Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड बारावा (रघुनाथराव, बाजीराव)
श्री.
लेखांक १०२.
पो छ २६ साबान
१६९७ आश्विन वद्य ५.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री लक्ष्मणपंत अण्णा स्वामीचे सेवेसी :-
पो रामचंद्र विठ्ठल कृतानेक दंडवत प्रणाम विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे. विशेष. आपण गेल्यादारभ्य पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी ऐसें नसावें. सदैव आपलेकडील वृत्त लिहीत जावें. इकडील वर्तमान तरी श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांची स्वारी बडोदियाहून निघोन छ ११ शाबानीं रणगडास रेवातीरीं येऊन दाखल जाली. श्रीमंत राव व सखाराम हरि गायकवाडाचे कारभाराकरितां मागेंच आहेत. आजपर्यंत खासा स्वारी या प्रांतें रहावयाचें कारण, सुरत अठ्ठाविशींत चिखल भारी, तोफा चालावयाचे संकट.
दुसरा प्रकार : गुजराथ निर्वेध करावी. बडोदे-अहमदाबाद घ्यावी, मसलती पुढे जाण्यास पृष्ठी बल, या अर्थे राहिलों. त्यास फत्तेसिंग गायकवाड याचा कारभार कारनेल किटीण यांचे विद्यमाने जाला. पंचवीस लाख ठरले. एक महिन्यांनी पंधरा द्यावे. दुसरे महिनियांत दहा द्यावे. जर पहिल्या हप्त्याचे पंधरा न आले तरी बडोदे घेऊन द्यावें. याप्रमाणें करार होऊन कारनेलीचें जातखत लेहून घेतलें. त्यास पहिले हफतियाचे रुपयेन आले. ऐवजाचे लोभास्तव केलें होतें तें न जालें. बडोदें घेऊन द्यावें, तेंहि किफायतच. त्यास, बडोदें घेऊन देईनात. तयाचा पक्ष करूं लागले. राजश्री गोविंदराव यासी करार केला होता कीं, पहिल्या हफत्याचे न आले ह्मणजे बडोदें घेऊन देऊं. त्यासही भरंवसाच होता कीं, फत्तेसिंगास रु॥ मिळत नाहींत, दिवस काढितो, वाइद्यास जिंकोन बडोदे घ्यावें, याप्रमाणें होता. त्यास दोन्ही गोष्टी कराराप्रमाणें न जाल्या. दुसरा हप्ता होऊन गेला; पहिल्यास ठिकाण नाहीं ! तुह्मीही माहीत या गोष्टीस आहां. आजपर्यंत साडेसहा लक्ष मात्र अजमासें सरकारांत आले. वरकड ठिकाण नाहीं. तेव्हा इकडून निकड होत गेली. रुपया न मिळे. तेव्हां गोविंदरायास हिस्सा दौलतेचा तिसरा देतों, तिसऱ्या हिशाचे रुपये त्याजकडे सोळा लक्ष सासष्ट हजार सासे ऐशी देऊं. याप्रमाणे मध्यस्ताचे तर्फेनें त्रिंबकजी भालेराव बोलून गेले. पट्टण वगैरे ठाणी, सलूकसुद्धां, सरकारांत द्यावीं, गोविंदरायाची समजावीस करावी, बोलिले. त्यास, गोविंदराव मान्य नाहीं. सरकारांतूनही दोन तीन लाखांची कबूल केली असतां, त्याणीं वोढून, कूच करोन महिपार गेले. फत्तेसिंगाकडून ठाणीं सरकारांत यावी, मग थोडेंबहुत सरकारांतून देऊन गोविंदरायास दाबून दबावून समजावीस करावी, तरी ठाणींही फत्तेसिंगाकडून येत नाहींत, हाली गोविंदरायाचेच हवाली करार, ऐसी दिक्कत