Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

१४. दरबारातील ज्या मुत्सद्यांची व कवीची नावे जयरामाने उल्लेखिली आहेत त्यांच्यापैकी आपल्या पूर्व ओळखीची नावे कोणती व नवीनच प्रथम ओळख प्रस्तुत चंपूच्या द्वारा ज्यांची झाली ती नावे कोणती ते क्रमवार पाहू.

(१) शिवराय गोस्वामी : गोस्वामी म्हणजे गोसावी. गोसावी हे देशस्थ ब्राह्मणात आडनाव आहे. ह्या शिवराय किंवा शिवराव गोसाव्या संबंधाने पूर्वमाहिती काही नाही. हा शहाजीच्या दरबारी आल्यागेल्याची धन्याला वर्दी व गाठ घालून देणारा दरबारी होता. तंजावरप्रांती गोसावी आडनावाचे एक घराणे मी पाहिले होते. ह्याने समस्या वगैरे काही प्रश्न केला नाही. त्यावरून दिसते की, हा केवळ वरिष्ठ दर्जाचा सभ्य मुत्सद्दी असावा.

(२) वीरेश्वर वैद्य : वैद्य हे देशस्थ ब्राह्मण आडनाव. चंपूत वैद्ये: असा अनेकवचनी प्रयोग शहाजीच्या तोंडी कवीने घातला आहे. त्यावरून दिसते की, शहाजीमहाराज आपल्या मुत्सद्यांशी आदराने बहुवचनी बोलत असे. वीरेश्वर वैद्य हेही नाव नवीन परिचयाचे आहे. हा शहाजीमहाराजांचा भिषग्वर असावा.

(३) मल्लारीभट्ट पुरोहित : मल्हारभट पुरोहिताने समस्या घातली होती. हा महाराजांचा पुरोहित ऊर्फ राजोपाध्या. हा परमबुद्धिवान् होता असे कवी लिहितो. हे नाव राजोपाध्यांच्या पत्रव्यवहारात आले आहे.

(४) नारो पंडित दीक्षित : पंडित म्हणजे पंत. पंडित=पंडत=पंत. नारोपंत दीक्षित हे नाव सभासदी बखरीत आले आहे. सबंध नाव नारो त्रिमळ हणमंते ऊर्फ नारायण त्र्यंबक हणमंते. यांनी किंवा यांच्या पूर्वजांनी यज्ञ केला होता म्हणून यांना दीक्षित हे नाव मिळाले, हे उघड आहे. हा शहाजीराजाजवळ कर्नाटकात कारभारी ऊर्फ मुत्सद्दी होता. याजकडे मुजुमदारी होती. लग्नोत्तर जिजाबाईच्या पाठराखणीस हणमंते जाधवरायांकडून शहाजीराजाकडे आले. हणमंते हे आडनाव गावावरून पडले आहे. हे नाव पूर्वपरिचित आहे. ह्याला धीसचिवधुरंधर म्हणून जयरामाने विशेषण दिले आहे. समस्या करताना ह्याने मोठी जांभई देऊन अंग हलविले, असे कवी लिहितो. हणमंत्यांचे घराणे गंगाप्रांतीय नगर, औरंगाबाद इकडील आहे.

(५) नरहरी कवीश्वर : कवीश्वर हे देशस्थात आडनाव आहे. हे नाव पूर्वपरिचित नाही. हा महाराजाचा कवी असावा.

(६) विष्णु ज्योतिर्विद : म्हणजे विष्णु जोशी. ज्योतिषी=जोइसी=जोशी. हा राजाचा ज्योतिषी. हे नाव पूर्वपरिचित नाही.

(७) रघुनाथभट्ट चाऊरकर : चाऊरकर ऊर्फ चावरे हे देशस्थ आडनाव आहे. चाव-यांचे कूळ सध्या नरीथडीला प्रसिद्ध आहे. नाव पूर्वपरिचित नाही. हे राजाचे पंडित.