Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

मल्हार रामराव चिटणीसकृत शिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र १७३२ त लिहिलें गेलें. शाहू छत्रपती यांनीं राज्याभिषेक १३७ प्रमोदीनाम संवत्सरे ज्येष्ठ बहुल षष्ठी भृगुवासरीं हें चरित्र तयार करण्यास आज्ञा केली, असें मल्हार रामराव बखरीच्या प्रारंभीं लिहितो. परंतु दुसरे शाहू छत्रपती इ. स. १८०८ च्या मे महिन्याच्या ४ थ्या तारखेस वारले. शके १७३० वैशाख शु॥ ९ बुधवार व चरित्र लिहिण्यास आज्ञा ८ जून १८१० सालीं शके १७३२ ज्येष्ठ शु॥ ६ शुक्रवार झाली हीं दोन विधानें विसंगत आहेत. मल्हार रामरावानें असलें हें विधान कसें केलें याचें आश्चर्य वाटतें व ह्या हलगर्जीपणावरून त्याच्या ऐतिहासिक प्रामाण्याविषयीं मन साशंक होतें. चरित्र केव्हां संपविलें तें बखरींत कोठें लिहिलेलें नाहीं. हें चरित्र ग्रांट् डफ् नें पाहिलें होतें. विष्णुपुराण, दंडनीति, राजधर्म, राजमयूख, रमलशास्त्र, वडिलार्जित कारकीर्दी, दिनचर्या, वगैरे पाहून चिटणिसांनीं आपली बखर सजविली. वडिलार्जित कारकीर्दी, दीनचर्या, शिवाजीनें पाठविलेलीं व शिवाजीला आलेलीं अस्सल पत्रें व नकला ह्यांचा उपयोग मल्हार रामरावानें केला होता. परंतु सामुग्रीच्या महत्त्वाच्या मानानें मल्हाररावानें शिवछत्रपतींचें चरित्र मोठें नामांकित लिहिलें आहे असें नाहीं. ह्याचें कारण, महाराष्ट्रांतील त्या वेळच्या विद्येचें मान होय. प्रमाण काय, अप्रमाण काय, मिळालेल्या साधनांचा यथास्थित, चोख व साद्यंत उपयोग कसा करून घ्यावा व कां करून घ्यावा वगैरे गोष्टींच्या अज्ञानामुळें, मल्हार रामरावाचें चरित्र जसें वठावें तसें वठलें नाहीं. ग्रांट डफ मल्हाररावाच्या चरित्राला Voluminous म्हणून विशेषण देतो. परंतु माझ्या मतें हें चरित्र बरेंच त्रोटक आहे. अशी जरी या चरित्राची योग्यता आहे, तरी ग्रांट डफच्या ग्रंथांतहि न सांपडणा-या अशा कांहीं गोष्टी मल्हाररावाच्या चरित्रांत सांपडतात. मल्हाररावांच्या जवळ असलेल्या कारकीर्दी, दिनचर्या व पत्रें बोरगांवीं त्यांच्या वंशजांजवळ थोडींबहुत आहेत. तीं तपासून त्यांचा उपयोग पुन्हां करून घेतला पाहिजे. सातारा जिल्ह्यांत राहणा-या छत्रपतींच्या अष्टप्रधानांकडून मल्हाररावानें बरींच पत्रें व टिपणें मिळविलीं होतीं, असें बोरगांव येथील चिटणिसांच्या तोंडून कळतें. मल्हार रामराव चिटणीसकृत चरित्राचा इतिहासकाराला बराच उपयोग होईल ह्यांत संशय नाहीं. निदान ह्या चरित्रापासून नाना प्रकारच्या शंका घेण्यास अवकाश होईल हें खास आहे.

