Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
परंपरेनें लढाई होऊन प्राप्तव्य कांही नाहीं. तेसमयीं हबशी राजपुरीहून फौज घेऊन खांदेरीनजीक खडप होता तेथें शके १६०१ सन समानीन व अलफ वैशाखमासीं किल्ला बांधावयास आरंभ केला व त्याला उंदेरी असें नांव ठेविलें. हबशी याणें उंदेरी किल्ल्यावर फौज ठेविली आणि रात्रीं सदरहू प्रांतांत उतरून गांवें मारावी, घरें लुटावी व माणसें जिवें घ्यावी, ह्याप्रमाणें क्रम ठेविला. फिरंगी यांनी रेवदंडा येथे रयतेस धरून नेऊन ठेवावें, देवळें व मशिदी मोडून टाकाव्या. शिवाजी राजानें तह करण्याविषयी बहुत प्रयत्न केला; परंतु तह होईना. देशास फार उपद्रव जाला. किल्लेकोट असतां प्रांतांचा बंदोबस्त होईना. अलीबागेजवळ नऊघर येथें समुद्रकिनाऱ्याजवळ खडक होता तेथें शके १६०२ सन इहिदे समानीन सालीं किल्ला बांधून जंजिरे कुलाबा असें नांव ठेविलें. तेच साली छत्रपतीस देवाज्ञा जाली. त्याचे पुत्र दोन :- १ संभाजी. २ राजाराम. संभाजी राजा याचा अंमल शके १६०२ पासून शके १६१० एकूण नऊ वर्षे. सागरगड, खांदेरी व कुलाबा ह्या दोन गढ्या व प्रांतीं जमाबंदी चालत असतां, चेंऊल गांवांत खासगी अल्ली मुसलमान रहात होता. त्याची हवेली निवारशी होती. सबब संभाजीनें दोन बुरूज बांधिले. त्यास राजकोट नांव दिलें, शके १६०४. संभाजी राजे राज्य करीत असतां हबशी फौज घेऊन आरमारसुध्दां पालवचे खाडीत आला. तेथून रात्रीचे समयी छापा घालून चेंऊलचीं घरें दग्ध केली. मालमत्ता लुटून नेली. शके १६०७ यावर्षी संभाजी राजाच्या तर्फेनें सागरगड, राजकोट, खांदेरी व कुलाबा येथें अंमलदार होते ते :- सूर्यवंशी मराठे माणकोजी यांची नेमणूक खांदेरी येथें तीन वर्षें, उदाजी पडवळ यांची नेमणूक सागरगड येथें चार वर्षें, सुभानजी खराडे यांची नेमणूक राजकोट येथें सहा वर्षे, भिवजी गुजर यांची नेमणूक कुलाबा सहा वर्षें. संभाजी राजा रायगड येथें राज्य करीत असतां कान्होजी आंग्रे फिरतें आरमार घेऊन समुद्रामध्यें सदरहू लोकांचा परामृश घेत असे.