तो सहृदयतेने ऐकत असे, म्हणजे त्यांनी रचिलेल्या संस्कृतप्राकृत पद्यांचा अर्थ कळण्याची पात्रता त्याच्या अंगी असे. जयरामाने केलेल्या शिवाजीच्या ह्या वर्णनावरून स्पष्टच झाले की शिवाजीला त्याच्या बापाप्रमाणे व भावाप्रमाणे संस्कृतप्राकृत भाषा येत होत्या. तेव्हा शिवाजीच्या संस्कृत प्राकृत ज्ञानासंबंधाने बखरीतून जी वर्णने उपलब्ध आहेत ती समकालीन पुराव्याने समर्थित झाल्यामुळे विश्वसनीय धरणे भाग आहे. ह्यावर अशी शंका आणिता येईल की, शिवाजीला संस्कृत प्राकृत भाषाज्ञान असू शकेल, परंतु हे ज्ञान अक्षरओळख असल्यावाचूनही असू शकण्याचा संभव आहे. ह्या शंकेचा अर्थ असा होतो की, शिवाजी विद्यासंपन्न होता, फक्त ती विद्या त्याने तैलबुद्धीच्या एखाद्या जन्मांधाप्रमाणे कर्णोपकर्णी मिळविलेली होती, स्वत: लिहून व वाचून त्याने ती कमाविलेली नव्हती.