संस्कृत भाषेचा उलगडा

९ आता द्वितीया साधनिकेकरिता घेऊ. द्वितीयेपासून सप्तमीपर्यंतच्या विभक्त्यांची रूपे साधताना प्रथमारंभी असा इशारा देणे इष्ट आहे की, प्रथमेच्या तिन्ही वचनांची रूपे इतर विभक्त्यांच्या रूपांना आधार आहेत. म्हणजे प्रथमेच्या रूपांना कर्म, करण, संप्रदान, अपादान, इत्याद्यर्थक प्रत्यय लागून बाकीच्या विभक्त्यांची रूपे सिद्ध होतात. देव याचे प्रथमैकवचन देवस् याला म् प्रत्यय लागून देवस्+ म्= देवह्+ म् अशी स्थिती होई व ह् चा पूर्वसवर्णांत लोप होऊन ऐवम् असे द्वितीयैकवचनाचे रूप साधे. त्याचप्रमाणे देवौ+ म् = देवौम् अशी स्थिती होऊन अन्त्य म् चा लोप होई व देवौ हे द्वितीया द्विवचनाचे रूप साधे. प्रथमेच्या अनेकवचनाचे देवाँ: म्हणून जे चवथे रूप सांगितले ते आधाराला घेऊन देवाँ:+ म् अशी स्थिती होई व अनुनासिकाचा न् होऊन आणि अन्त्य म् चा लोप होऊन देवान् हे वैदिक रूप बने. म् प्रत्ययाचा अर्थ निर्जीव वस्तू, सजीव किंवा सामर्थ्यवान् वस्तूने असमर्थ किंवा निर्जीव वस्तूवर व्यापार चालविलेली वस्तू.