Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[३१३] श्री. १५ सप्टंबर १७४३.
श्रीमत् तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें मानाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेऊन कृतानेक विज्ञापना अत्रत्य कुशल भाद्रपद शुध्द त्रयोदशी सौम्यवासर पावेतों स्वामीचे कृपावलोकनेंकडून येथील वर्तामानें यथास्थित असे. विशेष. आशीर्वादपत्रें पाठविली ती प्रविष्टकालीं परम आनंदातिशय जाहला. प्रसाद व वस्त्र तिवट कळसपाकी पाठविलें तें शिरसा वंदिलें. त्याजवरी स्वामीची आज्ञा जाहली कीं, सखलादी आंगी व जिन्नस ऊद व दारू व डाळ उडिदाची व तुरीची व दुबत्यास ह्मैसी दोन व गाई दोन व खर्चाची अनकूलता व दोनशें बैलाचे दस्तक देऊन बावाजी हरकारे यासमागमें रवाना करणें, ह्मणून त्याजवरून आज्ञेप्रमाणें सखलादी कुडती एक व गाई दुबत्या दोन व ह्मैसी दोन दुबत्या विजाईत पाहून पाठविल्या आहेत व तूप पांच मण व दारू चार मण पाठविलें आहे. दस्तकाविसी आज्ञा केली तरी अलाहिदा पुरवणी सेवेसी लिहिली आहे. त्याजवरून विदित होईल व सुरणकंद वजन एक मण पाठविला आहे. आज्ञेप्रमाणें कांहीएक जिन्नस मिळाला नाहीं. याजकरितां रवाना करावयासी अंतर जाहलें. वरकड अपत्यांची निष्ठा ऐसी आहे कीं स्वामीचें सेवेसी अंतर सहसा करणार नाहीं. याजकरितां जिन्नस पाठविला आहे. तो कृपा करून मान्य केला ह्मणजे अपत्यांचें गौरव होऊन कृतकोटी केलें असें होईल. आह्मांस आपले चरणापेक्षां दुसरा अर्थ आहे ऐसें नाहीं. परंतु प्रस्तुत कालें प्रसंग येऊन पडला आहे. त्याचा अर्थ लिहितां पुरवत नाहीं. आपले आशीर्वादेकरून अनकूलता होऊन येईल. येतद्विषयीं बावाजी हरकारे सेवेसी श्रृत करितां अवगत होईल. सेवेसी श्रृत होय. हे विज्ञापना.