Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
तेव्हां रामाजी महादेव व मोरोजी शिंदे येऊन हपशी याचे लष्कर थळास होते तेथें लढाई होऊन उदेरकरांचा मोड होऊन पळून गेले. किहीमास दुसरी चौकी होती तेथें जाऊन उंदेरकरांचे आठ असामी मारले गेले. शके १६७६ चे माघ मासानंतर श्रीमंताकडून पत्र आलें की, निजामअल्ली मोंगल याजवर स्वारी आहे याजकरितां लष्करसुध्दां पुण्यास यावें. तिकडे गेल्यानंतर, उंदेरीकर हपशी यांनी लष्कर पाठवून फाल्गुनमासी सास्वण, आवास, सातीरंजे व भाल या गावांतील ब्राह्मण व बायका धरून नेउन अटकेंत घातली. हें समजल्यावरून सरखेल यानी महादाजी रघुनाथ व तुकोजी आंग्रे याजबरोबर लष्कर देऊन सांगितलें की उंदेरीवर चढाई करून ब्राह्मण व बायका सोडून आणाव्या. त्याप्रमाणें त्यांनीं ब्राह्मण व बायका सोडून आणिल्या. ही गोष्ट १६८० च्या ज्येष्ठमासीं झाली. हा सर्व मजकूर पेशवे यांस लिहून कळविल्यावर श्रीमंत पेशवे यांनी राजपुरीवर चढाई केली. तेव्हां मानाजी आंग्रे हेही लष्करसुध्दां गेले, आणि तेथें आजारी झाले. सबब तेथून निघून कुलाब्यास श्रावणमासी आले. नंतर भाद्रपदमासीं शके १६८० त मृत्यु पावले. मानाजी यांस पुत्र १४ चवदा. त्यांची नावें :- दहा औरस व चार खर्च, एकूण चवदा. १ महिमानजी, २ राघोजी, ३ चिमाजी, ४ हिरोजी, ५ धोंडजी, ६ तुकोजी, ७ कृष्णाजी, ८ रामाजी, ९ तुळाजी , १० सुभानजी. एकूण दहा. राघोजी आंग्रे यांचा अम्मल शके १६८० पासून १७१५ चे चैत्रमासपर्यंत. त्यांनी आपले भाऊबंदांस एकविचारें ठेविलें. उंदेरीकर हपशी जेव्हां तेव्हा प्रांत प्रांतांत दंगा करून मुलखाची खराबी करी. यास्तव पूर्वी कैलासवासी आंग्रे यांनी पेशवे यांस विदित केलें होतें तें स्मरण मनांत धरून किल्ले उंदेरी येथें आले. तेव्हां तेथे सिद्दी जोहार फकीर महंमद याचा अम्मल होता. श्रीमंत पेशवे हे लष्कर घेऊन व बरोबर सरखेल यांस घेऊन उंदेरीस गेले. तेथें उभयतांची लढाई होऊन पेशवे यांनी उंदेरी काबीज केली, शके १६८० माघमास. तेथील मामलत नारो त्रिंबक यास सांगितली. राघोजी आंग्रे सरखेल हे राजासनीं बसल्यावर चार पुंड होते त्यांचा बंदोबस्त करून, जागोजाग रयत पळून गेली होती त्यांस कौल देऊन गांवचे गांवी आणून वसाहत केली. दर्यामध्यें सावकार लोकांपासून खंडण्या घेण्याची वहिवाट होती त्याप्रमाणें घेत होते. उंदेरी पेशवे यांजकडे गेली. पूर्वीप्रमाणें दुतर्फा वहिवाट चालत असे. चेंऊल शहर दंग्यानें मोडून उद्ध्वस्त होऊन जंगलादाखल जाहालें होतें, ते शके १६९२ सालीं कौल देऊन बसविलें. प्रांतांत कोणाचे वैर नाहींसें होऊन सुदामत राज्य केलें. शके १७१५ चे चैत्र मासीं राघोजी आंग्रे यांस देवाज्ञा जाली.