[६]                                                                                  श्री.                                                                          १६ जून १७९५. 

विज्ञापना ऐसीजे. राजे रेणूरावजी दुसरे वेळेस आले. रघोत्तम रावही बरोबर होते. ह्मणूं लागले कीं, हजरतीनीं सांगितलें आहे कीं, गोविंदराव यांशीं माझें बोलणें खरड्यावर आहे कीं, आह्माकडील जुजवियातचे फडचे करून द्यावे व तसाच भोसले याजकडील फडच्या व शिंदे याजकडून तमसुका- प्रमाणें ऐवज मजुरा येणें आणि तालुक्याचा ऐवज जप्तींत घेतला असेल तो इत्यादिक बाबती याचा फडच्या कसा करतां ? रुजुवात हिशेब आदवनीचा पाहून त्यांत कापड व होन वगैरे संप्रदायाप्रमाणें घ्यावें. याचें उत्तर त्यास दिलें जे, जुन वियात तुह्याकडील काय असेल ती काढावी, त्याचे जाबसाल करण्यांत येतील, वाजवीस गुंता नाहीं, भोसले याजकडील लढा तुह्माकडे असेल तो उलगडा करावा, त्याजकडे असेल त्याचा ते करितील. पुढें एक रकम निर्वेध करावयासी येईल, चिंता नाहीं, शिंदे याजकडील ऐवज येणें ह्मणतां तो आह्मांस ठाऊक नाहीं; तुह्मी कशाकरितां ऐवज दिला असेल तो तुमचा तुह्मांस ठाऊक. हा जाबसाल आह्माकडे नाहीं. याविषयीं नवाबांनीं सांगितलें हांतें खरें; परंतु मदारुल महायांनीं याचें उत्तर असें सांगितलें, जप्ती तुमच्या लढाईमुळें झाली, सलाह ठरली तोपावेतों जे जिकडील गेले ते गेले, याविशीं दुतर्फाही बोलूं नये. तेव्हां रेणूरावजी बेलिले कीं, पूर्वीं श्रीमंतांचे बोलण्यांत आहे कीं, फौजा पाठवून मामलत उगवूं, त्यास फौजा पाठवून जप्ती केली, ऐवज घेतला, तो मामलतींत मजुरा पडावा असें बोलण्यांत आहे. मी ह्मटलें, खरें आहे, याविषयीं तुह्मासी श्रीमंत बोलले; तुह्मीही नवाबांस लिहिलें होतें, त्यांत काय आहे जे मामलत उगविण्यास फौजा पाठवूं. परंतु नवाबांशीं आमचा दुसरा प्रकार लढाईचा नाहीं; मामलत उगविणें प्राप्त, याप्रमाणें बोलण्यांत आहे. तसेंच झालें असतें ह्मणजे ठीकच होतें. जप्तींत ऐवज आला हा मामलतींत मजुरा देतो. ती गोष्ट मार्गाची होती, ते हजरतीकडून न घडतां बिघाडाची करून लढाई दरपेष करून आह्मांत नेक नाबूद करावयाचा इरादा केला, तेव्हां बाकी काय राहिली, बोलावयास जागा होती कीं काय ? लढाईतील गोष्ट लढाईंत राहिली, त्याचा जिकीर आतां कशास पाहिजे? तेव्हां मध्यें एक गोष्ट बोलिले कीं, किस्तीचे ऐवजाचे भरण्याचें साधन आह्मी नवाबापाशीं बोलत असतां मीरअल्लमानीं मध्येंच घोडें घालूं लागले जे जप्तीचा ऐवज आणि बाद,मीचे स्वारीचा ऐवज काढला असतां फार निघेल.