Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

या दुहेरी सर्वनामांना पुन: अ, इ, वगैरे सर्वनामे पुढे किंवा मागे लागून अनेक तिहेरी सर्वनामे होत, पैकी काही येणेप्रमाणे :

त + अत् = तत् (परोक्षपदार्थदर्शक)
ए + तत् = एतत् (अत्यंत सामीप्यदर्शक)
अत् + अस् = अदस् (विप्रकर्षदर्शक )
इत् + अम् = इदम् (सामीप्यदर्शक)

नुसता त् अत्यंत परोक्षपदार्थदर्शक आहे. तत् मध्ये सामीप्यदर्शक अ असल्यामुळे ते त् हून कमी परोक्षत्व दाखविते. अदस् मध्ये अत् व अस् ही दोन्ही सर्वनामे विप्रकर्षदर्शक असल्यामुळे, ते तत् च्या जवळजवळचे परोक्षत्व दाखविते. इत् व अम् ही दोन्ही कमी विप्रकर्ष दाखविणारी असल्याने इदम् सामीप्यदर्शन करते आणि एतत् मध्ये अ व इ हे दोन्ही प्रचुर सामीप्य दाखविणारे असल्याकारणाने ते समीपतरभाव दर्शविते. तात्पर्य, अ व इ ही दोन्ही सर्वनामे सामीप्य दाखविणारी आहेत. दोहोत फरक एवढाच की अ हून कमी सन्निकृष्ट पदार्थ दाखविणारे इ सर्वनाम आहे आणि अत्यंत सन्निकर्ष दाखविणारे म्हणजे बोलणाऱ्याचे अत्यंत तादात्म्य दाखविणारे सर्वनाम अ हे आहे. अ च्या मानाने इ दूरचा पदार्थ दाखविते. सबब अत्ति, या रूपात परभाव जास्त दिसतो आणि कष्टे या रूपात आत्मभाव जास्त दिसतो. परभाव जास्त दिसतो म्हणून अत्ति या रूपाला परस्मैपदी रूप म्हणतात व आत्मभाव जास्त दिसतो म्हणून कष्टे या रूपाला आत्मनेपदी म्हणतात. अ हा अत्यंत सामीप्य दर्शक ऊर्फ अत्यंत तादात्म्यदर्शक स्वर उच्चारून वक्ता कर्मकर्तृत्वाचा स्वत:चा खासपणा दाखवितो. तात्पर्य, अ या स्वराचा ऊर्फ शब्दाचा ऊर्फ सर्वनामाचा अर्थ खास स्वत: असा आहे.

आता इ या सर्वनामाचा अर्थ काय ते पाहू. अत्ति या रूपात त् सर्वनामापुढे इ सर्वनाम लागले आहे. असे एक धातुरूप घेऊ की ज्यात त् या सर्वनामापुढे इ हे सर्वनाम येत नाही. हन् (हन्त्) हे वैदिक लङ्च्या प्रथम पुरुषाच्या एकवचनाचे रूप आहे. त् च्या पुढे इ नाही. इ नसल्यामुळे त् हे सर्वनाम फक्त परोक्ष क्रियापदार्थ दाखविते. हन्ति या रूपात त् च्यापुढे इ असल्यामुळे ति हे जोड सर्वनाम प्रत्यक्ष क्रियापदार्थ दाखविते. हन्ति या रूपात त् च्यापुढे इ असल्यामुळे ति हे जोड सर्वनाम प्रत्यक्ष क्रियापदार्थ दाखविते. प्रत्यक्ष म्हणजे वर्तमानकालीन आणि परोक्ष म्हणजे भूतकालीन. हन् (त्) हे भूतकाळाचे रूप का व हन्ति हे वर्तमानकाळाचे रूप का त्याचा हा असा उलगडा आहे. इ हे सर्वनाम कर्मकर्त्याचे प्रात्यक्ष दाखविणारे आहे. हन् (त्) हे परस्मैपदी रूप आहे. आत्मनेपदी रूपातही हाच प्रकार आढळतो. वस्ते या रूपात त् + अ+ इ अशी तीन सर्वनामे आहेत, व अवस्त या रूपात त् + अ अशी दोनच सर्वनामे आहेत, इ सर्वनाम नाही. प्रत्यक्षता म्हणजे वर्तमानकालत्व दाखविणारे इ हे सर्वनाम असल्यामुळे वस्ते हे रूप वर्तमानकालाचे समजत व नसल्यामुळे अवस्त हे रूप भूतकालाचे समजत. सिद्ध झाले की इ हे सर्वनाम प्रत्यक्षता ऊर्फ सन्निकर्ष दाखविणारे आहे. अ हे सर्वनाम कर्त्याचे स्वतस्त्व दाखविते व इ हे सर्वनाम क्रियेचे वर्तमानकालीनत्व ऊर्फ प्रत्यक्षत्व दाखविते.