प्रस्तावना

७. पहिल्या दिवशीची हकिकत देताना कोणत्या शहरी, कोणत्या वर्षी, महिन्यात, पक्षात किंवा तिथीस ही मुलाखत झाली, वगैरे कालस्थलनिर्देश कवीने केला नाही. काही अपवाद वर्ज्य केले असता, एथूनतेथून सबंध काव्यात कालस्थलांचा निर्देश बिलकुल नाही, हा दिक्कालानवछिन्न कवी आहे, इतिहासकार नाही, हे लक्षात घेतले म्हणजे दोष देण्याला जागा रहात नाही. तत्रापि अंदाज आहे की महाराजांची मुलाखत कवीने वसंतर्तूंत म्हणजे कोणत्या तरी वर्षाच्या चैत्रवैशाखात घेतली असावी. असो, दिली आहे तेवढीच माहिती अपूर्व मानून समाधान करून घेणे भाग आहे. दुस-या दिवशी प्रात:काली कवी राजदर्शनास गेला. तेव्हा विश्वनाथभट्ट ढोकेकर प्रात:स्मरण करीत होते. ते करीत असताना अष्टोत्तरशे मंगले राजाच्या दर्शनार्थ आणलेली सिद्ध होती. प्रात:स्मरण ऐकून राजाने मंगलाचे दर्शन, स्पर्शन व कीर्तन अनुभवले. नंतर एका ब्राह्मणाने तेलाने व तुपाने भरलेल्या सोन्यारुप्याच्या पराता आणल्या. त्यात राजाने आपले मुखबिंब अवलोकन केले व सभामंडपात प्रवेश केला. सभामंडपाला नवगजी असे नाव होते. ह्या नवगजीत उजेडाचा लखलखाट असून वरील छत नेत्रांना थंडावा देणारे होते. मासे व कासवे यांची चित्रे ज्यावर काढली आहेत असा रुजामा नवगजीत आंथरलेला असून त्यावर सर्व सेवकसमुदाय आधीच येऊन राजाची मार्गप्रतीक्षा करीत होता. अनेक मराठा क्षत्रियांच्या संमर्दाने ती नवगजी गजबजून गेली होती. अशा त्या नवगजीत, ज्याच्या मस्तकावर आब्दागि-यांनी चांदव्याची अब्दागिरी धरली आहे व ज्याच्या भोवती चवरीवाले चव-या ढाळीत आहेत असा शहाजी महाराज हातात तलवारीची मूठ लटकावीत धीरोदात्त गतीने प्रवेश करून कवी, पंडित व सेनापती यांचे मुजरे घेत घेत, सिंहाकृती स्तंभांवर बसविलेल्या सिंहासनावर, सर्वांना आश्वासन देत, विराजमान झाला. तोच, राजगुरू प्रभाकरभट्ट यांनी आपल्या पायांचे तीर्थ महाराजांच्या अंगावर शिंपडले. तेव्हा राजाने उठून प्रभाकरभट्टांना आपल्या जवळ आणून सर्व पुरोहित कर्म त्यांच्या हस्ते करवून घेतले. हा समारंभ इकडे चालला असता, त्रिचनापल्लीच्या मल्लिनाथपंडितांचे वंशज राजाच्या स्वारीबरोबर छावण्यातून राजदर्शनार्थ महिनाभर हिंडून कंटाळून गेलेले जयराम कवीला भेटले व जेणेकरून प्रभाकरभट्ट संतुष्ट होऊन राजदर्शन करवील असे एक पद्य रचून देण्याची त्यांनी कवीला विनंती केली. त्यांच्या इच्छेप्रमाणे कवीने त्यांचे कार्य ताबडतोब करून दिले. येथे सातवा उल्लास संपला.