Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[२६६] श्री. १४ जानेवारी १७३१.
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भृगुनंदनस्वरूप स्वामीचे सेवेसी :-
सेवक संभाजी आंगरे कृतानेक साष्टांग दंडवत प्रणाम विनंति उपरि येथील कुशल पौष बहुल तृतिया गुरुवासर पावेतों स्वामीच्या आशीर्वादेकरून सुखरूप असो विशेष. स्वामीनीं आशीर्वाद पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ कळों आला. सारांश, कृष्णंभटाचे देशमुखीचा अर्थ आज्ञापिला तो कळला. हाच वृत्तांत दत्ताजी कनोजे यांजबरोबर स्वामीनीं पत्रांरूढ करून मुखताही सांगोन पाठविलें होते. त्याचें उत्तर मशारनिल्ले याजबराबरी लिहून पाठविलेंच असें, त्यावरून विदित होईल. वरकड परभू व बाजी सांठा यांणी दुर्बुध्दी तुमचेवरी धरिली आहे. कोणाचे हातून खाऊं जेवूं नको, उदक न घेणें, ह्मणोन आज्ञा. तरी दुर्बुध्दी धरून काय होणें ? ज्याचें जसें आचरण असेल तसें ते फल पावतील. जेवणखाणास आह्मी कोणाचे घरी जात नाही. गांव सौभाग्यवतीस इनाम करून देणें ऐसें आपण लिहिलें, तरी हा दंडक तीर्थरूपापासून चालत आला आहे की काय ? यददाचलती श्रेष्ठ या न्यायें वर्तत असों. आपलें वेगळे, सौभाग्यवतीचें वेगळें, ऐसें होत गेले ह्मणजे तीर्थरूपांनी बंद करून दिल्हा आहे तो राहिला कोठें ? त्यांणी अढळ पाया घालून दिल्हा आहे. त्याप्रमाणें राहाटी झाल्यानें मामल्याचा अबरू राहतो. अन्यथा, आहे विचार तो स्वामीस अविदित आहे, ऐसें नाहीं. संक्रमणाचा तीळगूळ पाठविला तो अत्यादरें करून भक्षिला. विदित जाहलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपा वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.