Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

महाराष्ट्रांतील जुन्नर प्रांतावर राज्य करणा-या नहपान क्षत्रपानें खहराट असा किताब धारण केला. शिलालेखांतील नहपान या शब्दाच्या अगोदर येणा-या खहराट ह्या शब्दाचा अर्थ अद्यापपर्यंत कोणीं दिलेला नाहीं. माझ्या मतें षाहराट ह्या शब्दाचा अपभ्रंश षच्या बद्दल ख घेऊन खहराट असा झालेला असावा. षाहराट म्हणजे रट्टांचा राजा, रट्ट म्हणजे मराठे. षाहजहान ह्या शब्दाप्रमाणें षाहराट ह्या शब्दांतील षष्ठीच्या ईचा लोप होऊन षाह व रट्ट ह्या दोन शब्दांचा समास झालेला आहे. पैठण येथील आंध्रांना हिणवावयाकरितां खहराट हा किताब नहपातानें घेतलेला असावा. अथवा आंध्रांच्या शातकर्णी या बिरुदाप्रमाणें नहपानानें खहराट हें आपलें बिरुद केलें असावें. खहरट नहपान हा, शक किंवा पल्हव कुलांतील असावा, असे डॉ. भांडारकर यांचें म्हणणें आहे. नहपान शक असो किंवा पल्हव असो, क्षत्रपांचें राज्य महाराष्ट्रांत आंध्र म्हणजे शातवाहन राज्यांच्या वेळीं कांहीं काळपर्यंत होतें हें स्पष्ट आहे. म्हणजे शुद्ध मराठी राजांच्या अमलाखालीं महाराष्ट्र आतांप्रमाणें त्यावेळींहि म्हणजे अठराशें वर्षांपूर्वीहि नव्हतें असा सिद्धान्त निघतो. आंध्रांच्या व क्षत्रपांच्या दोघांच्याहि पदरीं मोठमोठे ब्राह्मण मुत्सद्दी व मराठे सरदार असावे असें नाणे घाटांतील श्री शातकर्णीच्या लेखांतील मराठा वीरांच्या उल्लेखावरून व जुन्नर येथील नहपानाच्या लेखांतील अय्यमाच्या उल्लेखावरून, दिसतें. आंध्र राजे शूद्र असून द्रविड शाखेंतील असतांहि व क्षत्रप तर बोलून चालून परदेशीय असतांहि, त्यांचीं शासनें ज्या अर्थीं संस्कृतप्राकृतमिश्रित अशा भाषेंत आहेत त्या अर्थीं त्यावेळीं जिंकणारे जिंकलेल्यांचीच भाषा वापरीत असत व जिंकलेल्यांची भाषा संस्कृतप्राकृतमिश्र अशी असे हें उघड आहे. आंध्रांना व क्षत्रपांना दोघांनाहि गोब्राह्मणांचा व श्रमणकभिक्षूंचा समाचार सारखाच घ्यावासा वाटे. गौतमीपुत्र, वाशिष्टिपुत्र, माद्रीपुत्र, हारीतीपुत्र अशीं नांवें आंध्रराजांनीं लाविली असल्यामुळें स्त्रियांचें प्राधान्य आंध्रकुलांत विशेष असे व बापाचें नांव न लावितां आईचें नांव आंध्र लोक लावीत, असें स्पष्ट दिसतें. ह्या सर्व गोष्टी आंध्र व क्षत्रप राजांसंबंधी झाल्या. खुद्द मराठ्यांच्या संबंधीं माहिती म्हटली तर, ह्या शिलालेखांतून अनुमानानेंहि काढण्यासारखीं अशीं फारच स्वल्प आहेत; कदाचित् मुळींच नाहींत. इ. स. पूर्वी एक शतकापासून तों इसवी सनानंतर दोन शतकांपर्यंत शातवाहनकुलांतील राजांनीं महाराष्ट्रांत व तेलंगणांत राज्य केल्याचे दाखले पुराणांतून, शिलालेखांतून व नाण्यांतून सांपडतात. ह्यावरून एवढें सिद्ध आहे कीं, शालिवाहनांच्या नांवानें जो शक सध्यां प्रचारांत आहे, त्याचा प्रारंभ शातवाहन कुलांतील राजे राज्य करूं लागल्यापासून झाला नाही. आपल्याला माहित असलेल्या