Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
राधामाधवविलासचंपू (शहाजी महाराज चरित्र)
प्रस्तावना
शक १५७० च्या आगोटीस त्याचा मुक्काम चंदी प्रांतात पडला. बरोबर दिलावरखान, फरीदखान, बाळाजी हैबतराव, मसूदखान, अज्जमखान, सर्जाखान, रघोजीराव, यादुहखशन, बाजीराव घोरपडे, अंबारखान, वेदाजी भास्कर ब्राह्मण, जोहारखान, कन्नोळराजा असे कर्नाटकात ठिकठिकाणी पसरलेले लहानमोठे हिंदू-मुसलमान सरदार शहाजीचा तमाशा पहाण्याकरिता व शक्तीने नाही तर संख्येने शहाजीला दरडविण्याकरिता हजर होते. मुस्तफाने शहाजीला निरोप पाठविला की, पुढील सालच्या मोहिमेच्या कार्याची आखणी व योजना ठरवावयाची आहे, तेव्हा आपल्यासारख्या धुरंधरांची सल्ला घेतल्यावाचून कोणतीही योजना मुक्रर करणे लायक नव्हे, सबब आपण सत्वर निघून आमच्या छावणीत यावे. या निरोपातील कपट शहाजी जाणत होता. तत्रापि पातशाही बोलाविण्याला मान दिला नाही असा आक्षेप न यावा एतदर्थ, शहाजीने मुस्तफाखानाचे आमंत्रण स्वीकारिले. जाताना एक मात्र तजवीज करून ठेविली. ती ही की, बंगळूरचा किल्ला व तेथील फौज वडील पुत्र संभाजीराजा ह्याचा सुपुर्दीस देऊन, कमीजास्त काही झाल्यास तयारीने असण्यास त्याला बजाविले. बरोबर खंडाजी, मानाजी माने, तानाजी, बंधूजी, भांडवलकर, दसोजी व मेघोजी हे सात इतबारी सरदार व तीन हजार घोडा घेऊन तो मुस्तफाच्या भेटीस गेला. मोठ्या आदबीने भेट देऊन, मुस्तफाने शहाजीस अमूक तजवीज व्हावयाची आहे, तमुक पत्र पातशहाकडून यावयाचे आहे, इत्यादी सबबीवर दहा पंधरा दिवस ठेवून घेतले आणि एके दिवशी म्हणजे १५७० च्या श्रावण वद्य प्रतिपदेस, हिजरी सन १०५८ च्या रज्जबच्या १५ तारखेस पहाटेस आपल्या तंबूत शहाजी निजला असता आसदखान, यशवंतराव व बाजी घोरपडे यांनी त्या तंबूला वेढा दिला. जागा होऊन, घोड्यावर बसून निसटून जाणार, इतक्यात बाजी घोरपड्याने पाय धरून शहाजीस गिरफदार केले. मेजवानीला बोलावून पाय धरून शहाजीस बाजी घोरपड्याने धरले, असेही बखरकार लिहितात. शहाजीच्या सरदारांची व घोरपडे वगैरेंची लढाई होऊन, बाजी घोरपड्याने शहाजीस वार करून पकडले, असे बृहदीश्वरशिलालेख म्हणतो. पैकी खरा मजकूर कोणता ते निश्चित करण्याला विश्वसनीय साधन नाही. थोरामोठ्यांच्या चरित्रातील प्रसंग कर्णोपकर्णी जाऊन कसकसे सजविले जातात, हे मात्र ह्या हकीकतीच्या वैविध्यावरून उत्तम प्रकारे निदर्शनास येते. धन्याची ही बिनतोड दुरवस्था जेव्हा बरोबर आणिलेल्या सरदारांना व तीन हजार स्वारांना कळली, तेव्हा त्यांचे व मुस्तफाखानाच्या सैन्याचे भांडण झाले. त्यात बरेच सामान मुस्तफाच्या हाती लागले. परंतु स्वार व सरदार बंगळूरकडे निसटून गेले. मुस्तफाखानाने शहाजीची रवानगी विजापूरास केली आणि एका जुनाट शत्रूचा व यशस्वी वीराचा उच्छेद केला म्हणून आनंद मानिला. विजापूरास शहाजी नजरकैदेत होता.