Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
त्यांस पुत्र ३ :- १ मानाजी, २ कान्होजी, ३ जयसिंग. ह्या तीन पुत्रांपैकी मानाजी हे राज्यासनी बैसले. ह्यांचा अंमल शके १७१५ पासून शके १७२१ पर्यंत होता. त्रिवर्ग बंधू समयिक असतां जयसिंगराव आंग्रे हे दिवाणगिरीचे काम करीत होते. राघोजी आंग्रे यांची धाकटी स्त्री आनंदीबाई, भोसले यांची कन्या; मानाजी आंग्रे यांची खुद्द आई, इचा व जयसिंगराव आंग्रे यांचा आपसांत कलह उत्पन्न जाहाला. बाईसाहेब यांनीं विचार केला कीं, जयसिंगराव यास धरून जिवें मारावें. ते समयीं जयसिंगराव आंग्रे यांस सूचना जाल्यावरून किल्लेमजकूरचा बंदोबस्त करून फितुर असामी यांस धरिलें. दौलतराव हरी व रघुनाथराव हरी चिटणीस, दिवाण सरखेल या दोन असामींस जिवें मारिलें. धोंडभट शैव, भास्कर गोविंद फडणवीस, धाक सारंगवर, हरजी हिदळेंकर, भंडारी व रघुनाथराव भोसले सातारकर ह्या असामींस कैदेंत ठेविलें. भोसले यांचे लोकांस प्रांतातून लुटून लाविले. राव आंग्रे यांनीं आपले दोन मुलांस राज्यावर बसवून कारभार करूं लागले. ही बातमी पेशवे सरकारांत समजून, माधवराव हरी फडके व जिवाजी बल्लाळ असे लष्कर देऊन कुलाब्यास दोघा भावांची समजी करावयास आले. ते रेवदंडयास उतरले. आणंदीबाई आंग्रे यांणीं धोंडभट भाऊ दिवाण, फडके यांचा कारभारी, यांस एक लक्ष रुपये देऊं करून जयसिंगराव आंग्रे यांस धरून यावें असा करार केला. धोंडभटभाऊ यांनी कांही लष्कर घेऊन मुकाम संगम तर्फ खंडाळे येथें गेले. तेथें जयसिंगराव आंग्रे यांनी भटजींचा पराभव केला. साखरेस आंग्रे यांची गलबतें छावणीस होती त्यांस आग लावली. जयसिंगराव लष्कर घेऊन रेवदंड्यास आले. शके १७१६ त हरिपंत फडके अजारी होऊन शुध्द ११ स मृत्यु पावले. माधवराव यांचे लष्कराची व आंग्रे यांची भेटी मौजे चेढरें तर्फ खंडाळे येथे होऊन खुशालीचे पोषाक जाले. तेथून रेवदंड्यास आले. नंतर मानाजी आंग्रे व जयसिंग आंग्रे लष्करसुध्दां रेवदंड्यास येऊन भेटी जाहाल्या. फडके यांनीं आंग्रे मंडळीस कारभाऱ्यासुध्दां वस्त्रें दिली. माधवराव फडके पुण्यास गेले. शके १७१७ चे चैत्रमासीं मानाजी व जयसिंगराव एकत्र असतां, आणंदीबाई आंग्रे यांनी सोरटी लोक फितूर करून, किल्ले मजकुरीं गर्दी करून जयसिंगराव आंग्रे, धर्मा सारंग, बाळाजी पांडुरंग, धोंड सारंग, कान्होजीराव देशमुख, आपाजी चव्हाण व गोपाळ पाटील या सात असामींस कैद करून, बिड्या घालून, कोणास सागरगडावर, कोणास खांदेरीवर, अटकेंत ठेविलें. बाळाजी पांडुरंग यास जिवें मारला. नंतर चार महिन्यांनीं जयसिंगराव आंग्रे यांनी फितूर करून श्रावणमासी हिराकोटांत येऊन राहिले.