Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
अवघियांची नावें जाहलियावर, शिदोजीबावा बराबर पांच सात माणूस बरेच होते त्यांणी अंगेजणी करून गोष्टी सांगितली की, महाराज ! चव्हाणाशीं जामीन होणे हें आपणास कधी बोलवणार नाहीं, याजउपरी आपली शंभर वर्षे पुरली, महाराजाचे चित्तास येईल तें करोत. ऐसे निष्ठुर बोलले. नंतर मग निकाल काढिला जे, हें कांही चव्हाणाचे विचारांत येत नाहींत, याजउपरि मजलसीत अतिशय कामाचा नव्हें, ऐसे मनात आणून मग बोलिले जे, तुमचा लेक वोलीस ठेवणें. तेव्हा बावाजी थोरात यासी वोलीस ठेविलें आणि पंधरा रोजांचा वायदा केला. तेव्हां मकाजी मुलिक तेथें होते त्यांचे हवाली बावाजी थोरात यांसी केलें. मग तोही भला माणूस जामीन होऊन कदबा दिल्हा आणि शिदोजी बावांनीं निरोप घेऊन गांवास आले. तव रजबदली लागली जे तुह्मीं सचंत्र चाकरीस राहणें. बहुत कांहीं समाधानाचीं उत्तरें बोलोन ठेवावें ऐसें योजिलें. मग समस्तांनीं सोबतीचे लोकांनीं विचार शिदोजी बावास सांगितला, याजउपरि येथें राहिल्यानें आपलें बरें नाहीं, घात होईल. ऐसें संमत दिलें. तेव्हां निष्ठुर सांगितलें जें, आपण महाराजाची चाकरी करीत नाहीं. ऐसें चार पांच रोज सांगतच असतां, शिदोजी घोरपडे व पिराजी घोरपडे, यांची कलागत वाढली. तेव्हां शिदोजी घोरपडे यांनीं शिदोजी बावांसी राजकारण लाविलें जे, तुह्मांस मुलुख देतों, सध्यां तुमचें कर्ज वारितों. ऐसें बोलोन ठीक करोन, आपले गोटापाशीं नेऊन याशीं उतरविलें. तंव पुढें चौ-रोजीं उभयतांचें झुंज जाहलें, तेव्हां आपले बाप शिदोजी बावा यांनीं जीवादारभ्य श्रम केले. पिराजी घोरपडे याचा मोड जाहला. पराभव ते पावले. महाराज व विठोजी चव्हाण मात्र राहिले. शिदोजी घोरपडे शेजारी येऊन राहिले. मग महाराजाचा व त्यांचा बनाव न बैसे. मग शिदोजी घोरपडे निघोन आपल्या देशास चालिले. आपले तीर्थरूपास बराबर चला, तुह्मांस कबूल केलें तें देऊं, ऐसें बोलतांच, लोकांनीं दंगा फारच केला जे, सध्या कर्ज वारावयासी देऊ केलें तें नाहीं आणि कर्नाटकास रिकामें यांजबराबर जावें यांत नफा नाहीं, हा विचार करोन, तेथोन निघोन चिकोडीस आले; तव राव प्रतिनिधि कर्नाटक प्रांतीं मुलुखगिरी जावयासी निघाले. ते पंचगंगेवर मुक्काम केला आणि शिदोजी बावाकडे पत्र पाठविलें जें, तुह्मीं आपले भाऊ आहा, आपण मुलुखगिरीस निघालों तुह्मीं बराबर असावें, तुमचें सर्व प्रकारें चालवावयासी अंतर होणार नाहीं. ऐशीं पत्रें व कारकून पाठविलेवर शिदोजी बावा जमावसुध्दां येऊन भेटी घेतली. आणि अष्टेचें ठाणें व सरंजाम द्यावा हा मुद्दा घातला. तेव्हां तो मुद्दा राव प्रतिनिधि यांनीं कबूल केला. अष्टेचें ठाणें दिल्हें. तेव्हां जाखलेमध्यें मुलें माणसें होतीं तीं आणून जाखलें त्यांचे हवाली करून, बावाजी थोरात यासी सोडवून आणविलें. रावप्रतिनिधि बराबर मुलुखगिरी करून माघारे आले. शिदोजीबावास निरोप दिल्हा. अष्टेत राहिले. ऐशीं पांच सात वर्षें प्रतिनिधीची चाकरी केली.