Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५२०
श्री.
१७२२ माघ वद्य १०
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामींचे सेवेसी:-
विद्यार्थी परशरामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंती विज्ञापना ता। माघ कृष्ण १० पो। आपले कृपेंकरून यथास्थित असे. विशेष. इकडील वर्तमान बाळाजी कुंजर याचा बंधू पागे मौजे निवरी पाचेगांवचे मुक्कामीं आहे. पुढें गंगातीरास अ.ठ पंधरादिवस कालक्षेप करणार, सिवारची कही करितो. राजश्री शिवराम जोशीबाबा पुण्याहून काल शनवारीं प्रातःकाळींच टोंके यास दाखल जाले. त्यांनी पुण्याचें वर्तमान सांगितलें व चिरंजीव आणानीं मौजे शेवल्यास कारकून पाठविला. त्यांनी सांगितलें कीं, श्रीमंत शिवरात्रीस भिमाशंकरी जाणार, तेथें श्रीमंत अमृतराव साहेबही येणार, उभयतांचे भेटी होणार. आणानीं लिहिलें कीं, अमृतराव थत्ते यांचा हिशेब व पत्रें पो। ते पावले. त्यावरून त्यांस तगादा केला. त्याचें ह्मणणें कीं तूर्त ऐवज नाहीं. त्यास, आह्मी पुढेंही उद्योग करीतच आहोंत. या प्रमाणें लिहिलें. लग्नासही येत होतों, परंतु कुंजराचे पागेचे गडवडीकरितां राहिलों. वरकड वर्तमान सर्व यथास्थित असे. सरकारचाकरीस सावध आहोंत. कामामुळें कितकिांस संतोषअसंतोष आहे. आमचे लक्ष स्वामींचे पायांशी, अंतर तिळभर नाही, येविशीं खातरजमा आहे. आह्मीही एखादी गोष्ट करूं ती खातरजमेचीच करू. आह्मांस पुण्यास चिरंजीव आपांनी बोलावलें. परवां चिरंजीव यज्ञोबाची रवानगी केली. तेव्हांच बेत होता. परंतु आपली आज्ञा घेतली नाहीं ह्मणोन राहिलों. आतां शिवरात्र जाल्यावर जावें लागतें. आपली भेट जालियावर जाऊं. राणूजी हवालदार समक्ष आला आहे. यास रानचे रखवालीविषई ताकीद करावी. महारपोर परवानगीशिवाय आणूं न पावे. आमचा दाब ठेविल्यास सरकारचाही दाब रहातो. बहुत काय लिहिणें हे विनंती.
शेवेसी मल्हार रामचंद्र कुलकर्णी सां। नमस्कार, लिखितार्थ परिसोन लोभाची वृद्धी असावी. आह्मांस सर्व आधार आपले पायाचा आहे. लिहावे असा अर्थ नाहीं. सर्व प्रकार माझे चालवणें साहेबास आहे. हे विज्ञाप्ती.