Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

तेव्हां त्याणें लिहून दिल्हें. मग ते स्वार आणिले. त्यांस पुसलें. त्यांचे याचें लिहिलेले मिळालें. बम्हन सच्चा आहे. त्या ब्राह्मणाचें गेलें होतें तें त्यांस दिल्हें आणि ते दोन स्वार फाशीं दिल्हे आणि एक शेणवी फाशीं दिल्हा. ऐसें (जालें). दोन घटका दिवस संध्याकाळचा राहिला तों दवंडीं आलीं कीं खुशींनें सव ? नाहीं, बेटक ? नाहीं, पट्टी नाहीं, ऐशी चिट्टी बुधवारचे झेंडयास आणून बांधली व कोतवाल चावडीचे झेंडयास हि चिट्टी बांधली. ऐसें बुधवारचें सायंकाळ परियंत वर्तमान जाहालें. पुढें शिरस्तेप्रमाणें तोफ जाहाली. गुरुवारचे दिवशीं प्रात:काळ इंग्रज बहाद्दर याणीं तयारी करून तीन प्रहर दिवसास कुच करून गेला, तो सिंहगडास गेला. तेथील वर्तमान राजश्री अण्णा नगरकर व धोंडोपंत जोशी वानवळे व अमरचंद, पिदडी आणि गरीबगुरीब पळून पहिली लढाई जाहाल्यावर गेले. तेथें किल्ल्यावर जाऊन कोठें काठें राहिलें. बाकी (गरीब लोक माचीस) राहिले होते. पुढें ही लढाई जाहाली तेव्हां साऱ्यांनी विचार करून कोकणांत जावें असें ठेरवून नगरकर वगैरे मंडळी ऐवजसुध्दा किल्यावरून उतरोन डोंणज्यास राहिले होते. दुसरे दिवशी निघोन जावें तों रात्रीं प्रहर जाहाला तो इंग्रज बहाद्दर जाऊन पोचले आणि तोफा डागल्या. कोणी जेवीत बसले, कोणी कांहीं आपले गुप्तांत, तों गोळे आले. असें जाहाल्यार लेकांस आई ठाऊक नाहीं, बायकोस दादल्याचें ठिकाण नाहीं, भावास बहिणीचे ठिकाण नाहीं, अशी अवस्था जाहाली. इंग्रज बहाद्दर याणीं लूट केली. किती लूट जाहाली ही पुण्यांत वदंता कीं पंचवीस लक्षांची जाहाली. त्यांत नगरकर व जोशी, वानवळे व अमरचंद व पिदडी यांचा फार खराबा जाहाला. वरकड गरीबगुरीब फार नागवले. ऐशी रात्र जाहाल्यावर भृगुवारी प्रात:काळीं सिंहगडकरी यांणीं तोफांची मारागिरी केली. तेथें इंग्रज याचें माणूस दोन तीनशें पडलें. बहुत खराबी सरंजामाची जाहाली आणि लूट घेऊन माघारे उलटले. पुणेयांसी तिसरा प्रहरीं आले. सायंकाळ जाहाला. शिरस्तेप्रमाणें तोफ जाहाली. मंदवारीं प्रात:काळीं अल्पिष्टीण बहाद्दर याजकडे सारे सावकार मिळून हरेश्वरभाईस पुढें करून गेले. कोणी साखर, कोणी बदाम अशी नजर घेऊन गेले. सर्वांस सांगितलें कीं खुशी करून रहावें, तुमचे धनी लवकर येतील, आम्ही तुमचे धन्यास आणावयास जातों. तेवेळेस कांहीं शालजोडया व जवाहीर (चोरीस गेलें.) हरेश्वरभाईस सांगितलें कीं तुम्हीं शहरचें (कारस्थान जाणतां, बंदोबस्त) करावे. तेव्हां नातू व भाई मिळून लोक ठेवीत चालले. हातांत काठया घेऊन बसवावे तों शहरांत चोरीचा उपद्रव जाहला. तेव्हां ताकीद जाहली कीं हत्यारें घेऊन बसावें. असा शहरचा बंदोबस्त केला. शिपायास शेरा दर ६ प्रमाणें केला. असें वर्तमान जाहालें. रविवारीं प्रात:काळीं कुच करून खासा साहेब चार पलटणें व पाचशे स्वार व बैल सुमारा वदंता ३६००० घेऊन मुक्काम लोणीचा केला. दुसरे दिवशीं निघोन जेजुरीस गेला. चवथे दिवशीं यांची व त्यांची कांहीं चकमक जाहाली. ऐशी वदंता पुण्यांत आली. पुणेयाचे आसमंतात पाच पाच कोश लुटीस ठिकाण राहिला नाहीं. एक मनुष्य गेलें तरी लुटल्या शिवाय माघारें येऊं नये. अशी व्यवस्था जाहाली. शहरांतील माणसास एक जीव जातो व एक येतो असें जाहालें. कोणी कोणाचे घरी जाईना येईना. शहरांत एक मशाल नाहीं व घोडेंही नाहीं. मग मेणा, पालखी कोठून असावयाची ? परंतु तीन पालख्या मात्र फिरत. अप्पाजी लक्षुमण याची व चिटणीस यांची व त्याजकडील मोलवी याची, ऐशा तीन फिरत. कार्तिक वद्य १ साहेब सारे वाडे मोठे मोठे घरीं फिरला. पुरंधरे व गोखले व रास्ते ह्या वाडयांपासून हत्यारें घेऊन गेला. सोमवारीं रात्रौ वेताळपेठेंत दरवडा आला. तो मारवाडी यांचीं दुकानें पाच फोडिली. तेथें दहावीस हजारांचा माल घेऊन गेले. रामोशी आ दोनशे आले होते. कोणास मारिलें नाहीं. कोणास दुखविलें नाहीं. ऐसें जाहालें. साहेब याजकडे सांगावयास गेले. तेव्हां त्याणें उत्तर केलें, उसकूल्याव, हाम फाशी देयेंगा. साहेब, वो कसे सापडेगे ? तो हम क्या करे, चोर उपर हाम जाते नहीं. असें ऐकून रडत माघारे आले. असें वर्तमान जाहालें. सायंकाळीं दवंडी आली कीं जो चोर धरून देईल त्यास तीस रु॥ बक्षीस देऊं. याजला दोन चार दिवस जाहाले तों शहरांत बाबाजी प्रल्हाद याचे वाडयापाशी दरवडा आला. तेथें चार घरें फोडून अवाई अशी आली कीं दहापंधरा हजार रुपयांचा ऐवज गेला. नक्की किती गेला कोणास ठाऊक? ते दिवशीं दवंडी आली कीं ज्यास आळंदीस जाणें त्याणें सडें जावें. कांहीं खटलें नेऊं नये. असें कानीं ऐकून कोणी जाणार ते गेले. ते दिवशीं रात्रीस दरवडा बुधवारांत कापडआळींत आला. तेथें तीन दुकानें फोडिली. लकडे, व माहाजन व दानवे ऐशीं तीन दुकानें कापडकरी यांची फोडिली. तेथें घाई जाहाली. आदितवारकर पहारेकरी याणीं बार सोडिले आणि गलबल भारी जाहाली; तेव्हां निघोन गेले. वद्य १२ भृगुवारीं हें वर्तमान जाहलें.