Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)
सभासदी बखरीच्या सर्व प्रतींत १६१६ असा एकच पाठ असल्यामुळें, सभासद यांनीं आपल्या बखरीचा प्रारंभ शके १६१६ त केला व तिची समाप्ति शके १६१९ ईश्वरनामसंवत्सरी केली, अशी संगती जुळवावी लागतै. सभासदांनी बखर लिहिली. त्या वेळीं छत्रपतीच्या खालोखाल महाराष्ट्रांतील कर्ते पुरुष म्हटले म्हणजे प्रल्हाद निराजी, रामचंद्र नीलकंठ, संताजी घोरपडे, बहिर्जी घोरपडे, व धनाजी जाधव, हे पांच गृहस्थ होते. शिवाजी महाराजांच्या तोंडीं, मरण समयीं, मोडलें राज्य सांवरणा-या ह्या पांच गृहस्थांचीं नांवें सभासदांनीं दिलीं आहेत. त्याचाच अनुवाद, चिटणिसांनीं आपल्या सप्तप्रकरणात्मक चरित्रांत प्रल्हाद निराजी ह्या नांवांबद्दल निराजी रावजी असें चुकीचें नांव घालून व बहिरजी घोरपडे हें नांव वगळून केला आहे. रायरी येथील बखरींत हीं पांच नांवें नाहींत. तसेंच शिवदिग्विजयांत ह्या पांच नांवांचा मुळींच उल्लेख नाहीं. तेव्हां शिवाजी महाराजांच्या तोंडीं, ह्या पांच गृहस्थांना बरें वाटण्याकरितां किंवा राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून ह्या पांच गृहस्थांची कर्तव्यतत्परता उत्तेजित करण्याकरितां, सभासदांनीं हीं नांवे घातलीं असावीं असें वाटतें. संभाजीच्या हातून राज्यकारभार निभणार नाहीं अशा मजकुराचीं वाक्यें मात्र सर्व बखरींतून सांपडतात, त्या अर्थी वरील तर्काला बळकटी येते. सभासदांना शिवाजी महाराजांच्या वेळचीं राजकारणें स्वानुभवानें माहीत असल्यामुळें त्यांची बखर, काव्येतिहाससंग्रहकार म्हणतात त्याप्रमाणें, बहुत विश्वसनीय आहे. सभासदी बखरींत उणीव एवढीच आहे कीं, शिवाजीच्या पराक्रमाचें वर्णन त्यांनीं अत्यंत त्रोटक व स्थूल मानानें केलेलें आहे. तसेंच १५८१ मार्गशीर्षांच्या आधींची माहिती म्हणजे शिवाजीच्या पूर्व वयांतील पराक्रमाचें वर्णन सभासदांनीं फारच थोडें म्हणजे बहुतेक मुळींच दिलें नाहीं. शिवाजीचा इतिहास लिहिणा-याला सभासदी बखरीचा उपयोग फार होईल.
प्रो. फोरेस्ट यांनीं छापिलेली इंग्रजी तर्जुमा केलेली रायरी येथील बखर कोणीं लिहिली तें समजत नाहीं. कावरी येथील पाटलाच्या विनंतीवरून रायरी येथील कुळकर्णी माणको भिवराव यानें गडावरील दप्तरखान्यांत असलेल्या बखरीची नक्कल करून घेतली, म्हणून ह्या बखरीच्या शेवटी लिहिलें आहे. ह्या बखरींत शिवाजीच्या राज्याभिषेकानंतरची माहिती मुळींच नाहीं. इतर वर्षांची माहिती कोठं कोठें बरी व ब-याच ठिकाणीं अपूर्ती अशी दिली आहे. ही बखर छोटेखानी असून कांहीं कांहीं ठिकाणीं विशेषनामाचे खरे उच्चार लिहिलेले नाहींत. मूळ मराठींत बखरीचें स्वारस्य जें असेल तें इंग्रजी भाषांतरांत राहिलेलें नाहीं. बायबलांतील यहुदी लोकांच्या कथांप्रमाणें ह्या बखरींतील कथाभाग साधा व चमत्कारिक भासतो म्हणून प्रो. फारेस्ट प्रस्तावनेंत म्हणतात त्याचें कारण इंग्रजींत भाषांतर करणा-याची इच्छा होय. मूळ बखरींतील भाषा इतर बखरीप्रमाणेंच साधी, ठसकेदार, संदिग्ध व आखुडती असली पाहिजे. कारण ह्या बखरींतील मजकूर इतर बखरींतील मजकुरांच्या सारखाच बहुतेक आहे. ह्या बखरीचाहि उपयोग थोडाबहुत होण्यासारखा आहे.
दलपतरायाची बखर एकपक्षी म्हणजे शिवाजीच्या विरुद्ध लिहिलेली आहे. प्रतिपक्षाच्या गोटांतील मनुष्यानें ही बखर लिहिली असल्यामुळें, शिवाजीसंबंधीं विरुद्ध पक्षाचें मत हिच्या द्वारें कळेल व तारखांचा व वर्षांचाहि मेळ बसविण्यास हिचा उपयोग होईल.
श्रीशिवाजी-प्रताप ह्या कृत्रिम नांवाची जी बखर बडोदें येथें १८१७ त छापिली गेली तिची किंमत उपयोगाच्या दृष्टीनें फारच थोडी आहे. ही बखर बहुत अपूर्ण असून शिवाजीच्या बालपणाचीहि हकीकत हींत दिली आहे असें नाहीं. दुस-या बखरींत किंवा कैफियतींत ह्या बखरींतल्या पेक्षांहि जास्त माहिती मिळण्यासारखी आहे. तरी शिवाजी संबंधी कोणतेंहि चिटोरें विचारार्ह असणारच ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन, ह्या बखरीचा आदर केला पाहिजे.