Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

प्रस्तावना

तसेंच परराष्ट्रांशीं केलेल्या तहांतहीं सातारच्या छत्रपतींचें नाव १७५० सालापासून १७६१ पर्यंत कोठेंहि नाहीं. जेथें तेथें बाळाजी बाजीरावाचेंच नांव प्रमुखलेलें दिसतें (लेखांक १/६५/१२९/१३०/१४५). पुढें १७५३ च्या व १७५४ च्या शेवटीं ताराबाईंची धुसपुस बाळाजीनें मोठ्या युक्तीनें बंद केली व रामराजाला निव्वळ बाहुलें करून सोडिलें. सातारच्या छत्रपतीचें महत्त्व समूळ नाहीसें केल्यावर आणीक एक गोष्ट बाळाजीस करावयाची राहिलीच होती. ती गोष्ट म्हणजे कोल्हापुरची व सातारची गादी एक करून मराठ्यांचे राज्यं एकछत्री करणें ही. ह्या हेतूच्या साधनार्थ १७४० त संभाजीशीं त्यानें गुप्त करार केला. १७५० त हा हेतु साध्य होण्याचा समय आला असतां शाहूच्या हट्टामुळें तो फसला गेला. तरी पुढें अशीच एकादी संधि येईल ह्या आशेनें बाळाजीनें संभाजीशीं पूर्वीचा स्नेह कायम ठेविला (का. पत्रें, यादी वगैरे ३३५). कारण संभाजीहि वृद्ध झाला असून लवकरच मरणासन्न होईल असा संभव होता. हा संभव ज्यावेळीं केव्हां खरा ठरेल त्यावेळीं संभाजीचा वारस जो रामराजा त्याला कोल्हापुरची गादी मिळून सातारचें व कोल्हापुरचें राज्य एक करण्याचा फारा दिवसांचा हेतु साध्य होईल असा बाळाजीचा बेत होता. परंतु, ज्या हट्टानें व अज्ञानानें १७४९ त शाहूला पछाडिलें त्याच हट्टानें व अज्ञानानें १७६० त संभाजीला गांठिलें व त्यानें मरणापूर्वी खानवटकर भोसल्यांच्या कुळांतील एक मुलगा दत्तक घ्यावा असें ठरविलें. पुढें १७६२ त जिजाबाईनें ह्या मुलाला दत्तकहि घेतलें. संभाजीच्या ह्या कृत्यानें बाळाजीचा बेत ह्यावेळीं दुस-यांदा फसला. परंतु एवढ्यानें नाउमेद होऊन बाळाजी स्वस्थ बसला नाहीं. खानवटकरांच्या घराण्यांतील जो मुलगा जिजाबाई दत्तक घेणार होती त्यालाच रामराजाच्या मांडीवर देऊन रामराजास वनवासास जावयास सांगावें असा बाळाजीचा ह्यावेळीं मनोदय होता (लेखांक २८९ व चिटणिसांची बखर). ह्या खानवटकरांच्या कुळांतील नवा राजा करण्यांत मतलब असा कीं पुढें मागें कोणतीहि एक गादी निपुत्रिक झाली असतां ज्या गादीवरील वंश हयात असेल त्याला निपुत्रिक गादीवर हक्क सांगतां यावा व ही दोन्हीं राज्यें एक व्हावीं. पानिपतची लढाई झाल्यावर नवा राजा करण्याचा बाळाजीचा बेत होता (लेखांक २८९). परंतु बाळाजीला पुढें मृत्यूनें लवकरच गांठिल्यामुळें तो बेत तसाच राहिला. असो.