प्रस्तावना

८. पुढे एके दिवशी कोण्या खिजमतगाराने तेल लावलेली नागवी तरवार अवलोकनार्थ राजापुढे आणली तिचे वर्णन कवीने मोठे हृदयंगम केले. तसेच राजाच्या घोड्याचेही वर्णन कवीने असेच बहारीचे केले. तेव्हा खुश होऊन राजाने कवीस तो घोडा बक्षीस दिला व हुकूम केला की, तुम्ही या घोड्यावर बसून आमचे बरोबर स्वारीशिकारीस येत जावे. त्याप्रमाणे एक दिवस राजा स्वारीस निघाला. तेव्हा कवीने सैन्याचे वर्णन केले. इतक्यात शत्रू पश्चिम पर्वताच्या पलीकडे दूर पळून गेले अशी बातमी आली. मग लढाईचे कूच बंद करून राजाने शिकारीत व कवीच्या काव्यालापात काही काळ घालविला. इतक्यात श्रावणी पौर्णिमा आली व छावणीत रक्षाबंधनोत्सव मोठ्या थाटाने झाला. उत्सवाच्या गौरवार्थ कवीने काही पद्ये म्हटली. त्यात एका पद्यात असे वर्णन केले की, राजा, मागे निजामशाहा व त्याचे भाऊबंद यांना आपण हाती धरलेत, त्या निजामशाहाचे छत्र राखडीच्या रूपाने आपल्या मनगटावर झळकत आहे. एकदा मलयाचलाच्या खो-यातील पुंडपाळेगारांनी सैन्याचा रस्ता अडविला असे कळल्यावरून त्यांच्यावर शहाजीने फौज पाठविली. मारलेल्या पुंडांची हजारो मुंडकी शिपायांनी शहाजीपुढे आणून रचिली. ती गावोगाव झाडांना टांगण्याचा राजाने हुकूम केला. त्यावर कवीने पद्य केले. त्याचा मतलब असा की, राजा, तुझ्या ह्या कृतीने ह्या प्रांतातील सर्वच झाडे नारळाची झाडे झाली! येथे शहाजीराजाने तैमूरलंगाचा कित्ता उचलला व स्तुतिपाठक कवीने बीभत्स व हास्य रसांचा प्रांत कधी कधी सन्निकट असतो हे दाखविण्यात शेक्सपीयरवर ताण केली, असे कोण म्हणणार नाही? काही महिन्यांनी दक्षिण कर्नाटकातील पुरंदर किल्ला सर केल्याची बातमी आली. तेव्हा कवीने पुरंदराच्या माथ्यावर आपले गडकरी स्थापणा-या शहाजीची श्रेष्ठता पुरंदरपद प्राप्त करून घेऊ इच्छिणा-या धर्मराजाहून वरचढ सहजच वर्णिली. यानंतर काहीक दिवसांनी विद्यानगर ऊर्फ विजयानगर ऊर्फ हंपी व कनकगिरी घेतल्याची खबर आली. त्यावरून कवीला जी काव्यस्फूर्ती झाली ती प्रस्तुत चंपूत नमूद आहे. एकदा शहाजीराजांच्या समोर आखाड्यात दोन मल्ल खड्गयुद्ध करता करता तरवारी फेकून देऊन आवेशाच्या भरात त्वेषाने एकमेकांना ठोसे लगावू लागले. त्याच सुमारास दुस-या बाजूस सभेत चर्चा करता करता क्रोध चढून दोन पंडित एकमेकांना शिव्या देऊ लागले. हा चमत्कार पाहून राजाला हसू आले. त्यावर जयरामकवीने विदुषकाकडून अशी उक्ती काढविली की, परस्परांस झोंबणारे भट व परस्परांस शिव्या देणारे भट्ट यातून श्रेष्ठ कोण हे पाहू जाता नि:संशय भट्टाहून भट उच्चारात ऱ्हस्व असूनही शहाणपणात अधिक दीर्घ आहेत यात संशय नाही. शहाजीराजांना गोवर्धनाचार्यकृत सुप्रसिद्ध आर्या फार आवडत. तेव्हा राजाच्या सांगण्यावरून हुबेहूब गोवर्धनाच्या आर्येसारख्या आर्या जयरामकवीने रचून दाखविल्या व शाबासकी मिळविली. एकदा चंद्रावर कविता बनवा म्हणून राजाने कवीवर्याला सांगितले असता त्याने अशी उत्प्रेक्षा केली की एकाच लक्षणाने लक्षित असा जो चंद्र त्याची लोक निंदा करतात ते योग्यच आहे, परंतु बत्तीस लक्षणांनी युक्त जे आपण त्यांची लोक स्तुती करतात, हे विचित्र नव्हे काय? येणेप्रमाणे काव्यशास्त्रविनोदाने धीमान शहाजीमहाराजाचा फुरसतीचा काळ कसा जात असे ते कवीने आठव्या उल्लासात वर्णिले आहे