Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
विवेचन सहावें.
मराठ्यांचे हिंदुस्थानांत कार्य काय? ह्या प्रश्नाचें उत्तर दुस-या व तिस-या विवेचनांत बहुतेक उल्लेखिलेंच आहे. ह्या विवेचनांत त्याचा निर्देश आणखी विस्तृत करून दाखवितों. मराठ्यांचे हिदुस्थानांत मुख्य कार्य म्हटलें म्हणजे महाराष्ट्रधर्माचा प्रसार करणें हें होय. समर्थांनीं ज्याला महाराष्ट्रधर्म म्हणून संज्ञा दिली तो केवळ हिंदुधर्मच नव्हे. महाराष्ट्रधर्मांत स्वराज्यस्थापनेचा व गोब्राह्मणप्रतिपालनाचाहि अंतर्भाव होतो. हिंदुधर्म, स्वराज्य व गोब्राह्मणप्रतिपालन ह्या तीन गोष्टींची स्थापना करावयाची म्हटलें म्हणजे राष्ट्रांतील लोकांची एकी झाली पाहिजे व त्या एकीचा पुढाकार करण्यास कर्त्या लोकांनीं पुढें सरसावलें पाहिजे. हीहि गोष्ट त्यावेळच्या मराठ्यांच्या स्पष्टपणें ध्यानांत आली होती. मराठ्यांखेरीज हिंदुस्थानांतील इतर लोकांच्या ध्यानांत ही गोष्ट अगदीच आली नव्हती असें नाहीं. हिंदुधर्माची स्थापना व गोब्राह्मणांचें प्रतिपालन केलें पाहिजे ही कल्पना शीख लोकांच्या व बुंदेल्यांच्या डोक्यांत अकबराच्या वेळेपासून, कदाचित त्याच्याहि पूर्वी, आली होती असें म्हणण्यास आधार आहे परंतु ही कल्पना साक्षात् सिद्ध करून दाखविण्यास जी तडफ, जो निश्चय, जी जूट व जें पुढारपण लागतें त्याचें अस्तित्व ह्या लोकांच्या ठायीं होतें असें इतिहासावरून दिसत नाहीं. सुदैवानें ह्या गुणांचे अस्तित्व त्या कालीं मराठ्यांच्या अंगी होतें व म्हणूनच त्यांच्या हातून स्वराज्याची स्थापना होऊन हिंदुधर्माचें व गोब्राह्मणांचें प्रतिपालन झालें. १६४६ पासून १७०७ पर्यंत महाराष्ट्रधर्माची शुद्ध कल्पना महाराष्ट्रांत विराजत होती. तोपर्यंत हिंदुधर्माचा, स्वराज्याचा व गोब्राह्मणांचा छल अवरंगझेबाच्या हातून होत होता त्याच्यापुढें हा छल बंद झाला, स्वराज्याची स्थापना झाली आणि गोब्राह्मणांची व हिंदु धर्माची दीन दशा कायमची संपली १७२० च्या सुमारास महाराष्ट्रांत महाराष्ट्रधर्माची पूर्ण स्थापना झाली व महाराष्ट्रांतील हिंदुधर्माला व गोब्राह्मणांना कोठूनहि भीतीचें कारण उरलें नाही. सारांश, स्वराज्याच्या स्थापनेमुळे महाराष्ट्रांतील लोकांना सुखाचे दिवस दृष्टीस पडले. परंतु महाराष्ट्राबाहेरील प्रांतांतील लोकांना महाराष्ट्रांतील लोकांच्या सुखाचे वाटेकरी हा वेळपर्यंत होतां आलें नाहीं. खरें म्हटलें असतां अवरंगझेबाच्या कारकीर्दीत यवनांच्या सत्तेला उतरती कळा लागली होती; तेव्हां मराठ्यांच्याप्रमाणें हिंदुस्थानांतील इतर लोकांनीं उठाव करून आपल्या प्रांतांत स्वराज्याची स्थापना करून धर्माचें व गोब्राह्मणांचें प्रतिपालन करावयाचें. परंतु हा पराक्रम त्या लोकांच्या हातून झाला नाहीं. कां की, त्या लोकांच्या अंगीं स्वराज्यस्थापनेस एकजूट, पुढारपण वगैरे जे उदात्त गुण लागतात ते नव्हते. शिवाजीच्या प्रोत्साहनानें बुंदेलखंडांत छत्रसालनें कांहीं वेळ यवनांच्याविरुद्ध कंबर बांधिली होती हे खरें आहे.