Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक. ८९
श्री.
१६९५ फाल्गुन वद्य ५
राजश्री नानाजी कृष्ण व राजश्री बाबूराव विश्वनाथ गोसावी यांसीः-
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो साबाजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. इकडील वर्तमान वरचेवर लेखन होतच आहे. नांदेडच्या मुकाम राजश्री कृष्णराव आह्मांजवळ पोंचल्यावर तैसेच दरकूच येत आहों. तांब्रांकडील राजकारण पहिलेंच आहे. त्याजकडील ज्ञानराव गिरधर आला होता. त्यास रवाने केला. ज्याबितजंग यासीं आणावयाबद्दल राजश्री दिवाकर पुरुषोत्तम पारा आणि दर मजल आलों, नबाबाकडून पत्रें आलीं कीं, आपण कलबुर्गियाचे सुमारें येत असों. त्याजवरून, छ १६ जिल्हेजीं राजश्री भवानी शिवराम नबाबाकडे पा. या मामाच्या तर्फेनें या शिवाजी विठ्ठल यांजकडील चिमणाजीपंत त्या समागमें दिल्हे. काल छ १८ जिल्हेजीं बुधवार फाग वद्य पंचमी प्रहर रात्रीस रुकनद्दौला व शर्फुद्दौला व वीरबाहदर यांच्या भेटी जाहाल्या. दोन कोस ते अलीकडे आले. आह्मीं व राजश्री मामा इकडून दोन कोस गेलों, भेटी होऊन आपापले गोटास आलों. नबाब निजाम उद्दोला यांच्या भेटी उदईक होऊन, पुढील चालीचा प्रकार होणें आहे. राजश्री रघुनाथराव दादा यांजकडून भिवुणखान मेवाती व राजाराम गोविंद ऐसे नबाबाकडे आले आहेत. त्यांसहि नबाब उदईक बिदा करणार. दादा माघारे फिरले. इतकें मात्र वर्तमान. आहे. ठिकाणबंद कोठें आले, मजकूर काय, हा प्रकार नाहीं. बातमीस माणसें गेली आहेत. आलियावर लेहूं. दादांची पत्रें आलिकडे आह्मांस दोन तीन आलीं कीं, तुमचे मतलब होऊन येतील, तुह्मीं रा त्रिंबक विश्वनाथ यांसीं भेटला हें उत्तम केलें, तरी अती सत्वर येणें. त्यास, आह्मीं साफ उत्तर दिल्हें. त्याचा मसोदाही आहे. सारांश, अतःपर लांबण होऊ नये, येविशीं राजश्री तात्यांनी लिहिलें आहे, त्याजवरून कळेल. येथें तो रुा अगत्य पाहिजे. व आमच्या लोकांचा गवगवा मिटोन आदी होणें. दोन चार लाख रु। कोणत्याहि प्रकारें जरूर आहे. आह्मीं कायावाचामनें सर्व प्रकारें तुह्मांजवळ आहों. तुह्मीं मुरबीयांस प्रांजल सांगावें. निशा केलीच आहे. तत्रापि, साहित्यप्रकार अमलांत यावा. हें जाहले पाहिजे. रा छ १९ माहे जिल्हेज, बहुत काय लिहिणे ? हे विनंती. मोर्तबसुद.