Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १५७.
श्री.
१६९६ फाल्गुन शुद्ध १२.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी-
विनंति सेवक बाजी गंगाघर मुा बेलापुर चरणावर मस्तक ठेऊन सां नमस्कार विज्ञापना तागाईत छ १० माहे मोहरम पावेतों स्वामीचे कृपावलोकनें करून सेवकाचें व तालुके मजकुराचें वर्तमान यथास्थित असे. विशेष. काल रविवारीं संध्याकाळीं राजश्री रणछोड शेणवी वकील सरकारचे मुंबईस होते ते येथें आले. कारण श्रीमंत दादासाहेबीं सुरतेहून सनद मुंबईस पाठविली कीं, लक्षुमण गोपाळ यांस वकिली सांगितली आहे, त्यांजपासोन कामकाज घ्यावें आणि रणछोड शेणवी यांस सुरतेस रवाना करणें. हे वर्तमान मारनिल्हेचे इष्टमेस्र मोस्टीन यांणीं सांगितलें. त्याजवरोन हे तेथून चंद्रगमनी होऊन होडीस पांच रुा देऊं करोन आले. होडीवाले यानें साष्टीचे खाडींत अलिकडे मौजे वसी ता मजकूर याचे नस्तावर चिखलांत उतरोन होडी निघोन गेली. तेथें चौकी सरकारची आहे. त्यांणीं बराबर शिपाई देऊन येथें रवाना केलें. ते प्रहर रात्रीस आवशीचे पावले. त्यांणीं तोंडी मजकूर सांगितला कीं, श्रीमंत दादासाहेब सुरतेस आहेत. इंग्रजानें जागा राहावयास माहामुदी बागांत दिल्हा आहे. श्रीमंत अमृतरावजी बराबर आहेत. नाटकशाळा आठजणी व पंचवीस च्याळीस पावेतों खिजमतगीर वगैरे आहेत. इंग्रजानें आपले लोक जवळ ठेविले आहेत. सर्व साहित्य त्याजकडूनच होत आहे. मुंबईहून राजश्री सदाशीवपंत सौनी व नारोपंत गेले ते श्रीमंताजवळ आहेत. कारभार प्रस्तुत नारोपंत करितात. सुतेंचे जफ्तीस सरकारचे राऊत हजार बाराशें होते. त्यांस दादासाहेबीं दोन वेळ सनदा सादर केले व निदानीं सांगोन पाठविलें कीं, उठोन जाणें, नाहींतर खासा स्वारी होईल! त्याजवरोन बंदीचे लोक पांच कोस माघारे सरले. इंग्रजांची उमेद तीन हजार गाडदी वगैरे लढाईचा सरंजाम घेऊन, रा गोविंदराव गायकवाड व खंडेराव गो यांजकडोन पो बडोदें आधीं सर करोन, गोविंदरायास द्यावें, नंतर अमदाबाज घ्यावी. भडोजेस गाइकवाडाची तक्षीम निमें आहे ती इंग्रेजास बक्षीस द्यावी आणि मोबदला गाइकवाडास बडोदे पौ ऐवज सरकार तर्फेचा द्यावा. राजश्री हरीपंत तात्यांचे फौजबराबर लढाई घेऊन श्रीमंतांस देशीं पुणेंयास आणावें. इतके जालियावर इंग्रजांस सुरतेची चौथाई बक्षीस द्यावी. सुरत-अठाविशी, वसई, बेलापूर देखील द्यावें. याजप्रों करार मदार उभयपक्षीं होऊन शिक्के देखील झाले. इंग्रजानें बंदर किना-याचे तालुकदारांस व धुळपास दादासाहेबांच्या सनदा आणावयाविशीं मुजरत फतेमारी गेली आहे. सनदा आल्या ह्मणजे ज्याच्या नांवच्या येतील तिकडे पाठवाव्या. कोण सनद मानितो, कोण मानीत नाहीं, हें पहावें. प्रस्तुत, दादासाहेब म्हणजे मोठा किमया इंग्रजांचे हातीं सांपडला आहे. दुसरें दैवत नाहीं. ऐसा प्रकार