Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

तेव्हां त्याणीं करार केला कीं आमचे पत्र अल्पिष्टिन साहेब यांसी पोचलें म्हणजे तो निघोन येईल; परंतु आमचें पत्र तेथपर्यंत जात नाहीं. तेव्हां त्यानीं सांगितलें कीं, तुमचें पत्र आम्ही पोंचते करीन. लिहून द्यावें. ते वेळेस लाट साहेब याणें येथील इंग्रजास पत्र दिल्हें तें येथें येऊन स्वारींत गेलें. असें हिंदुस्थानचें वर्तमान लोक बोलूं लागले. कोणी बोलूं लागले कीं दपटीन साहेब दहा पलटणें घेऊन नागपुरास गेला. तेथें भोसले याची फौज चाळीस हजार आहे व पलटणें पाच आहेत. काय होईल तें बघावें असेंही बोलतात. अशी वदंता गुरुवार प्रहर रात्रपर्यंत जाहाली. शिरस्तेप्रमाणें तोफ जाहाली. रात्र गुजरली. शु॥ ४ भ्रुगुवारीं ऐशी वदंता लोक बोलूं लागले की फिरंगी अल्पिष्टीन बहाद्दर मागें फिरले, पुणेकडे रोख आहे. दुसरी वदंता कीं स्वारी श्रीमंताची सिध्द जाहाली. असेंही बोलूं लागले. तिसरी उठली कीं नागपुरास लढाई होऊन भोसले शिकस्त जाहाले; आणि गांवांत शिरले; इंग्रज याणीं वेढा दिल्हा आहे. अशी वदंता लोक बोलतात. शिंदे याची डाक पुण्यांत आली. ती फिरंगी याणीं धरून थोरले वाडयांत नेली. आणि साऱ्या सावकार मंडळीस ताकीद केली कीं शिंद्याचे डाकेवर ज्यांचीं पत्रें आलीं असतील तीं आणून दाखवावीं. असेंही वर्तमान जाहालें. शहरचा रामोशी नांव अर्जुन नाईक येऊन भेटला. त्याणें जिम्मा घेतला कीं दरवडा पडूं देत नाहीं. तेव्हां त्यास पोषाख पागोटीं शेले दिल्हे आणि शहरचा बंदोबस्त केला. कोंढवेकर गावकरी यांसी सोडून दिल्हें. आज चिंचवडास धऊस गेली होती. इंग्रजी लोक अ॥ ४०० व दोनशे स्वार असे गेले होते. त्याणीं गावकरी पाटील एक फार फार जखमी केला आणि पाच पाटील व कुळकर्णी दोन धरून आणिले आहेत. त्यास म्हणतात कीं रामोशी तुचे गावचे आमचे हवालीं करावे. तेव्हां त्याणीं करार केला आहे, आठा दिवसांत रामोशी आणून देतों. साहेब बोलला कीं आम्ही बोली ते वेळेस सोडूं. असें भृगुवारचें वर्तमान जाहालें. परंतु आज इंग्रजांचा जोर व पेशव्यांची कमती बोलतात. शिरस्तेप्रमाणें तोफ जाहाली. उज्याडलें. मि॥ शु॥ ५ शनवारचें वर्तमान. स्वारींतील वदंता. कोणी म्हणत नागपूर X X X X X कोणी ह्मणतात कीं नबाब पोलादजंग आणि श्रीमंत एक होणार. कोणी बोलतात कीं गोखले व श्रीमंत यांचे वांकडे आले. कोणी बोलतात कीं हिंदुस्थानांत जाणार ऐशी बातमी आली तीस ठिकाण नाहीं. कोणी म्हणत सिध्दटेकासही आले, परंतु फिरंगी याचा जोर भारी आहे. दुसरी बातमी कीं जुन्नरास फौज आली, आजमासें १५००० आहे. कोणाची पुसलें तरी नांव सांगत नाहींत. असें ही बोलतात. कोणीं म्हणतें त्याजवर इंग्रजी पलटण एक व दोनशे स्वार व पांच तोफा गेल्या. असें ही बोलतात. तिसरी बातमी कीं भोसले याणीं सहा पलटणें कापून काढिलीं आणि इंग्रज यासी सहा कोश मागें हटविला आहे. असें हि बोलूं लागलें. शहरांतील वर्तमान गल्ल्या बोळ शहरांत होते ते फिरंगी चिणून भिंती घालीत आहेत. चोरांचे बंदोबस्ता करितां ह्मणतात. आपण सारा गारपिरास येऊन उतरला होता तो आज कांहीं खडकीवर गेला आणि तेथें राहुटया दिल्या. रास्ते याचे वाडयांत फिरंगी जाऊन राहिला. देवाचे नैवेद्य व नंदादीप वगैरे चालते केले. पर्वती बेलबाग वगैरे संस्थानें सर्व पूजा पुरस्कर चालावे. रात्र जाहली. शिरस्ते प्रमाणें तोफ जाहाली. प्रात:काळ शुध्द ६ रविवारचें वर्तमान. लोक बोलूं लागले कीं श्रीमंताची स्वारी सिध्दटेकानजीक बाभूळगांव आहे तेथें आहेत. फौज बरोबर सुमारी २५००० आहेत. बरोबर चिंतामणराव आपा, गोखले यांचे चिरंजीव व अंताजीपंतमामा गद्रे व बाळाजीपंतमामा ही आहेत. बरोबर गोखले मंडळ + + + + + गोखले अलीकडे दहा कोश असें म्हणतात. त्या अलीकडे तीन कोश इंग्रज बहादर आहेत. हे त्याचा सीवार स्वयंपाक पहातात, ते याचा बघतात. अलीकडे विंचुळकर व पुरंधरे आहेत. कोणीं ह्मणतें खासा अल्पिष्टीण बरोबर चटेकरी पांच हातांत काठया व भोई दहा व खिजमत गार असामी दोन व बाळाजी नातू माणसें दोन असे खासा स्वारींत गेले, तेथें प्रभूकडे सांगून पाठविलें कीं आम्ही कांहीं विनंती करावयास आलों आहों, तेव्हां त्याणीं उत्तर केलें कीं जें बोलणें ते बापू गोखले याशीं बोलावें. तेव्हां गोखले याचें लष्करांत आला. त्याणीं त्याचा आदर करून पुशिलें कीं कां येणें जाहलें. ते वेळेस अल्पिष्टीण ह्मणाले कीं तुमचा आमचा तह असावा, तुम्हीं पुणेयासी महाराजास घेऊन चलावें, जसें पहिलें होतें तसें चालावें.