Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)

पत्रांक ५९४

श्री. ( नकल. )
१७२४ भाद्रपद

यादी श्रीमंतांस विनंति करावयाची निरउपाय जाणोन. १ येथें आजपर्यंत आमचें राहणें श्रीमंताचे प्रतापेंकरून बहुत दिवस. त्या लौकिकाप्रमाणें वागणें प्राप्त. त्याकाळीं आम्हांसही येथें फारसा खर्च लागत नव्हता. याचें कारण काय म्हणाल तर, आम्हीं येथें सडेच राहणार, त्याजमुळें व काम पडल्यास कोठेंहि दहापांच हजार उसने मिळत होते. ते सांप्रत हिकडे पेंढारी वगैरे ह्यांचा दंगा व राजकीय ही कित्येक उपद्रव, याजमुळें कांहीं खराबी व ज्यापास असेल तोही छपून वागतो. अशी अवस्था. याजमुळें हजार पांचशांचा मोबदला होऊं सकत नाहीं. सांप्रतकाळीं काशीयात्रेचाही मार्ग हाच पडला. चार देशांतील ओळखी भेटतात त्यासंबंधें यात्रा जातां येतां आगतस्वागत मिळून तीन हजार रुपये खर्च लागतो. व लग्नकार्याचे दिवस आले असतां, येथील सरकारी वे संभावित स्नेही ग्रहस्त मंडळीच्या येथें कार्यों जाहालीं असतां अहेर करणें प्राप्त. परत अहेर करण्याचा सांप्रदाय नाहीं. तेव्हां त्यासंबंधी दोन हजार रुपये खर्च लागतो. याजकडून पंधरा हजार रुपये मिळतात. परंतु ओढीमुळें चार सहा महिने हातास येत नाहीं. त्याजपुरती घरबेगमी घोडी सिबंधीं वगैरे व भोंसले यास मेजवान्या भोजनखर्च वगैरे मिळून, त्यांत कांहीं न रहातां, तीन चार हजारपर्यंत अधिकच लागतात. शिवाय, आला गेला याचा उपद्रव, याजमुळें दिवसेंदिवस खर्च अधिक वाढला, हें ध्यानांत यावें, म्हणोन तपशिलें लिहिलें आहे. सरकारची गांवखेडीं सरंजामास आहेत. तेथील ऐवज तुम्हांस व खंडोपंतास पुरत नाहीं. याजमुळें तेथून हुंड्या करितात तें वेगळें, याचे साक्ष तुम्हींच आहां.

देशापेक्षां हिकडे सवंगाई, व नारायणराव आमचे तेथें रोजगारी सरकांतुन आहेत, असें म्हणून जांवई व मामा, मावसबंधू आप्तविषई, चार इष्टमित्र, भिक्षुकब्राम्हण बहुतां दिवसांचे आश्रित तेथें आले आहेत. तेव्हां इतक्यांचा निरवाह करणें प्राप्त. व आपला विषय तो असा आहे !

