Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्रीशंकर.
लेखांक १२९.
१६९७ माघ शुद्ध २.
राजश्री लक्ष्मणपंत अण्णा स्वामीचें सेवेसी :-
पोष्य सखाराम हरी साष्टांग दंडवत प्रणाम विनंति येथील वर्तमान ता। माघ शुद्ध द्वितीयापर्यंत यथास्थित असे. विशेष. पूर्वी आठा दिवसांत वर्तमान जालें तें अलाहिदा लिहिलेंच आहे. कारनेलीची बेमर्जी आह्मांवर त्यासी कारणें तुह्मांस दिसतच आहेत. निमित्य, गाडे सुरतचे वाटेवर येतां लुटलें तें तुचे रावतांनी, हें ठेविलें.त्याचा मुद्दापत्ता कांही लागेना. फितुरियांकडील पेंढारी येऊन कही मारितात. हेच गोष्ट पक्की दाखल्यांनी पुरली. यामुळें विचारावर कारनेल आले आहेत. परंतु वारेवीराचे दु:ख पेडवली याचें आहे. मसलत सर्व त्याजवर. याजमुळें मात्र सर्व सोसावें लागतें. विलाज नाहीं ! आह्मीही वोढिलें नाहीं. लाचारीस मात्र कूच करून चाललों. परंतु श्रीमंत येऊन माघारे आणिलें. आह्मीं मानाजी शिंदे वगैरे फौज मिळोन तफावतीनें डावे बाजूस उतरलो आहोंत. रात्रंदिवस घ्यास तुह्मांकडील लागला आहे. हरतरेनें अपटणास मोह जनरालाजवळोन पाडवावा आणि मसलतच सर्व सिद्धीस न्यावी. मूल खरें, याजवर भांडण भांडतील. तरी मुलाविसीं इंग्रेजांनी खातरजमा करून श्रीमंताचे वोटीत घालावें त्यास दगा पेंच नाहीं. परंतु फितुरियाचें पारपत्य झालें पाहिजे. त्याणीं मूल नसतां विनाकारण फितुर केला व दौलत गारद करून मोगलास दिली. पुढेंही लबाडी करतात. वचनें, प्रमाणें देऊन श्रीमंतांसीं बेमानी केली. पुढेंही इतबार नाहीं. त्यांचा अभिमान गैरवाजवी याणीं नच धरावा. ऐशी गोष्ट ज्या तरेनें होईल ते खटपट साधन आण्णा ! करावें. तुह्मीं कराल तें येथें निभेल. परंतु सर्व मसलतीचा गुना तुह्मावर आला आहे. याचें विस्तारें कोठवर ल्याहावें? इतके दिवस श्रममेहनत केलियाचें सार्थक निरार्थक होऊं न द्यावें. निदान जें मागतील तें इंग्रेजांस देऊं. राहील तीच दौलत करूं. परंतु नबाबसुद्धां फितुरियाचें पारपत्य घडे तेच गोष्ट करावी. यांत श्रीमंतही कबूल आहेत. तूर्त लांबणीवर पडलें. येथें तापीतीरीं दोन महिने जालें. वैरण बारा पंधरा कोस, तेही मिळेना. महागाई, पोटास नाहीं. ऐसा पेंच जाला आहे. बारा पंधरा कोस कही जाती, तेव्हां फितुरियाकडील पेंढारी, बेदड व धाड्या राऊत निवडक येऊन कहीवर घालवितात. रखवालीस पथकें पाठवावीं तीं एकीकडे जाऊन दगा भलतीकडे होतो. त्यांतही नित्य फौजेनें जावें, हेलपटे, पोटास नाहीं. आह्मीं, मानाजीबाबा आणखी एकदोन टोळिया, ऐसें बारीनें जावें. त्यांत वरकड गेले तरी दगाच होतो. मानाजीबाबा, आह्मी जावें, तरी नित्य पंधरा कोस जाणें येथें पडतें. फौज खराब होत चालली. सबब, हरतरेनें तजवीज करून येथोन दहा पंधरा कोस कूच चारापाणी पाहून सोनगडापुढें पूर्वेस घडे ते गोष्ट करून परवानगी पाठवावी. येथें बसलियानींच परिणाम लागून फौज जगत नाहीं. येविसींचें साधन करून जरूर परवानगी पाठवावी. बारी चढोन गेलियांत सर्व मसलत सिद्ध आहे. मोठे हंगामाचे दिवस जातात. फितुरियांकडील फौज गलबलली आहे. सर्वांची राजकारणें सिद्ध: परंतु बारी चढावी हें व इंग्रज काय करितात. इतकी वाट पाहतात. पुढें लढाई अगर फार दिवस मेहनत इंग्रेजांस पडत नाहीं. सहजांत हे रूख मात्र होऊन खानदेशांत गेले ह्मणजे मसलती सिद्धीस जातील आणि सर्व गोष्टी त्याच्या व श्रीमंताचे मनोदयानरूप घडतात. त्याविसीं तुह्मांस तिकडेही समजतच असेल. येथून ल्याहावेसें नाहीं. सूचनाअर्थ लिहितों. वाचावयास कंटाळा न करावा. तूर्त कारनेलानीं फितुरियावर रोष धरावा, त्याचे अपराध त्यास शासन योजावें; तें सोडून आमचेच गळां पडेल. लाचार होऊन सोशीत आहों. श्रीमंतांचे मर्जीचाही दुसरा अर्थ नाहीं. कृपाच करीत आहेत. परिणामावरि सर्व नीट आहे. गाइकवाडाचें आहे तसेंच आहे. कांही एक नवें घडलें अथवा घडणार नाहीं. मसलत ज्यारी जाली ह्मणजे श्रीमंतांचे चाकरीस फौजसुद्धां गोविंदराव यांस आणितों. येथील गुंता नाहीं. दुसरें तरी इंग्रजच होऊन राहिले आहेत. मेस्त्र इष्टोलाजवळोन आमची फर्मास व येक आरबी घोडा वळो करावयाला एक मागावा. रामसिंगास सांगत जावें. त्याचें वर्तमानही लिहीत जावें. बहुत काय लिहिणे ? कृपा लोभ कीजे. हे विनंति.