प्रस्तावना

६. बंगळूरच्या शहाजी महाराज भोसल्यांच्या कर्णोपमदातृत्वावर देशोदेशींच्या अनेक विद्वानांचा योगक्षेम चालतो अशी वदंता चारणांच्या तोंडून ऐकून नाशिकप्रांतीय जयरामकवीच्या मनात महाराजांची भेट घेण्याच संकल्प आला. तदनुरूप तुळजाभवानीचे व पांडुरंगाचे ध्यान करून कवी महाराष्ट्रदेशातून कर्नाटकात शाहराजाच्या राजधानीस येऊन ब्रह्मविद्यानिष्णात शिवराय गोस्वामी नावाच्या दरबारातील विद्वानास भेटला व महाराजांची भेट घेण्याचा आपला मनोदय त्यास निवेदन करता झाला. शिवरायाने ताबडतोब ती गोष्ट राजाच्या कानावर घातली. राजाने मान्यता दर्शवून शिवराय वेदांती यांना व कथाकल्पक वीरेश्वर वैद्य यांना कवीस सामोरे जाऊन दरबारात घेऊन येण्यास आज्ञा केली. स्वस्तिकार करून कवीने बारा नारळ राजापुढे ठेवले. बारा नारळ आमच्यापुढे का ठेवलेत म्हणून राजाने कौतुकाने विचारले असता कवीने उत्तर दिले की, संस्कृत, प्राकृत, गोपाचलीय ऊर्फ ग्वालेरी ऊर्फ व्रज (ग्वालेरच्या किल्ल्याला गोपाचल, गोपालगिरी पूर्वी म्हणत असत) गुर्जर, वक्तर, ढुंढार, पंजाब, हिंदुस्थान, बागुल, यावनी, दाक्षिणात्ययावनी व कर्नाटक, अशा बारा भाषांत काव्यरचना करीत असतो, हे दर्शविण्याकरिता बारा नारळ ठेवले. यावर राजाने आज्ञा केली की, तुमची काव्यरीति कशी काय आहे त्याचा मासला म्हणून काही काव्य रचले असल्यास पढा. तेव्हा त्या राधामाधवविलासचंपू कवीने चतुर गायकाकडून राजापुढे सुस्वर गावविला. त्याने राजा सुप्रसन्न झाला आणि म्हणाला की, हे काव्य तर ठीक आहे, परंतु कवीच्या कवित्वशक्तीची परीक्षा समस्यापूरणात होत असते, सबब, पंडित हो! कवीला आपण सर्वजण एकेक समस्या घालू व तो तिची पूर्ति कशी काय करतो ते पाहू. असे म्हणून शहाजीराजे यांनी "शतचंद्रं नभस्तलं" हा संस्कृत चरण समस्यार्थ पढला. महाराजांच्या समस्येचे पूरण झाल्यावर (१) मल्हारभट पुरोहित, (२) नारोपंत दीक्षित, (३) नरहरी कवीश्वर, (४) विष्णु ज्योतिषी, (५) रघुनाथभट्ट चाऊरकर, (६) विश्वनाथभट्ट ढोकेकर, (७) नीळकंठभट्ट पुराणिक, (८) प्रल्हाद सरस्वती, (९) वीरेश्वरभट्ट चतुर, (१०) अक्कय्याशास्त्री पल्लकचेरीकर, (११) तुकदेव पाठक, (१२) शेष पंडित, (१३) अनंत पंडित शेषे, (१४) संभाजी राजे भोसले युवराज, (१५) यलोजी महाले घंटाघोष, ह्या पंधरा गृहस्थांनीही संस्कृत समस्या घातल्या. त्याचप्रमाणे दरबारातील अनेक प्राकृत भाषाकवींनीही समस्या घातल्या. त्या सर्वांचे समीचीन पूरण झालेले पाहून राजा फार खूष झाला व त्याने उद्गार काढले की, आपली कीर्ति गाण्याला हा कवी योग्य आहे, सबब याला आश्रय देऊन आपल्या दरबारी ठेवावा. नंतर रघुनाथपंत हणमंते यांना राजाने आज्ञा केली की कविवराची बरदास्त राखावी. पुढे कचेरी बरखास्त होऊन सायंतनविधिसमाप्तीनंतर कवीचे नाव, गाव वगैरे बारीक विचारपूस राजाने केली. तेव्हा दरबारातील मुत्सद्दी रघुनाथपंत व लक्ष्मणपंत व सखोपंत यांनी सांगितले की, हा गंभीरराव सप्तशृंगीकर यांचा मुलगा असून दत्तो नागनाथ यांचे व कवीचे गणगोत आहे. ते ऐकून राजा म्हणाला की, हा कोणी दूरचा नाही, आपलाच आहे. असे म्हणून राजाने कवीस निरोप दिला... ही हकिकत सहाव्या उल्लासात दिली आहे.