Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पाचवा (१७९५-१७९८)
[२८] श्री. ३० जून १७९५.
विज्ञापना ऐसीजे. रघोत्तमरव यांस विचारिलें कीं, पुढें तजवीज काय ठरली. त्यांनीं सांगितलें कीं, सध्यां येथें मौज मुजनी आहे. ज्याबज्या सरदार निरोप घेऊन गेले त्या सर्वांस बोलावणीं गेलीं कीं, आपले जमयतीनिशीं हजर होणें. दहा हजार फौज नवीन ठेवावयास हुकूम झाला. दहा बारा हजार पायदळ सुमारेमूस वगैरे. सध्यां आहे. आणखी ज्याबज्या आहे. तेंही लवकर करविलें आहे. फौजा लवकर पिछावर पाहविणार. आपल्यास हजरतींनीं सांगून मला पाठविलें कीं, जाला मजकूर याचे तंबीची तरतूद होत आहे, तुह्मीं श्रीमंतांस व मदारुल यांस लिहावें कीं अलिज्याहा फरारी झाले. निगादास्त करतील, त्यांस श्रीमंतांचे तालुक्यांतील लोक नोकरीकरितां जातील, त्यांस सर्वांस ज्याबज्या ताकीद व्हावी कीं कोणी तिकडे जाऊं नये, गेल्यास सरकारचा गुन्हेगार, याप्रमाणें लवकर तुह्मीं लिहावें, या मुकदम्याविषयीं पारशी पत्रें खरिता तयार झाला ह्मणजे पाठवून देऊं, पूर्वीं याप्रमाणें तुह्मीं लिहून पाठवावें. असें राव मशारनिल्हेनीं सांगितलें. उत्तम आहे, हुकुमाप्रमाणें लवकर लिहून पाठवून बंदोबस्त करवितों, असा अर्ज करावा, ह्मणून त्यास सागितलें. स्वामीस विनंति लिहिली असे. नवाबाची दोस्ती, घरगुती काम, ह्मणून नवाबानीं सांगितलें आहे. त्यास तालुक्यांत ज्याबज्या ताकीद झाली पाहिजे. यत नवाबाचा संतोष. स्नेहासही उचित. नवाबाकडून खरिता आतां ह्मणजे पाठवून देतों. याचें उत्तर लवकर आलें पाहिजे. प्रतीक्षा यास बहुत आहे. र॥ छ १२ जिल्हेज. हे विज्ञापना.