Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
परंतु, मागें दिलेल्या तंख्त्यावरून दिसून येईल कीं १७५० पासून १७६१ च्या जूनपर्यंत एकाहि वर्षी पावसाळ्याखेरीज बाळाजी पुण्यास नव्हता. प्रत्येक वर्षाचे आठ महिने बाहेर काढण्याचा त्याचा परिपाठ असे. १७३८ पासून १७५० पर्यंतहि बाळाजी एकसारखा हिंडत होता हें दाखवून देण्यास साधनें आहेत. इ.स. १७३८/३९ हीं दोन सालें बाळाजी साता-यास होता. १७४० च्या मार्चएप्रिलांत बाळाजी पुण्यास होता (का. पत्रें, यादी ५८) शाहूमहाराज यांच्या चरित्रांत (पृष्ठ १६१) राजश्री गोगटे म्हणतात कीं, बाळाजी १७४० च्या एप्रिलांत साता-यास होता; परंतु तें काव्येतिहाससंग्रहांतील पत्रें यादी ५८ वरून बरोबर नाहीं. १७३९ च्या १७ एप्रिलास बाळाजी साता-यास होता (का. पत्रें, यादी ४५). १७४० च्या एप्रिलपासून जूनपर्यंत बाळाजी कोंकणांत आंग्रयाच्या मदतीला गेला होता (का. पत्रें, यादी ५८). १७४० च्या नोव्हेंबरपासून १७४१ च्या एप्रिलपर्यंत बाळाजी निजाम, भोसले ह्यांच्या राज्यांत व हिंदुस्थानांत गेला होता. १७४१च्या जुलैपासून अक्टोबरपर्यंत बाळाजी साता-यास होता. १७४१ च्या नोव्हेंबरपासून १७४२ च्या सप्टेंबरपर्यंत तो धारेस होता. १७४२ च्या अक्टोबरपासून १७४३ च्या जूनपर्यंत जयपूर, काशी, प्रयाग, बंगाला वगैरे प्रांतांत होता. १७४३ च्या जूनपासून सप्टेंबरपर्यंत पुण्यास होता. १७४३ च्या अक्टोबरांत स्वारी साता-यास जाऊन १७४४ च्या एप्रिलमेंत पुण्यास आली. १७४४ च्या नोव्हेंबरांत नाशिकावरून कोंकणांत शिरून डिसेंबरांस पुण्यास आला. १७४५ च्या जानेवारींत भेलशावर स्वारी करून आगष्टांत पुण्यास आला. १७४५ च्या नोव्हेंबरांत साता-यास जाऊन तेथून १७४६ च्या मार्चांत निरोप घेऊन स्वारी पंढरपुरास गेली (का. पत्रें, यादी ६८) व जूनांत पुण्यास आलीं. तेथून तो कोंकणांत सप्टेंबरांत जाऊन १७४७ च्या मार्चएप्रिलांत पुण्यात आला. १७४७ च्या डिसेंबरांत खानदेश, बेदर वगैरे निजामाच्या प्रांतांत जाऊन १७४८ च्या मार्चएप्रिलांत पुण्यास आला. १७४८ च्या सप्टेंबरांत हिंदुस्थानांत मकसुदाबाद, प्रयाग वगैरेवर स्वारी करून १७४९ च्या आगष्टांत साता-यास आला. १७४९ च्या डिसेंबराच्या १५ व्या तारखेस शाहूराजा वारला. त्यावेळीं बाळाजी साता-यास होता व पुढे १७५० च्या जानेवारींत नवा राजा करून एप्रिलात बाळाजी पुण्यास आला. रा. गोगटे वगैरे मंडळी शाहूच्या मृत्यूचें साल १७४८ देतात. परंतु, ती चूक आहे. १७५० च्या पुढील बाळाजीच्या हालचालींचा तख्ता मागें दिलाच आहे. ह्यावरून इतकें समजून येईल कीं १७३८ पासून १७६१ पर्यंत बाळाजी सबंद वर्षभर अमुक एक ठिकाणीं सतत कधींच राहिला नाहीं. सदा चोहींकडे फिरण्यांत त्याचा वेळ गेला. हींच स्थिति बाकीच्या पुढा-यांची व सामान्य सैनिकांची होती. पावसाळ्यांत छावणींत असतांना या लढवय्यांना विलास करण्यास कितपत सोय व साधनें असत तें समजण्यास मजजवळ सामग्री नाहीं. पावसाळाखेरीज करून बाकीचे आठ महिने सर्व हिंदुस्थानभर घिरट्या घालण्यांत हाडांचीं कडें ह्या पुढा-यांना व शिपायांना करावीं लागत हें सिद्द करण्यास हवीं तितकी साधनें आहेत.