शातवाहन कुलांतील मधल्या एका राजानें म्हणजे इ. स. ७८ त राज्य करणा-या एकाद्या शातवाहन राजानेंहि हा शक सुरू केला नाहीं. कां कीं, नाशिक येथील गौतमीपुत्र शातकर्णी व पुलुयामी ह्यांच्या शिलालेखांत पुलामायींच्या राज्याभिषेकापासून झालेल्या वर्षांचे आंकडे दिलेले आहेत व शकांचे आंकडे दिलेले नाहींत. म्हणजे शातवाहनांच्या अमदानींत वर्षांची गणना शकानें होत नसे हें उघड आहे. नहपानाचा जांवई जो उषवदात त्याच्या शिलालेखांत वर्षांची गणना शकानें केली आहे, असें पौराणिकांचें मत आहे. त्यावरून असें म्हणणें भाग पडतें कीं, वर्षाची गणना क्षत्रप राजे शकानें करीत व आंध्र राजे मोगल राजांप्रमाणें किंवा शिवाजीप्रमाणें स्वतःच्या राज्यारोहणापासून करीत. शकानें वर्षें मोजण्याचा प्रघात ज्या अर्थी शातवाहन राजांचा नसें त्या अर्थीं शातवाहनानें विक्रमाला जिंकून दक्षिणेंत शातवाहन शक सुरू केला व नर्मदेच्या उत्तरेस विक्रम संवत् चालता राहिला वगैरे दंतकथा शके १२२ पर्यंत म्हणजे इ.स. २०० वर्षेपर्यंत राज्य करणा-या शातवाहनांच्या संबंधानें तरी निराधार आहेत असें म्हणावें लागतें. महाराष्ट्रांतील पुरातन कालचें मोठें शहर जें पैठण, तेथील मराठे राजे जे शातवाहन अथवा शालिवाहन त्यांनीं दक्षिणेंत आपला शक सुरू केला असा जो अभिमान बखरनविसांच्या लिहिण्यांत व कित्येकांच्या बोलण्यांत दिसून येतो, तो केवळ भ्रामक व निराधार आहे, हें वरील विवरणावरून ध्यानांत येईल. क्षिप्रकापासून पुलोमार्चिषापर्यंत आंध्रराजांची वंशावळ विष्णुपुराणांत दिली आहे. शिवदिग्विजयांत क्षिप्रकापासून इवीलकापर्यंत आंध्रकुल राज्य करीत होतें असें सांगून नंतर हलापासून पुलोमार्चिषापर्यंत विक्रमाच्या वंशांतील राजांनीं राज्य केलें म्हणून म्हटलें आहे व नंतर शालिवाहन राजाचा शक सुरू झाला म्हणून स्पष्टीकरण केलें आहे. परंतु इसवी सनापूर्वी एक शतक व नंतर दोन शतकें आंध्रराजे राज्य करीत होते असे डॉ. भांडारकरांच्या दक्षिणच्या इतिहासावरून (१८८४) किंवा पुलमायी वाशिष्टी पुत्रानें शके ५७ पासून शके ८५ पर्यंत व श्रीयज्ञयातकर्णी गौतमीपुत्रानें शके १०० पासून १२२ पर्यंत राज्य केलें असें धरून शेवटल्या पुलमायीनें सुमारें शके २२२ पर्यंत राज्य केलें असें धरल्यास इ. सना नंतर तीन शतकें आंध्रराजे राज्य करीत होते असें मि. व्ही. ए. स्मिथ यांच्या म्हणण्यावरून (In Antiquary for Feb. 1889) बखरकाराचें स्पष्टीकरण चुकलें आहे असें म्हणावें लागतें. शकाच्या प्रारंभापासून शालिवाहनाचें राज्य दक्षिणेंत सुरू झाले हें मत आज कित्येक शतकें ह्या देशांत प्रचलित झालें आहे, ही गोष्ट लक्ष्यांत घेतली तर, बखरनविसानें केलेली चूक मोठी आश्चर्यजनक आहे असें वाटण्याचें कांहींएक कारण नाहीं. हलापासून पुलोमार्चिषांपर्यंतचें राजे विक्रमाच्या वंशांतील होते ही माहिती शिवदिग्विजयाच्या कर्त्यानें कोठून आणिली असेल तें कळत नाहीं.