Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
ह्या चिठ्ठीवरून बाळाजीवर शाहूचा फारसा विश्वास होता असें दिसत नाही. रघोजी भोंसले व दाभाडे ह्यांना बोलाविलें असतां तें येऊं पावले नाहींत. तेव्हां "फौज धरनें" त्यांच्या दैवीं नाहीं अशीं शाहूची खात्री झाली. त्यांना सामर्थ्य असतें व अक्कल असती तर ते महाराजांच्या आज्ञेबरहुकूम केव्हांच येऊन पावते. ते आले नाहींत तेव्हां बाळाजीच्या स्वाधीन फौजेचा (१) अधिकार देण्याखेरीज शाहूला गत्यंतरच राहिलें नाहीं. बाळाजीचा ओढा संभाजीराजाकडे विशेष. तेव्हां (२) त्याला बिलकुल आणूं नये असें शाहूनें लिहून ठेविलें. (३) वंश आहे तोच चालवावा म्हणजे राजारामाचा पुत्र जो शिवाजी त्याचा मुलगा रामराजा ह्याला गादीवर बसवावें ही शाहूची तिसरी आज्ञा होती. तसेंच (४) सरदार लोकांचेंहि पूर्वीप्रमाणेंच चालवावें अशी शाहूची चवथी आज्ञा होती. ह्या चार आज्ञांपैकीं फौजेचा अधिकार मिळविण्याकरितां बाकींच्या तीन आज्ञा मनांतून नसतांहि बाळाजीनें मान्य केल्या व पुढें समयानुसार रामराजाचें व सरदारांचें महत्त्व कमी करण्यास कमी केलें नाहीं व कोल्हापुरच्या संभाजीशीं पुढील दहा वर्षें मोठें प्रेमाचें वर्तन ठेविलें. इतकेंच नाहीं; तर रामराजा जिवंत असतां नवा राजा करावा असा त्यानें पुढें १७६१ त घाट घातला (लेखांक २८९). बाळाजीची संभाजीराजावर किती ममता होती हें काव्येतिहासांतील ३३५ व्या पत्रांवरून कळून येईल. संभाजीराजा १७६० च्या डिसेंबरांत वारला. त्यानंतर १७६१ च्या जूनच्या ९ तारखेला हें पत्र लिहिलें आहे. त्यांत संभाजीशीं बाळाजीचा केवढा स्नेह होता तें जिजाबाईनें मोठ्या सलगीनें ध्वनित केलें आहे व स्पष्ट लिहिलेंहि आहे. कोल्हापुरची व सातारची गादी एक करावी व सर्व सत्ता आपल्या हातीं ठेवावी हा बाळाजीच्या मनांतला द्विविध हेतु होता. ही एकी करण्याची कल्पना शाहूराजाच्या डोक्यांत शिरली नाहीं, त्यामुळें 'करवीरचें न करनें' म्हणून बाळाजीला त्यानें आज्ञा केली. हा हेतु साध्य झाला असतां मराठ्यांचें राज्य एकछत्री झाले असतें अशी बाळाजीची योजना होती. परंतु, शाहूच्या हट्टामुळें व अज्ञानामुळें बाळाजीला हा आपला फारा दिवसांचा हेतु एकीकडे ठेवावा लागला आणि शाहूच्या आज्ञा त्या वेळेपुरत्या तरी शिरसा मान्य कराव्या लागल्या. ह्या आज्ञा मान्य करण्यांत बाळाजीचे अतोनात नुकसान झालें. दोन्ही राज्यें एक होण्याची आयती संधि येत होतीं ती गेली ती गेलीच; परंतु, स्वतःची सत्ता कायम ठेवण्यास त्याला नंतर तीन वर्षे एकसारखी धडपड करावी लागली. कारण, रामराजा राज्यावर आल्यानें ताराबाईचें महत्त्व अतिशय वाढलें. १७०० त राजाराम महाराज वारल्यावर ह्या बाईनें त्यावेळच्या मुत्सद्यांच्या व शाहूच्या विरुद्ध वागून सर्वांचा द्वेष जोडिला होता. शाहूराजे १७०७ त मोंगलांच्या कह्यांतून सुटल्यावर त्यांच्याशींहि १७१२ पर्यंत ह्या बाईनें वाद मांडिला होता. १७३० त ह्या बाईला शाहूनें धरून सातारा येथें कैंदेत ठेविलें.