मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ६३८

श्रीलक्ष्मीकांत.
१७२५ आषाढ वद्य २

राजश्री नारायणराव वैद्य गोसावी यांसीः-

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. तुह्यी एकदोन पत्रें पाठविलीं तीं पावलीं. लिहिला मजकूर कळला व राजश्री सदाशिव बापूजी यांचे लिहिल्यावरून व राघो धोंडदेव यांचे विनंतीवरूनहि सविस्तर समजण्यांत आलें. त्यास, येथील प्रकार वरचेवरी राजश्री सदाशिव बापूजी यांसी लिहिण्यांत येत आहे. त्याजवरून तुम्हांस समजतच आहे. व हालीही कित्तेक प्रकार मशारनिलेस लिहिण्यास बाकी ठेविली नाहीं. तेहि तुम्हीं समजोन घ्यावेत. व राघो धोंडदेव यांसीहि सर्व प्रकार सांगण्यात येत असेत. ते लिहीत असतील व लिहितील, त्याजवरून समजण्यांत येईल. तुम्हीहि चांगलें मनन करून व तेथेंहि बोलावयाचें तें बोलून, जी सलाह असेल ती लेहून पाठविणें. तुम्हांसी येथील दुसरा प्रकार आहे, ऐसें नाहीं. तेव्हां हाच भरंवसा आहे कीं, जे घडणें तें समजोन घडेल व चांगलेंच समजण्यांत येईल. व तुम्हीं सुचविण्यास कमी कराल ऐसें नाहीं. पुढील विचार तुमचे ध्यानांत नाहींत, ऐसें नाहींत. तेव्हां बरें वाईट चांगलें पाहून, जी सलाह तेंच ल्याहावें. येथील लक्ष तो एकच आहे, ही खातरजमा पुर्ती असावी व आहेच, तेव्हां तपशील ल्याहावा, ऐसें नाहीं. पत्राचीं उत्तरें अति सत्वर यावींत. व त्याजवर येथील लक्ष राहावें, हेंच चित्तांत लागून आहे. आपले कडूनहि सुचतें तें लिहिण्यांत कमी करीत नाहीं व पुढेंहि होणार नाहीं. हे सर्व प्रकार लिहिल्यावरूनच लक्षात येतील. वरचेवरी पत्र पाठऊन वर्तमान लिहित असावें. रा छ १६ माहे रबिलावल. बहुत काय लिहिणे ? हें विनंती. मोर्तबसुद. शिक्का.

Joomla! Debug Console

Session

Profile Information

Memory Usage

Database Queries