Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
४. काव्याच्या कर्त्याचे नाव जयराम, आडनाव पिंड्ये, गोत्र जामदग्निवत्स. प्रस्तुत चंपूत कवी स्वत: ही माहिती सांगतो.
॥ जामदग्नि र्वत्सगोत्रसंभव: पिंड्योपनामको जयरामो नाम कवि:॥
सप्तशृंगीच्या समोरील मार्कंड्याच्या डोंगराखाली ह्या कवीचे गाव होते. गावाचे नाव कवीने दिले नाही. कवीच्या आईचे नाव गंगाबा व बापाचे नाव गंभीरराव. मार्कंडेय पर्वतापासून अहिवंत पर्वतापर्यंत जे सात किल्ले आहेत त्यांचे अध्यक्षत्व म्हणजे किल्लेदारी या गंभीररावाकडे होती. अहमदनगरच्या बहिरीनिजामशाहाच्या राज्याचे पुनरुज्जीवन शाहाजी आपल्या पूर्ववयात करीत असता ह्या गंभीररावाशी त्याचा सहजच परिचय झालेला होता.
॥ मार्कंडेयाहिवंतादिसप्तपर्वताध्यक्षतां अविरतं वितन्यमानो
गंभरराय इत्यभिधाप्रसिद्ध: स्वामिभि र्नयनपथं नीत: भविष्यति ॥
॥ चंडीपर्वतपुरतो मार्कंडेयोस्ति पर्वतो विपुल:।
तत्रोद्भवेन जयरामेण ॥
नाशिक प्रांतातील हे पिंड्यांचे घराणे भोसल्यांच्या ऐकून माहितीचे व परिचयाचे असल्यामुळे शहाजीराजांनी कर्नाटकात बंगळूरप्रांती राज्यस्थापना केल्यावर आश्रयार्थ हा मार्कंडेय पर्वतनिवासी जयराम कवी त्या प्रांती गेला. कर्नाटकातून भाट लोक रजपुतस्थानात जाण्यास परतत, त्यांच्या मुखातून शहाजीचे औदार्य ऐकून जयरामाच्या हृदयात शहाजीराजांच्या दर्शनाची लालसा उत्पन्न झाली. नाना देशचे शेकडो पंडित व कवी शहाजीच्या दर्शनास जातात व परिपूर्णमनोरथ होऊन स्वदेशी सुखाने आयु:क्रमण करतात, अशी कीर्ति सर्वत्र भरतखंडभर महाराजांची पसरली होती. त्या कीर्तीची प्रतीति पाहण्याची उत्कंठा ह्या सरस्वतीपुत्राच्या मनात अंकुरित होऊन, श्रीची आराधना करण्याचा संकल्प त्याने केला. जयरामकवी जातीचा बुद्धिमान होता. तशात त्याला सिद्धी प्राप्त झाली होती असेही तो म्हणतो. ज्योतिष्मती ऊर्फ कांगोणी म्हणून एक वनस्पती सह्याद्रीत सडकून सापडते. तिचा तैलकल्प सेवन केला असता, विशेषत: सूर्यपर्वी केला असता, ब्रह्मांडभ्रमणाचा आवाज ऐकू येऊ लागतो. असे महान महान भिषग्वर्यांचे सांगणे आहे. पृथ्वी व इतर गोल अवकाशात भिंग-याप्रमाणे परिभ्र ण करीत असता जो महान ध्वनी उत्पन्न होत असतो तो सामान्य जनांच्या कानास गोचर होत नाही. तो ध्वनी ज्योतिष्मतीकल्प सेवनाने ऐकू येऊ लागतो. हा कल्प इतका तीव्र आहे की कोट्यवधी मनुष्यांतून एखाद्यालाच हा सहन होतो. अशा अपवादक व्यक्तीच्या पंक्तीस बसण्याचा हक्क सांगणारा जयराम केवळ संस्कृत किंवा केवळ मराठी अशा एखाद्या भाषेतच रचना करणारा तुटपुंजा भाषाकोविद नव्हता, तर भरतखंडातील मुख्य मुख्य दोन चार नव्हेत तर तब्बल बारा भाषांचा परामर्श घेणारा अनेकभाषाधुरंधर होता.