Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२७] श्री १३ मे १७३९
श्रीमंत महाराजश्री परमहंस बाबा स्वामीचे सेवेशी.
आपत्ये चिमाजींने कृतानेक सा॥ नमस्कार२६. विज्ञापना येथील कुशल ता॥ वैशाख बहुल प्रतिपदा पर्यंत मुक्काम वसई स्वामीचे आशीर्वादेकरून सुखरूप असो. विशेष. स्वामीचे अभयावरून वसईस मोर्चे घ शु॥ दशमीस लाविले. त्यादारभ्य मोर्चे चालविले व धमधमे चार पांच बांधले. सुरंग चालविले. जे जे उपाय स्थल हस्तगत करावयाचे ते केले. फिरंगी यांनी निराकरणाचा मंत्र पूर्वी युध्दप्रसंगी मोठ्या मोठ्या सुरांनी केलें. तदन्वयें फिरंगियांनीं सुरंगांवर व धमधमे यावर गरनाळा टाकिल्या. सुरंग विच्छिन्न केलें. पनळ लावून पाणी सोडिले. आगीचे ओंडे जळके टाकून त्यावर तेल, दारू, राळ टाकून चार चार रोज डोंबराही सारखा करी. बरकंदाजी व तोफाजी फिरंगियाची निस्सीम ह्मणावी तैशी. तथापि स्वामीचा आशीर्वाद व दंड हें सबळ शास्त्र आह्माजवळ. त्याचे प्रतापें इकडून तोफा लागून फिरंगियांच्या तोफा मना केल्या. सफेल पाडून लेश केली. वसई जागा बाका बुलंद. सुरुंगांचा उपाय नाहीं. परंतु स्वामीचे कृपा कटाक्षें सुरंग चालवून दोही बाजूंनीं खांब, वरती तक्तपोशी, त्यावर दोन अडीच हात रेती टाकून सुरंग नेऊन पोहोंचाऊन, दोनशे पाथरवट लावून, मोठे मोठे चिरे फोडून सुरंगाचे बुधलियास जागा करून, वैशाख शु॥ पंचमीस सकल सिध्दता करून, सुरंग लोकांस बाजू वांटून देऊन, नगारेयाची इशारत करून, सुरंग उडतांच सर्वांनीं येलगारास उठावें, बुरजावर चढावें, शिडया टेकून चढावें, ऐसा करार करून, वैशाख शु॥ ६ बुधवारी दोन घटका दिवस प्रात:काळचा येतांच सुरंगांस बत्या दिल्या. डावे बाजूचे सुरंग कांही उडाले, कांही उडणे होते, तोंच लोकांनीं उतावळी करून कोटावर चालून घेतले; तों दुसरें सुरंग तेच बाजूचे उडाले, त्याणी लोक दडपले व जाया व ठार झाले. तसेच उजवे बाजूचे सुरंग उडाले, एक दोन उडतांच बुरजास वाट जाहलीशी देखून लोक वरतें चढले, तों दुसरे सुरंग उडाले, त्यांणीं वरतें लोक चढले होते ते उडोन गेले. लोक कचकरले. हिरमोड होऊन काम बंद पडिलें. फिरगी यांणीं संभाळून हुके व गरनाळा व रेजगरीचा मार न भूतो न भविष्यति केला. त्याणें लश्करचे लोकांस व हषमांस अवसान राहिलें नव्हतें. उजवे बाजूचा मातबर सुरंग राजेश्री मल्हारजी होळकर यांजकडील उडणे होता, त्याचा शोध करून, पुन्हा त्यांत बुधले घालून रंजक दुरस्त करून लोकांची निवड केली. आणि सुरंग उडतांच खामखा निशाणें चढवावींसा कारार करून वैशाख शु॥ ७ गुरवारीं उजवे बाजूचा सुरुंग उडविला. तेच समयीं लोक जाऊन बुरूज अर्धा उडाला. त्याजवर चढले. फिरंगीयांनी सफेलीच्या आंतून मेंढा घालून पेटी भरून तोफा जाऊन तयार होतांच तेथे फिरंगी बळाऊन होके गरनाळाचा दारूच्या पोत्यास आग लाऊन मार केला, व रेजगिरीचा मार सीमे परता केला. लोकांवरी अग्नीचा पर्जन्य करून भाजून काढिले. तथापि स्वामीचे अभय आशीर्वादाचें वज्रकवच लोकांचे आगीं होतें. तेणेंकरून आगीची तमा न धरितां लोकांनी हत्यार बरे वजेनें केलें. फिरंगीयांनीं मरदुमी शिपाईगिरी करावी तैशी केली. त्याप्रमाणें इकडील लोकांनी भारती युध्दाप्रणें युध्द केलें. या मागें युध्दें बहुत झाली. परंतु या लढाईस जोडाच नाहीं. सर्व स्वामीचा आशीर्वाद. लोक बुरूज सोडीनातसे जाहले. तेव्हा स्वामीच्या दंडकप्रहारें करून फिरंगी धर्मद्वेष्टे बेहिमत होऊन अष्टमीस प्रहर दिवसास कबूलास आले. कबूल घेतला. आठ दिवसांत कबिलासुध्दां झाडून जातोसें करार केले. याजवरून मार महकूफ केला. फिरंगी यांणीं कबिले वस्तभाव गलबतांत भरिली. काल वे॥ पोर्णिमेस फिरंगी झाडून गेला. स्वामीचे पुण्येकरून जागा फत्ते झाली. लश्करचे व हषमाचे लोक सुरंगानें उडाले व जाया ठार अदसें पांच हजार किंबहुना विशेष होतील. तैसेंच फिरंगीयाचे सात आठशे मालीस ठार व या निराळे जखमी झाले. भारती युध्दाप्रणें युध्द झालें. वसई बांकी जागा, पश्चिमेकडून समुद्र, दक्षिणेकडे खाडी, पूर्वेकडे खाजणचाखल, तिहीकडून किमपि इलाज नाहीं. एक उत्तरेकडून उपाय. तिकडेही रेती, धर नाहीं. स्वामी साक्षात्कार ईश्वराचा अंश. स्वामींनीं वसई दिली. त्रिवार लिहिले, ते शब्द अन्यथा कसे होतील? वरकड वसईची गोष्ट मानवी लोकांनीं ह्मणावी असें नाहीं! वसई स्वामीचे आशीर्वादें फत्ते झाली. श्रींचे सुदर्शन धर्मद्वेष्ट्याचे मस्तकीं वज्रप्रहार होऊन टोपीकर म्लानत्व पावलें. अन्यथा वसई वसई होती! व फिरंगी आगीचा पुला होता! स्वामीचे कर्तृत्वास पार नाहीं! स्वामीचा महिमा स्वामी जाणत! आह्मा मानवीं लोकांस काय कळे? वसई फत्ते होतांच सव्वाशे पुतळी पाठवून देणें व श्रीभुलेश्वरास सव्वाशे रुपयांचा मुगुट घातला ह्मणोन आज्ञा केली. याजवरून स्वामीचे आज्ञेप्रमाणे वसई फत्ते होतांच श्रीनिवास केदार याजबरोबर पुतळ्या सव्वाशे व श्रीभोलोबास मुगुट सव्वाशे रुपयांचा घातला ते रुपये १२५ सव्वाशे स्वामीचे सेवेशी पाठविले आहेत. प्रविष्ट होतील. आह्मीं लेकरें स्वामीची असो. सर्व प्रकारें कृपा करणार स्वामी समर्थ आहेत. स्वामीचे वितरिक्त दुसरे दैवत आह्मां काय आहे? सारांश, स्वामीच्या आशीर्वादें व दंडाच्या प्रतापें कार्य सिध्दीनें पावलें असे. स्वामीचा महिमा आह्मी वर्णावयास सामर्थ्य धरीत नाहीं. श्रीनिवास केदार पुतळ्या व रुपये देऊन रवाना केले आहे ते लवकरच पावतील. वर्तमान त्वरेनें विदित व्हावें यास्तव हें पत्र पुढें रवाना केले असे. सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना.