Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)

[१९३]                                                                       श्री.                                                           

राजश्री याविराजित राजमान्य राजश्री बाबूराव कोन्हेर स्वामी गोसावी यांसी :-
पोष्य बाळाजी बाजीराव नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणे. विशेष. आमच्या नजरेचें रुपये व चिरंजीव राजश्री भाऊचे नजरेचे रुपये करार केले ते अद्याप दिल्हे नाहीं. आमचे कारकून समागमें नेले त्यास हा कालवरी ठेविले. रुपये देत नाही. असो. नजरेच्या रुपयांची चिंता काय ? तुह्मी कबूल केल्याप्रमाणें द्यालच. राजश्री मुधोजी भोसलें येथें असतां अकरा लक्षांचे महाल द्यावयाचा करार ठहरला. त्यांचे कमाविसदार समागमें नेले. त्यांस महाली दखलकार केलें नाहीं. महालचा पैका मन माने तो वसूल घेतला. महाल खराबींत आणिला. मशारनिल्ले आमच्या वचनावरून मोहिमेस हिंदुस्थानात गेले. सावकारापासून कर्जे रुपये सरकारचे मध्यस्तीने मशारनिल्हेस दिल्हे. त्यांचा रुपया त्यास न पावला. तर हे गोष्ट कशी ठीक पडेल! मशारनिलेचे कमाविसदार समागमें नेले त्यास महाली दखलकार केले असते तरी कांही वसूल त्यांजकडे पडता, कांही तुह्मांकडे सनदपैवस्तीपासून पडता. ते गोष्ट न करितां बिलकुल वसूल तुह्मी घेतला. हालसालचाहि घेतां ह्मणोन कळों आले. ऐशास, आह्मीं बोलाचालावयाची गोष्ट बाकीस ठेविली असें नाहीं. मशारनिलेंनी सावनूरच्या मुक्कामी चाकरी केली ते सालचे चार लक्ष रुपये तुह्मी वाजवी त्यास द्यावे ते न देतां आह्मावरी पाडिले. आह्मी त्यास दिल्हे. सालगुदस्ताचें तो तुह्मी त्यांस अकरा लक्ष रुपये द्यावे, त्यास घालमेल करून वसूल झाडेयानशीं घेतला त्याचे, कमाविसदार बैसवून ठेविलेत. हे कोण गोष्ट! अकरा लक्ष रुपये तुह्मास सुटतात ऐसा अर्थ नाहीं. पत्रदर्शनी अकरा लक्ष रुपये पाठवून देणें. येविशी राजश्री जानोजी भोसले सेनासाहेब सुभा यांस लिहिले आहे. तुह्मी त्यांचे यख्तियारिही तुह्मी आहा. दीर्घदर्शत्वें सर्व आपण समजावून व तुह्मीहि उचित रीतीनें ध्यानास आणून रुपये पाठवून देणें. वरकड गोष्ठी आणीक एखादे जागा चालतील. आह्मांजवळ बोलोन चालोन करार जाहाला असतां त्यास नवदीगर करावें ह्मणावें हें कसें ठीक पडेल ? अशा गोष्टी सहसा तुह्मी सरकारी करूंच नये. अशा गोष्टीनें परिणाम लागेल न लागे तो तुह्मास न कळेसा काय ? या उपरि अकरा लक्ष रुपये सत्वर पाठवून देणें + करार केल्या गोष्टी वरकडाप्रमाणें येथील ढकलीत न्याव्या, गोड ल्याहावें, असे सहसा न करावें हेच उत्तम. सत्वर यथार्थ काय तें उत्तर पाठवणें. छ २५ सवाल हे विनंति.