[५]                                                                                               श्री.

विज्ञापना ऐसीजे. राजे रेणूराव मीर अलम याचे घरीं गेले होते. तेथून रघोत्तमरावसुद्धां माझे येथें आले. पूर्व स्नेहावर, बोलणें. शिष्टाचार होऊन गेले. मागती दुसरे वेळेस आले. वर्तमान ऐकण्यांत आलें. मीर अल्लम यास बोलले कीं, अजून तुमचे येथील बंदोबस्त पाहिजे तसा झाला नाहीं, इंग्रजाकडील जाबसाल अद्यापि खचित समजला नाहीं, इतक्यांत तुह्मीं अथवा हजरतीनीं त्यास नाखुष करणें सलाह नाहीं, पागावाले वगैरेशीं पूर्वींपासून स्नेह, त्याची नालिष करणें ठीक नाहीं. याचें उत्तर रघोत्तमराव आणि रेणूराव यांनीं केलें कीं, प्रथम कडू वाटल्यास वाटो, त्याचा कदम आतांच आंत शिरल्यास पुढें कठिण पडेल, यास्तव आतांच ठेंचून राखणें, याजकरितां नवाबास समजावून केलें तें ठीकच, आमचें लगामीं लागल्यावर नीट करूं. याप्रमाणें त्याचे घरीं बोलणें झालें. आमचे येथें आलें. मींही शिष्टाचार केला कीं, आह्मीं जे आहों तेच आहों, तुह्मीं आमचे इष्ट, ज्यांत तुह्मांस चांगलें अणि दोही दौलतीची बेहबूद असावी, त्याविषयी प्रयत्न ईश्वरें सफल केला. तुह्माकडूनही असेंच असावें, पूर्वींपेक्षां नवाबाची कृपा तुमचे येणें झाल्या. वर आह्मावर अधिक असावी, एवढ्याविषयीं विपरीत दृष्टीस पडतें हें आश्चर्य आहे, असो, आह्मांकडून तर कांहीं कसूर नाहीं, ब्राह्मण मंडळी तुह्मां व्यतिरिक्त दुसरी कोणी येथें नाहीं, तुमचे इष्टतासारखें इष्टत्वही नाहीं, या स्थळीं आह्मांस तुह्मीं एकच दिसता, सुखादुःखाचे सोबती पूर्वीं होता तसेंच असावें हें योग्य, तुमचे योग्यतेची वृद्धि असावी याचा आह्मांस किती संतोष याचा बयान नलगे, श्रीमंतांची कृपा संपादून घेतली त्याची वृद्धि होय असें करावें, राजश्री नानानीं बहुत ममतेनें खुणे ची गोष्ट सांगितली आहे कीं, राजे रेणूरावजी यास सावध करीत जावें, त्यांचे समतेची जात मनांत वागत जावी. इत्यादिक बहुत भाषण झालें. याचें उत्तर कांहीं संकोचित होऊन केलें :- मीर अल्लम खबासींत बसत होता, तो काय बोलला असेल न कळे, मला कांहीं ठाऊक नाहीं, मजकडून कांहीं अंतर झालें नाहीं, असें टाळाटाळ करूं न जाणों. सारांश, काम मोठें, हौसक थोडा, कसेंहीकरून पेष आमद करावी ह्मणून. बोलावयास जातात.पत कोणते गोष्टींत राहील याविषयी समज नाहीं. दैवाची गोष्ट. अलाहिदा कसें असलें तरी निमतें. याप्रमाणें चाल आहे. दुसरे वळेस आले त्याचा तपशील अलाहिदा लिहिला असे. रा। छ २८ जिलकाद. हे विज्ञापना.