Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

बखरनविसांनीं दिलेल्या रमलशास्रातील श्लोकांत "अर्कबाणे" म्हणजे ५१२ हा आकडा शालिवाहन शकांतील व हिजरी सनांतील त्या वेळचें अंतर दाखवितों. श्लोक बखरकारांनीं दिला आहे त्याप्रमाणेंच जर मुळांत असेल तर बखरकारांना अर्कबाणे ह्या पदापासून कोणत्या अर्थाची निष्पत्ती होते व हे पद कोणत्या विधानासंबंधानें कोणीं प्रथम उपयोजिलें ही गोष्ट बिलकुल माहीत नव्हती असें दिसतें. बखरनविसांनीं दिलेला श्लोक बहुत अशुद्ध आहे. तेव्हां मूळ श्लोक कसा असेल ते ठाम सांगतां येत नाहीं. परंतु एवढें मात्र विधान निश्चयानें करितां येतें कीं, हा श्लोक रमलशास्त्राच्या ज्या ग्रंथावरून घेतला तो ग्रंथ शालिवाहन शक व हिजरी सन ह्यांत ५१२ अंतर जेव्हां होतें तेव्हां केव्हां तरी लिहिला गेला असावा. बखरनविसांनीं दिलेल्या श्लोकाची पहिली ओळ-
अर्कबाणविहीने च शालिवाहनके शके ।

अशी असावी असा तर्क आहे. ह्या पहिल्या ओळीच्या व "पैगंबरादि विख्याताः" वगैरे दुस-या ओळीच्या मध्यें दोन ओळी मूळांत आणखी असाव्या असें वाटतें. शकांत ५१२ वजा केले म्हणजे हिजरी सन येतो व त्या हिजरीच्या प्रारंभी पैगंबर वगैरेंचा उदय झाला; अशा अर्थाचा मजकूर त्या दोन ओळींत असावा. ह्यामधील दोन ओळी गहाळ झाल्यामुळें मूळ यादीकारांना व बखरकारांना आडनीड राहिलेल्या बाकीच्या दोन ओळींचा अर्थ बराबर लागत नाहीं. त्यामुळें त्यांच्या हातून वर सांगितलेली चूक झाली व पिठोराचा पराभव शके ५१२ त झाला असें वाटून पुढील बाराशें वर्षांचा हिशोब मुसलमान पादशहांची कशी तरी याद देऊन चुकता करून टाकावा लागला. ह्या ५१२ च्या प्रकरणावरून एक विचार सुचतो. तो हा कीं, बखरी छापणा-यांनीं बखरींचे मूळ, एक कानामात्राहि न सोडून देतां, जशाचें तसेंच छापून काढावें व मुळाशीं ताडून पाहण्यास दुस-या आणीक प्रती मिळाल्यास त्यांतील पाठभेद मोठ्या काळजीनें द्यावे. एकादे वेळीं एकादें पाठान्तर असें असूं शकेल कीं, त्याच्या आधारावर आजपर्यंत ध्यानींमनींहि नसतील अशा शंका उद्भवतील व त्या शंकांच्या निरसनार्थ शोधकांचे प्रयत्न जारीनें सुरू होतील. कीर्तन्यांनीं छापिलेली मल्हाररामरावाची बखर वाचतांना ह्या ५१२ बद्दल मला शंका आली होती, परंतु त्या बखरींत असणा-या इतर चुकांप्रमाणें हीहि संपादकाच्या हलगर्जीपणाची चूक असेल असें त्या वेळीं मला वाटलें. परंतु पुढें शके १८१७ त बडोदें येथें छापिलेल्या शिवदिग्विजयांतहि ५१२ हा आकडा जेव्हां पाहिला व तो मजजवळ असलेल्या यादींतूनहि जेव्हां आढळला, तेव्हां ५१२ हा आंकडा संपादकाच्या नजरचुकीनें आला नसून तो १७ व्या शतकांतील यादीकारांना व त्या यादी वाचणा-यांनाहि खरा वाटत होता असें मला दिसलें व बखरींतून ५१२ आकडा कसा आला ह्याचा वर दाखविल्याप्रमाणें खुलासा करण्याचा प्रयत्न करावा अशी आवश्यकता भासली.

बखरनविसांनीं ज्या यादींवरून ५१२ हा आंकडा उतरून घेतला त्या यादी रमलशास्त्राच्या ग्रंथाच्या समकालीन म्हणजे शके १५९० च्या सुमाराच्या असाव्या. ५१२ चा उल्लेख ज्यांत केला आहे अशा यादींपैकीं मजजवळ एक याद आहे; तींत (१) युगसंख्येची याद, (२) हस्तनापुरच्या राजाची याद, (३) मुसलमान पादशहांची याद, (४) साधुसंतांची याद व (५) हेमाडपंथी बखर अशीं पाच प्रकरणें दिलीं आहेत. ह्या यादींत तालीकोटची लढाई शके १४८६ वैशाख वद्य १० इंदुवारीं म्हणजे ६ मे १५६४ त झाली म्हणून लिहिलें आहे. ह्या यादीवरून असें अनुमान करावें लागतें कीं, शके १५९० च्या सुमारास म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळेस महाराष्ट्रांत बखरी लिहिण्याचा व अर्थात् वाचण्याचा प्रघात जारीनें चालू होता. तालिकोटच्या लढाईची तीथ दिली आहे. त्यावरून यादवांच्या पुढें झालेल्या दक्षिणेंतील मुसलमान पातशहांच्या बखरी त्या वेळीं लिहिल्या गेल्या असाव्या. ह्या यादींत विजयनगर येथें राज्य करणा-या किरीटी रामराजाचें नांव दिलें आहे त्यावरून असें वाटतें कीं, विजयानगर अथवा अनागोंदी येथील राजांचाहि इतिहास त्या वेळीं महाराष्ट्रांत महशूर होता. सारांश, दिल्लीच्या पातशहांचा, राजपुतान्यांतील रजपुतांचा, दक्षिणेंतील पातशहांचा व अनागोंदी येथील राजांचा इतिहास शिवाजीच्या वेळीं महाराष्ट्रांत बखरींच्या रूपानें माहीत होता असें यादींतील उल्लेखांवरून निःसंशय ठरतें. शिवाजीच्या वेळच्या ह्या बखरी पुढें मागें सांपडण्याचा किंचित् संभव आहे.