Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पहिला (१७५०-१७६१)
प्रस्तावना
आतां आणखी एका मुद्याचा विचार करून हें विवेचन संपवितों. गिलज्यांच्या धिप्पाड व अर्बुज शरीरांपुढें मराठ्यांच्या लहान व वामनमूर्तीचा टिकाव लागला नाही म्हणून एक आक्षेप आहे. गिलज्यांच्या लांबीरुंदीपेक्षां मराठ्यांच्या शरीराचें क्षेत्रफळ कदाचित् लहान असेल, परंतु लढाईत ह्या क्षेत्रफळावरच मोठी भिस्त असते असे नाहीं जर्मन, फ्रांक ह्या रानटी लोकांच्या लांबीरूंदीपेक्षां सीझराच्या रोमन सैनिकांची उंची व रूंदी, कमी असे. परंतु, फ्रांक लोकांच्या पाव अर्धा फूट उंचीचा वचपा रोमनलोक भयंकर रीतीनें भरून काढीत हें प्रसिद्ध आहे. तोच प्रकार मराठ्यांचा होता कर्नाटकांतील राठ व धिप्पाड शेतकरी, मथुरा वृंदावनांतील गलेलठ्ठ बैरागी, पंजाबांतील उंच, धिप्पाड व ढिसूळ शीख, रजपुतान्यांतील रुंद छाताडाचे व भरगच्च मासाचे राठोड, ह्यां सर्वांना लहान्या परंतु कांटक मराठ्यांनी वेळोवेळी चीत केलें होतें. त्या मराठ्यांना अर्बुज गिलज्यांचें किंवा पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याहि मनुष्याचें भय मागें कधीं वाटलें नाहीं व पुढें कधीं वाटणार नाहीं. १४ जानेवारी १७६१ च्या लढाईंत मराठ्यांचा पराजय झाला म्हणून जर गिलज्यांच्या धिप्पाडपणाचे पोवाडे गावयाचे असतील तर २३ नोव्हेंबर व ७ डिसेंबर १७६० च्या लढायांत मराठ्यांचा जय झाला म्हणून गिलज्यांच्या धिप्पाडपणाचें क्षुल्लकत्वहि वर्णन करणें जरूर आहे. तात्पर्य, शरीराच्या लहानमोठेपणाचा परिणाम पानपतच्या लढाईंत कांहींच झाला नाहीं. कां कीं मराठीं सैन्यांत येथून तेथून सर्व मराठेच होते असा प्रकार बिलकुल नाहीं. मराठे सैन्य पंचमेळ असे. परदेशी, मराठे, मुसुलमान, आहरि, अडारू आरब, रजपूत, वगैरे सर्व प्रकारचे लोक मराठी सैन्यांत असत.