Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
एसाजी याने पुंडावा करून तीन वर्षे अंमल चालविला. नंतर एसाजी याचा बचाव होईना. मानाजी यास पेशव्यांचा आश्रय मिळाला हे पाहून एसाजी चेंऊलास अशाम मशीदींत जाऊन राहिला. नंतर तेथून निघून पेण येथें गढीत जाऊन राहिला व प्रांतांत बंडावा करून वसूल घेऊं लागला. ते समयीं मानाजी आंग्रे यांणी फौज पाठवून, गढी काबीज करून, एसाजीस धरून, महाल पोयनाड येथें आणून, शेख हवालदार यास हुकूम केला कीं, एसाजीचे दोन्ही डोळे काढावे. नंतर तसे आंधळे १६५९ चे ज्येष्ठमासी अलीबागेस आणून नेमणूक करून ठेविले. धोंडाजी आंग्रे हा मानाजीजवळ राहिला. किल्ले उंदेरेकीर हपशी याचा चौथाईविषयी कलह होत असे. या कारणामुळें शिद्दी बिलाल व मानाजी आंग्रे यांचा तह होऊन प्रांताकडे पुन: दावा सांगू नये असा करार होऊन तर्फ मांडवे गांव राजपुरीकडेस तोडून दिलें; आणि ऐन तेपें झिराड व परभूर दुतर्फा चालत आल्याप्रमाणें चालावें असें केलें. मानाजी आंग्रे यांही आरमार घेऊन दर्यामध्यें सावकार लोकांजवळून खंडणी घ्यावी, दर्म्यान जाऊं येऊं नये असा बंदोबस्त केला. फिरंगी रेवदंडा यांनी मसलत करून आंग्रे यांचा खासगत गांव खांजव तर्फ ब्राह्मणगांव रात्रीस मारावयास आले. परंतु सरखेल यास पूर्वी समजल्यावरून त्यांणीहि लोक नेउन ठेविले होते. तेव्हां उभयतांची लढाई होऊन फिरंगी यांचा पराभव झाला. व फिरंगी यास काढीत काढीत रेवदंडेचे किल्ल्यांत घालविलें. नंतर मानाजी आंग्रे यांनी शहर व कोट काबीज केला. आणि मोर्चा बांधून किल्ल्यावर फार मार चालविला. तेव्हां किल्ल्यांतील लोकांचा नाइलाज होऊन कोंडून राहिले. तेव्हां ही खबर वसईस गेली. तेव्हा कप्तान सोन्हा येऊन मानाजी आंग्रे यांशी तह करून शहर कोटांतून मोर्चे उठविले. नंतर शके १६६० चे आश्विन महिन्यांत आंग्रे कुलाब्यांत गेले. पुढें संभाजी आंग्रे हे विजयदुर्गाहून आरमारसुध्दां कुलाब्यास साखरेस उतरले. तेव्हा मानाजी व संभाजी यांची लढाई झाली. त्यांत संभाजीचा जोर पाहून मानाजीनें श्रीमंत पेशवे यांस पत्र लिहून चिमणाजीअप्पा व नानासाहेब यांस आपले मदतीनें फौजेसुध्दां बोलाविले. त्याप्रमाणें ते येऊन उभयता भावाची समजूत केली. तेसमयीं पेशवे यांस मानाजीनें किल्ले नजर दिले ते :- पाली, मीरगड व उरण. नंतर उभयबंधूस महाराज शाहूराजे यांचे भेटीस घेऊन गेले. शके १६६२ त आंग्रे यांची ठाणी थळ व नवगांव येथे होती. या मोर्च्यावर उंदेरीकर हपशी यांचे लोक उतरून लढाई केली. त्यांत हपशांचा मोड झाला. ही लढाई शके १६६२ चे भाद्रपदमासीं झाली. नंतर किल्ले माहुली येथून मोरोजी शिंदे हिंमत पेशवे हे लष्कर घेऊन आले. किल्ले उंदेरीतून अंताजीराव घाटगे दिवासा हपशी हे लष्कर घेऊन थळास उतरले, आणि तेथील गडी घेऊन हिराकोट काबीज करावा असा बेत केला. इतक्यांत मानाजी आंग्रे याची लढाई झाली, आणि सरखेल यांच्या पायास बंदुकीची गोळी लागली. त्यांनी पेशवे सरकारास लिहून पाठविलें कीं आपली मदत असावी.