करितात. सरकारचे रुपये दोहिशाचे ह्मणावे तरी, गोविंदरायानीं वसूल घेतला ह्मणून पर्याय लावितात. ऐवजास ठिकाण नाहीं पाहासोट हा महाल दरमहाचे ऐवजीं इंग्रजाकडे दिल्हा आहे. तो बक्षीस कोपिनीचे सरकारांत घ्यावा ह्मणजे फत्तेसिंगाकडील ऐवज व तिजाई वांटणी व चाकरी वगैरे जावसालाचें फडशे करोन देतों, ह्मणून कीटणीनें दरम्यान आड घातली. तेव्हां परगणेजकूरची सनदहि करोन, मध्यस्त बोलणार त्यांजवळ दिल्ही असतां रुपये देत नाहीत व गोविंदरायाचा विभाग देऊन त्याची समजावीस होत नाहीं. ऐवजाचे लोभास्तव व मसलतीचा उपयोग पाहून कारभार केला. त्याची गत ही केली ! हालीं आणखी अडीच लक्ष एक महिन्यानीं देऊं, ह्मणतात. गोविंदराव गेलेच आहेत. त्याणीं मुलकांत उपद्रव केला ह्मणजे तेहि ऐवज त्यांचे वसुलांत गेला, ह्मणतील. एवंच ऐवज नाहीं. पदरचे गोविंदराव फौजसुद्धा गेलें. फत्तेसिंगाचे चाकरीचा उपयोग नाहीं. कीटणीचा आश्रय करून बसले. चहूंकडून मसलतीस पेंच पडला. खर्चाची वोढ, लोकांचा गवगवा, तो लिहितां पुरवत नाहीं. अहमदाबाद घ्यावी, त्यास इंग्रजाचे नेट कमी पडलें. गोविंदराव उठोन गेला, तो शहरात गेला ह्मणजे भारी पडेल, याजकरिता आपाजी गणेश यांनी आपलेकडेच मामलत ठेवावी ह्मणून संदर्भ लाविला. तें कबूल करणें प्राप्त झालें. चार पांच लक्ष रुपये त्यांनी द्यावेसें केलें आहे. परंतु ठाणियांत सरकारचें माणूस नाहीं. तेव्हा त्याचा अर्थ कळतच आहे. ऐसें चहूंकडून गायकवाडाचे कारभाराचे वोडढण्यामुळें मसलत फसली. उपाय याजपुढें नाहीं. याजकरितां हे मजकूर जनरालासी बोलोन काय करावें तेसला पुसणें. ऐवज येत नाहीं त्यापक्षीं फत्तेसिंगाच महाल जप्त करून ४ रु. घ्यावयास येतील. फौजेचे पोटाची सोय पडेल. याजकरितां त्याचे विचारास कसें येतें तें पुसणें. कारनेल सरकारचे उपयोगाचें ते करितो, ह्मणतात. परंतु ऐसे प्रकार आहेत, समजत नाहीं. आजपर्यंत सोशिले. हालीं लोक उठोन जावयाचे विचारावरी आले. पैक्यास दर्शन नाहीं. भाषणाचेच प्रकार. बोलण्याचा धरच नाहीं. ऐसे आहे. रवाना. छ १७ शाबान. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति. कोणताही कारभार विल्हेस लागेना. बडोद्याजवळ खराब होत बसावें, याजकरितां श्रीमंतांनीं कूच करोन रेवातीरास यावयाचेंकेलें. चार दिवस श्रीमंत रायास मागें ठेविलें. कांही सोय पडली तर पाहावी. ह्मणून ठेविलें. परंतु कोणतेंही घडत नाहीं. याजकरितां जनरालास सला पुसोन ल्यावें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति. जरी इंग्रेज श्रीमंताचे हुकुमांत असता, तरी फत्तेसिंगाचे कारभाराचा बखेडा न होता. गोविंदरायांसहि दाबून सांगावयास येतें. येथील गृहस्थाचे वोढण्यामुळें मसलतीची घाण झाली. तुह्मांस कळावें. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.