मी पुण्यांत असतां, कोणीएक सावकारास काम पडलें. तेव्हां, श्रीमंतांनी त्याचा अब न जावा, याकरितां रात्रीस दोन लाख रुपये दिल्हे. दुसरे दिवशीं त्या गोष्टी निघाल्या. तेव्हां आज्ञा जाहली कीं, जो माझा आहे तो समक्ष असतां त्याचे जसें चालवावयाचें तसें चालत आहे. परंतु तो दूर देशीं असतां व त्यास संकट पडलें असें मजला समजलें असतां, असेल तेथपर्यंत अशाची उपेक्षा करणार नाहीं. त्या गोष्टीची आठवण मजला वारंवार होते. व तेथेंही स्मरण व्हावें म्हणोन ही गोष्ट लिहिली आहे. सावकार कोणता तें ध्यानांत येईलच. सांप्रत तसा प्रसंग प्राप्त जाहला आहे. तो कसा म्हणाल तर, काशीयात्रेचें देणें तसेंच आहे. व नित्यनैमित्य ज्या काळीं जें प्राप्त होतें त्याप्रमाणें खर्च करून आला दिवस लौकिकाप्रों कंठावा लागतो. येथील जन्मापासून स्थाई परस्परे सोयरेधायरे त्यांस देखील कर्जवाम मिळत नाहीं. तेव्हां आह्मी परकीय आह्मांस कर्जवाम कसा मिळेल ? तेव्हां हाही उपाय राहिला. भोंसले यांस तो दैन्य दाखवावयाचें नाहीं. येथील चार इष्टमैत्र म्हणावे तरी, दरबारीयांचें घराऊ सुख दुःख सांगावें, असें नाहीं. अशा चहूंकडोन अडचणी जाणोन याची तोड मनांत आणिली कीं, श्रीमंत सर्वज्ञ, धणी, वडील, आम्ही अज्ञान, त्यांची लेंकरें, तेव्हां तेच संकटांतून पार पाडतील, असें समजून, पंचवीस हजार रुपये खासगीकडून कर्ज घ्यावे आणि त्याच्या हुंड्या तुम्ही तेथून करून पाठवाव्या. याची फेडीविषई जशी आज्ञा येईल तसें करावयास येईल. त्याप्रों कांहीं काशीस पाठवीन. म्हणजे उसार खावयास जागा होईल. आजपर्यंत सालाबाद बारा महिन्याचे बेगमीप्रों दोन महिन्यांची बेगमी शपतपुरस्कर नाहीं. तेथून असा उपराळा जाहला असतां उपयोग होईल. माझी उपेक्षा समक्ष होणार नाहीं. मग परकी स्थळीं असतां कशी होईल ? हा भरवंसा जाणोन लिहिलें आहे. परंतु तुह्मांकडून पत्रें दाखविण्यास व विनंती करावयास आळस जाहल्यास उपाय नाहीं. तेथें विनंती केल्यावर जशी आज्ञा होईल तसें करावें.

खर्च वाढला असे. कालदेशवर्तमान पाहून, कर्जास भेऊन, बंधू वेगळे निघावें अशा बेतांत आहेत. वेगळे जहाल्यास निर्वाह कसा करावा, हाही अंदेशा वागवून आहेत. मग पाहावें. आमची सोय सरकारांतून काढावयाची कल्पना कोणती म्हणाल तर, पंचवीस तीस घोडीं घरचीं आहेत. व आणखी पंचवीस घोडीं घरचीं करून, पंनास घोड्यांची पागा व त्यास हरकोठें बेगमी पुरते चार गांव वराडांत वगैरे लावून दिल्यास, बंधू हुजूर राहून चाकरी करितील, येणेंकरून त्याची सोय निघाली. वहिवाट्यास पडलेसें होतील, येविशीं त्यांची इच्छा बहुत आहे जे, नांव लौकिक करावा. आण मीही घोड्या माणसांचे खर्चातून मोकळा होईन. मग वडिलांची मर्जी असेल तसा निर्वाह करोत.

१ पेशजीचा संग्रह काय आहे, तोही तुम्हांस माहीत आहे. त्याजवर साल गुदस्ता चिरंजीव बंधूचें लग्न केलें. त्याचें कारण, आम्ही उभयतां बंधूंपैकी पुत्रसंतती एकासही नाहीं. चार उपाय करणें ते केले. तसा हाही उपाय सर्वांनुमतें करावा असें जाहालें. सबब, त्यासही नांव लौकिकाप्रमाणें वस्तवानी वगैरे खर्च केला पाहिजे, हात तर कोठें चालेना. सबब, मातुश्री व भावजई वगैरे बायकांची वस्तभाव घेऊन नवरेमुलीची भरती मात्र केली.

१ शिवाय, पाटण परगणेंयासी सालदरसाल पेंढारी यांचा दंगा जातां येतां, व होळकराकडील नागो जिवाजी व बंडवाले राजेरजवाडे वगैरे यांचा, व हालीं मीरखान याचा दंगा, याजमुळें प्रांतांत खराबा. तेव्हां ठाणें राखावयासंबंधी व बंडवाले यांच्या खंडण्यासच ऐवज कर्ज काढून घालावा लागते. हें पहिलेपासून तुम्हांस माहित आहेच व हिशेबही तेथें गेलेच आहेत. त्याजवरून समजलेंच असेल.

श्रीमंताच्या कृपेंकरून नांवलौकिकासही आलों व चार पैसे मिळवून संसारासंबंधी जीं जीं सुखें तीं सर्व भोगलीं. हें गृहकृत्य गौप्य असावें यास्तव सूचना लिहिली आहे. तुम्हीं विनंती करितां अशीच करावी, व तेथूनही घडेल, ही खातरजमा आहे.