Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
संस्कृत भाषेचा उलगडा
(१) येथे एक बाब पूर्वसिद्ध धरावी लागते. ती ही की पुरुषवाचक सर्वनामांची तिन्ही वचनांची प्रथमेची रूपे प्राथमिक भाषेत आधी सिद्ध झाली व नंतर ती धातूंच्या पुढे लागू लागली. हा क्रम ऐतिहासिक दिसतो, सबब सिद्धान्तवत खुशाल मानावा.
(२) दुसरी बाब : प्राथमिक भाषेत धातूंची दोन रूपे असत, साधी व जोड, जसे भव् व अभव्; नय् व अनय्. भव् म्हणजे होणे व अभव् म्हणजे परोक्ष होणे. नय् म्हणजे नेणे व अन्य म्हणजे परोक्ष नेणे. अभव् + अहम् म्हणजे मी परोक्ष आहे, म्हणजे झालो. होण्याची क्रिया परोक्ष होणे, नेण्याची क्रिया परोक्ष होणे, असा मूळचा अभव् व अनय् या धातूंचा अर्थ होतो. अभव् + अहम् = अभवम् याला पुढे भूतकालीन रूप म्हणू लागले.
(३) तिसरी बाब : भवेय् हा जोड धातू आहे. भव् + एय्. भव् म्हणजे होणे व एय् म्हणजे शकणे. नय् + एय् = नयेय् म्हणजे नेऊ शकणे. भवेय् + अहम् = भवेयम् म्हणजे मी होऊ शकतो. (करू ये, जाऊ या, यातील या धातू मराठीत या एय्पासून आलेला आहे.)
(४) चवथी बाब : भविष्य हा जोड धातू आहे भव् + इष्य् भव् म्हणजे होणे व इष्य् म्हणजे जाणे, भविष्य + अहम्मि = भविष्य + आमि = भविष्यामि म्हणजे मी होऊ जातो, मी होईन.
(५) पाचवी बाब : चकर्, चकार्, हे कर् धातूचे अभ्यस्त किंवा पुनरुक्त किंवा पौन:पुन्यवाचक रूप आहे, याला अ सर्वनामरूप लागून चकर् + अ = चकर म्हणजे मी पुन: पुन: करतो असे रूप होते. कोणतीही क्रिया दोनदा केली म्हणजे पहिल्यांदा जी केली ती क्रिया परोक्ष होते. अशा क्लृप्तीने वैदिकभाषेत लिट् हा भूतकाळ आला आहे. प्रथम लिट् चा अर्थ पुन: पुन: क्रिया करणे असा होता.
(६) सहावी बाब : १) वदामि, २) अस्मि, ३) अवदम्, ४) चकर, ५) वदानि, ६) वदेयम् या रूपात मि, आमि, अम्, अह् आनि यापैकी एकच सर्वनाम येऊन, उदाहरणार्थ मि येऊन, १ वदिम, २) अस्मि, ३) अवदिम, ४) चकर्मि, ५)वदिम, ६) वदेय्मि,
अशी रूपे का झाली नाहीत? पाच निरनिराळी सर्वनामरूपे का लागली? याचे कारण एकच संभवते. ते हे की, वैदिकभाषा ही पूर्ववैदिक अनेक भाषांचे संमिश्रण होऊन बनलेली आहे. पूर्ववैदिक एका समाजात आमि हे सर्वनाम होते व ते धातूला लागून त्या समाजात वदामि असे रूप होई. दुसऱ्या समाजात मि हे सर्वनाम होते व ते धातूला लागून त्या दुसऱ्या समाजाच्या भाषेत अस्मि हे रूप होई. तिसऱ्या समाजात अह् हे सर्वनामारूप होते व ते धातूला लागून तिसऱ्या भाषेत चकर रूप होई. इ.इ.इ. पुढे या पाचही समाजांचे एकीकरण होऊन संमिश्र वैदिकसमाज बनला व त्या संमिश्र समाजाच्या संमिश्र भाषेतही पाचही सर्वनामेरूपे क्रियापद रूपात दिसू लागली. नामशब्दांचे पृथक्करण करताना जी बाब आढळली तीच बाब क्रियापदांचे पृथक्करण करताना आढळली. यामुळे वैदिकसमाजाच्या व त्याच्या भाषेच्या संमिश्र ह्न स्वभावात्मक सिद्धान्ताला पूर्ण सत्यत्वाचे स्वरूप आले.