मुंबईस जाला आहे. सुर्तेहून फतेमारी मुंबईस दोहोंरोजां येत्ये. दादासाहेबांचे पत्र मुंबईस जनरलास आलें कीं पुणेकर सावकार मुछदी यांचा ऐवज मुंबईस आहे तो जप्त करणें, जाऊ न देणें. याप्रों पत्र आलें आहे! इंग्रजांस प्रस्तुत स्वर्ग ठेंगणी जाला आहे. वरकड मुंबईत आज पांचशें माणूस व साष्टी टांपूत आठ नवशें, उरणास दिडशें पर्यंत आहे. आणि हिकडून कोणी त्याजवर जात नाहीं. याजमुळें फार टिका करितात, असा प्रसंग! मुंबईस लोकांची भरती नाहीं, ऐसे घडलें नाहीं, तिजोरी जामदारखान्यामध्यें आज पंचवीस हजार रुा पाहिजेत तरी नाहींत, धुळपाचें अरमाराची मोठी सलावत इग्रंजावर आहे, परंतु तोहि अरमार सुद्धा येत नाहीं. दबोन राहिला आहे. याजमुळें इंग्रज फारच हांवभरित जाला आहे. बंगाली व चिनई व विलायती व बसराई मिळोन दाहा अकरा तरांडीं तालचिरीस नागखाडेयास आहेत. वर माल बहुत आहे. हलावें यासाठीं खोटी आहे. मुंबईस गुराबा व रेवा दोन तरांडीं मुंबईपैकीं आहेत. परंतु याचा भरंवसा धरीत नाहीं. धुळपाची सलाबत मोठी गालीब आहे ! तिसरें तरांडें विलायती येणारं आहे. तें आलेंयाजवर मग यावे, ऐसा करार जाला आहे. प्रस्तुत धुळप हिकडे नाहीं त्या अन्वयें तिकडेच त्या तरांडेयाजवर सख्ती करून गळीं पडला तर मोठें काम होईल. इंग्रजांस तितकी दहशत आहे. याजकरितां सरकारांतोन धुळपाकडे कोणी शाहाणा माणूस व पत्रें जावोन, त्यास बक्षिस देऊं करोन सुवर्ण वगैरे तालुकेयाचें आरमार एकत्र करून, त्या तरांडेंयांजवर जावें अथवा मुंबईस यावें, लूट माफ करावी, शहर लुटोन फन्ना करवावें. याप्रों जालेयास इंग्रजांचा गर्व परिहार होईल. इंग्रज ह्मणतो कीं, सर्वांचा ऐवज मुंबईस आहे, यामुळें आह्मांवर सकती कोणी करणार नाहींत. याप्रों बोलतात, ह्मणोन रणछोड शेणवी सांगतात. याजवरोन विनंति लिा आहे. मारिनल्हेचे मानस स्वामीचे भेटीस यावयाचें बहुत आहे. आज्ञा होईल त्याप्रों वर्तणूक करितील. कित्तेक मजकूर स्वमुखें विनंति करणार आहेत. सरकार उपयोगीं आहेत. आशेप्रमाणे वर्ततील. श्रीमंतांस मुंबईस आणावें हें मानस इंग्रजांचें नाहीं. दुसरा मजकूरः सावकारी वर्तमान रा गोविंदराव गो व खंडेराव गो दोन्ही राजश्री हरीपंत तात्यांकडे रुजू झाले. हे असल्यास इंग्रजाच्यानें कांहीं होत नाहीं. फजित पडतो. साष्टी तालुका घेतला. पुढेंही मनसबा कित्तेक करितो. हा विचार मेस्त्र मोस्टीन याचे व दुसरे दोन कोशलदार यांचे विचारास येत नाहीं, परंतु सरकार काम ! आणि साष्टीचें यश आलें. याजमुळें उपाय नाहीं, ऐसें ह्मणतात. सदरहु विनंति मानिल्हेचे जबानीवरून सेवेसीं लिा आहे. रणछोड शेणवी यास हुजूर आणावयाचें असल्यास, राजश्री विसाजी कृष्ण यांस आज्ञापत्र असावें. ह्मणजे घोडे व तटू देऊन रवाना करितील. सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.