प्रस्तावना

इष्ट स्थळीं ज्या गृहस्थाकडे इतिहाससामग्री असते त्याची ओळख संशोधकाला सदाच असते असें नाहीं. सबब त्या त्या प्रांतांतील कोण्या ओळखीच्या संभावित गृहस्थाला त्याच्याकडे ओळख पटविण्याकरितां घेऊन जावें लागतें. संभावित गृहस्थ आधुनिक त-हेनें शिकलेला असला, तर तो वेळांत वेळ काढून, संशोधकाबरोबर येण्यास उत्सुक असतो. नसला तर दुसरा एखादा संभावित मिळविणें भाग पडतें. मिळालेल्या संभावित गृहस्थांतही कांहीं लोकसंग्राहक गुण असावे लागतात. तो नुसता इतिहासाची उपयुक्तता जाणणारा असून चालत नाहीं, तर तो कीर्तीनें प्रामाणिक व सत्यसंज्ञ असावा लागतो. अशा संभाविताच्या नुसत्या चिठ्ठीनेंही जसें काम व्हावें तसें होत नाहीं. कागदाची चिठ्ठी व साक्षात् माणूस ह्यांत महदंतर पडतें. सुदैवानें स्वतः संभावित बरोबर आला, म्हणजे एक मोठें काम झालें. त्याच्या येण्यानें एक कार्य होतें. आपण कोण, कोठील, काय, याची सविस्तर हकीकत सामग्रीवाल्यास परस्पर कळते व संभाविताची भीडही त्याला मोडतां येत नाहीं. परंतु एवढ्यानें किल्ला सर झाला, असें उतावीळपणें समजूं नये. अद्याप गडाच्या पायथ्याशींच आपण आहोंत, हें नीट लक्षांत बाळगावें. महाराष्ट्रात असा कोण महापुरुष आहे कीं, ज्याचे भाऊबंदकीचे तंटे नाहींत? तेव्हां सामग्रीवाल्याला अशी शंका येते कीं, हा नवखा दिसणारा लुच्चा, प्रतिपक्षांकडून आपलीं छिद्रें धुंडाळावयाला तर आला नाहींना? अर्थात्, या शंकेचें निराकरण झालें पाहिजे. तें व्हावयाला कमींत कमी एक दोन दिवस लागतात. मग सचोटीचें कूळ आहे, अशी खात्री झाली म्हणजे गोड बोलण्याला सुरुवात होते, व मग उद्यां दप्तर किंवा कागद किंवा ताम्रपट किंवा पोथ्या किंवा जें काहीं असेल तें दाखवूं म्हणून आश्वासन मिळतें. उद्या जावें तों असें कळतें कीं समन्स लागल्यामुळें बुवा तालुक्याच्या कचेरीस पहांटेच निघून गेले; ते दोन दिवस यावयाचे नाहींत. पुन्हा दोन दिवसांनीं जावें, तों बुवांच्या घरी श्राद्ध निघते व संशोधकाचें काम पुन्हां उद्यावर ढकललें जातें. पुन्हा दुस-या दिवशीं नेमलेल्या वेळीं जाऊन बसावें, तों अशी सबब निघते कीं दप्तरें माळ्यावर अडगळींत पडलीं आहेत ती काढलीं पाहिजेत, तेव्हां उद्यां येण्याची तसदी मेहेरबानी करून घ्या. मेहेरबानीची तसलमात संशोधकाजवळ अलबत असतेच. तिच्यावर वरात काढून, सशोधक दुस-या दिवशीं हजर होतो, तों इनामदारांचा शिपाई नाहींसा होतो. संशोधक व संभावित ह्यांच्यासारख्या थोर माणसांपुढें धुरळ्यानें व कोळिष्टकानीं भरलेलीं दप्तरें कशी टाकावीत? तेव्हां आणखी एक दिवस गम खावी लागते. पुन्हां दुस-या दिवशीं जावें तों गडी नसतोच. मग संशोधक व संभावित असा सवाल करितात कीं, इनामदारसाहेब ! धुरळा अंगावर पडला तरी चालेल, आम्हींच दप्तरें काढतों व तपासून होती तशीं ठेवून देतों. इनामदारांच्या चालीरीति पडल्या दरबारी. पाहुण्यांना इतकी तोशीस देणें त्यांच्या जिवावर येतें. परंतु निरुपायास्तव ते परवानगी देतात. इतके दिवस व एवढे गोते खाल्ल्यावर दप्तर एकदाचें खुलें होतें. जर करतां सशोधक किंवा संभावित आधेंमधें यत्किंचित् गरम झाला, तर काम हटकून फसतें. दप्तर काढलें, झाडलें, लकत-या सोडवल्या, कागद तपासले, निवडले, तों दोन चार दिवस लागतात. शेवटीं अमुक अमुक कागद किंवा पोथ्या आमच्या उपयोगाच्या आहेत, त्या आम्हीं कायमच्या देत असला तर घेऊन जातों किंवा परत बोलीनें नेतों; असा प्रश्न केला, म्हणजे मालक मोठ्या विचारांत पडतो. द्यावें कीं न द्यावे? वडिलांचे कागद, शेंकडों वर्षांपूर्वीची पैदास्त, कायमचे द्यावे कसे? असा प्रश्न उद्भवून येथेंच काय लिहून घ्यावयाचे तें घ्या, म्हणून उत्तर येतें. शेंकडों कागद असले तर लिहून घेणें अशक्य असतें. मग संभाविताच्या भिडेखातर व संशोधकांवर उपकार म्हणून, एक दोन दिवसांनीं कागद हस्तगत होतात. इतका प्राणायाम एकेक दप्तर मिळविण्याला करावा लागतो. तोपर्यंत मनोनिग्रहाची चांगलीच परीक्षा होते.