शिवदिग्विजय नांवाची बडोदें येथें छापिलेली बखर शके १७४० त लिहिली आहे. ह्या बखरीच्या पहिल्या पृष्ठावरील शके १६४० बहुधान्यनाम संवत्सर व संवत् १७७५ विरोधीनाम संवत्सर ह्याबद्दल अनुक्रमें शके १७४० विरोधीनाम संवत्सर व संवत् १८७५ बहुधान्यनाम संवत्सर असें पाहिजे आहे. तिस-या पृष्ठावरील संवत् १७७५ व शके १६४० ह्याबद्दल संवत् १८७५ व शके १७४० असें पाहिजे आहे; चवथ्या पृष्ठावरील १८७० बद्दल संवत् १८७५ पाहिजे; व पांचव्या पृष्ठावरील शके १६४० बद्दल शके १७४० पाहिजे; म्हणजे कलिवर्ष ४९१९ त शक १७४० संवत् १८७५ व फसली १२२८ बरोबर येतात. प्रसिद्ध ज्योतिर्विद रा. शंकर बाळकृष्ण दीक्षित ह्यांनीं ही चूक, ही बखर छापिली त्या वेळीं दाखवून दिली होंती. ज्या अर्थी ही बखर शके १७४० त लिहिली आहे त्या अर्थी तिचें कर्तृत्व वरपांगी तरी खंडो बल्लाळ चिटणीस यांजकडे जात नाहीं हें उघड आहे. चिटणीसांच्या बडोदें येथील घराण्यापैकीं कोणी तरी ही बखर लिहिली असावी असा अंदाज आहे, किंवा लिहिली असें म्हणण्याच्या ऐवजीं उतरून किंवा नक्कल करून किंवा जुळवाजुळव करून घेतली असेंहि म्हटलें तरी चालण्यासारखें आहे कां कीं, ह्या बखरींतील भाषा रा. नंदुरबारकर व रा. दांडेकर म्हणतात त्याप्रमाणें, शके १७४० तल्या सारखी बिलकुल दिसत नसून तिजवर अठराव्या शतकाच्या पूर्वार्धाची झांक मारीत आहे. मल्हार रामराव चिटणीस ह्यांनीं शके १७३२ त लिहिलेल्या शिवाजीच्या चरित्राची भाषा ह्या बखरींहून अत्यंत भिन्न आहे. इतकेंच नव्हे, तर शके १६८५ त लिहिलेल्या भाऊसाहेबांच्या बखरींतल्या पेक्षांहि ह्या बखरीची भाषा जुनाट दिसते. ह्यावरून असा तर्क काढण्यास हरकत दिसत नाहीं कीं, यद्यपि ही बखर शके १७४० त आहे त्या रूपानें प्रसिद्ध केली गेली तत्रापि, हिच्यांतील मजकूर पूर्वींच्या एखाद्या जुन्या बखरींतून घेतला असावा. बारनिशी, दाखले, पत्रें व जुने ग्रंथ ह्यांच्या आधारानें आपण लिहीत आहों, असें हा बखरनवीस आपल्या बखरीच्या १४८ व्या, १८८ व्या व ३८१ व्या पृष्ठांवर वारंवार म्हणतो त्यावरून वरील विधानाला दुजोरा येतो. ३८१ व्या पृष्ठावर संतावजयाचा या बखरनविसानें उल्लेख केला आहे त्यावरून महीपतीच्या कालानंतर ही बखर लिहिली गेली अशी शंका कोणी घेतल्यास, तिनें वरील विधानाला प्रत्यवाय येत नाहीं. बखर आहे, ह्या रूपानें १७४० त प्रसिद्ध झाली, परंतु आंतील बहुतेक मजकुर जशाचा तसाच किंवा फेरबदल करून एखाद्या जुन्या बखरीवरून घेतला असावा, व जुन्या बखरीच्या नंतरच्या कालांत झालेल्या ग्रंथाचा व स्थलांचा क्वचित् प्रसंगीं उल्लेख केला असावा. ही बखर ग्रांट डफला मिळालेली नव्हती. हिच्यांत डफच्या ग्रंथांत नाहीं अशी माहिती बरीच सांपडते.