Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

संस्कृत भाषेचा उलगडा

३. वस्तुत: पहाता अनेकवचनाची देखील जरूर नाही. अनेकवचन काढून टाकिले, तत्रापि अर्थाचा बोध नामी होतो. मराठीत ही सुधारणा होऊन गेली आहे. एक पुरुष, दोन पुरुष, शंभर पुरुष या मराठी प्रयोगात अनेक संख्या दोन व शंभर या संख्यावाचक नामांनी दाखविली जात असून, पुरुष या शब्दाने दाखविली जात नाही, हा शब्द जसाचा तसाच रहातो. इथे अडगळ काढून टाकण्याच्या कामी मराठी महाराष्ट्राच्याही पुढे गेली. या कामी इंग्रजी मराठीच्या मागे आहे. two man, hundred man असे प्रयोग न करता two men hundred men असे प्रयोग इंग्रजी करते. ती जेव्हा two man, hundred man असे प्रयोग करण्याची सुधारणा करील तेव्हा मराठीची बरोबरी तिने केली असे होईल. मराठीतील अकारान्त पुल्लिंगी नामाप्रमाणे अनेक वचनाचा प्रत्यय सर्वत्र झुगारून दिला, म्हणजे अनेकवचनाला रजा मिळाली. मग एकटे एकवचन तेवढे राहिले. परंतु त्याला एकवचन हेही नाव मग शोभणार नाही. कारण अनेकांच्या अपेक्षेने एकाची मातब्बरी भासत असते. तात्पर्य , एकवचनाची ही वस्तुत: जरूरी नाही. संख्यावाचक शब्दांनी दोन, वीस, शंभर वस्तू जशा दाखविल्या जातात तशीच एक या शब्दाने एक वस्तू दाखविली जाईल. त्याकरता वस्तुशब्दाला विकार करण्याचे कारण नाही. हे म्हणणे कित्येकांना काल्पनिक व विचित्र वाटेल. परंतु तसे वाटण्याचे कारण नाही. ही सुधारणा म्हणजे वचनाला बिलकुल रजा देण्याची सुधारणा कित्येक भाषात हजारो वर्षांपूर्वीच होऊन गेली आहे. उदाहरणार्थ Oh Rama ! You have Killed one thousand giants Who habitially ate a hundred men, हे इंग्रजी वाक्य वचनांना अजिबात फाटा देऊन येणेप्रमाणे संस्कृत भाषेत बोलता येते :

हे नरशतभक्षकराक्षससहस्त्रमारकराम !
या संस्कृत संबोधक वाक्यात सात शब्द आहेत व त्यापैकी एकाही शब्दाला वचनार्थक किंवा विभक्त्यर्थक विकृती झालेली नाही. या रचनेला सामासिक रचना अथवा वृत्ती अशी संज्ञा आहे. समासात प्रत्ययाचा लोप करून व केवळ प्रातिपदिक अविकृत शब्द उच्चारून अर्थाचा बोध पूर्णपणे करता येतो. ही सामासिक वृत्ती अर्वाचीन संस्कृतात विपूल आहे. तिचा प्रकर्ष पहावयाचा असल्यास तो नैय्यायिकांच्या ग्रंथात हवा तितका बघून घ्यावा. न्यायग्रंथात सबंध पानचे पान एका समासाने व्यापिलेले वारंवार आढळते. तत्रापि शास्त्रीय गहन विषय ध्यानात येण्यास अडचण पडत नाही, कदाचित उलटे सौकर्य येतें. अपरिचितास हे सामासिक बोलणे कसेबसेच वाटेल हे खरे. परंतु हा केवळ अनभ्यस्ततेचा परिणाम आहे. समासाने बोलण्याची सवय केली असता, तेच समस्त बोलणे व्यस्त बोलण्यापेक्षा सुलभ वाटते. सौलभ्य व सोय असल्यावाचून सामासिकभाषा प्रचारात आलीच नसती. याला साक्ष प्राकृत भाषांची. प्राकृत भाषा अविद्वान अशा सामान्य जनांची. परंतु प्रख्यात नाटककार जो भवभूती त्याने दोन - दोन, चार - चार ओळी लांब असे समास आपल्या मालतीमाधव नाटकात योजिलेले सर्व प्रसिद्ध आहेत. हे लंबेलंबे प्राकृत समास तत्कालीन प्राकृतजनांना, श्रोत्यांना व प्रेक्षकांना सहज ऐकता ऐकता समजततील अशी खात्री असल्यावाचून नाटककाराने ते केवळ स्वत:च्या हौसेकरिता घातले असतील हे संभवत नाही. सामासिक बोलणे उलगडवायला बिकट नसून उलट अत्यंत सोपे व शिवाय चमत्कृतिजनक असते. त्यात वचने नाहीत, विभक्त्या नाहीत, लकार नाहीत, कंटाळा येतील अशी वाक्यांवर वाक्ये नाहीत, ते समजावयाला सुबंताचा अभ्यास नको, तिङंताचा नको, काही नको, फक्त शब्दज्ञान असले म्हणजे झाले शब्दापुढे शब्द येऊन अर्थ आस्ते - आस्ते श्रोत्यांच्या मनात उतरत जातो. सर्वात ही सामासिक भाषा अत्यंत शास्त्रीय. पूर्वज रानटी स्थितीत असताना त्यांनी अज्ञानाने ज्या चुकीच्या पद्धती निर्माण केल्या त्या चुका टाळावयाला उत्तम मार्ग म्हटला म्हणजे ही सामासिक भाषा होय. लौकिकभाषेत जिकडे पहावे तिकडे प्रत्ययांचा बाजार. वचन घ्या प्रत्यय, लिंग घ्या प्रत्यय, विभक्ती घ्या प्रत्यय, आत्मने घ्या प्रत्यय, परस्मै घ्या प्रत्यय, भूत घ्या प्रत्यय, भविष्य घ्या प्रत्यय, प्रत्ययांखेरीज बोलणे नाही. प्रत्यय चुकला की अर्थ घसरला. या प्रत्ययांच्या रानातून वाट काढता काढता कोवळ्या बालकांचे तर किती हाल होतात ते विचारू नका. त्याऐवजी, प्रत्ययांना ज्यात अजिबात रजा मिळाली आहे ती अप्रत्यय सामासिकभाषा लहान मुलांना शिकण्याला सोयिस्कर नव्हे ? हींत प्रत्ययच नसल्यामुळे, चुका पायात मोडण्याचा धाकच रहात नाही. ही सामासिक भाषा पद्धती प्रचारात येईल तो सुदिन ! एकदा संख्यावाचक सर्व शब्द भाषेत निर्माण झाल्यावर एकवचन, द्विवचन, त्रिवचन, बहुवचन व अनेकवचन, यांची म्हणजे वचनांची जरूरच रहात नाही. रानटी आर्यांना तीनच वचने माहीत होती. कित्येक रानटी लोकांच्या भाषात दहा- दहा, वीस- वीस वचने आढळतात. हा वचन बाहुल्याचा प्रकार वचनत्रयाच्या इतकाच रानटी स्थितीचा द्योतक आहे.