प्रस्तावना

५. दहा उल्लास आणि शेवटी एक परिशिष्ट मिळून प्रस्तुत चंपूचे एकंदर अकरा भाग आहेत. पैकी पहिल्या पाच उल्लासात राधाकृष्णाच्या विलासाचे संस्कृत भाषेत रीतसर वर्णन आहे. (१) जलक्रीडा; (२) पुष्पशय्यारिरंसा, (३) नखशिखा, (४) षडर्तु व (५) चंद्रोदयसूर्यास्तमय, ह्या अन्वर्थक नावावरून पहिल्या पाच उल्लासांचे रूप काय असेल ते समजण्यासारखे आहे. ह्या पाच उल्लासात कवीने आपली ओजोमाधुर्यादिकाव्यपरिपोषणशक्ती दाखविण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो एकंदरीत बरा साधला आहे. ग्रंथारंभी शेषपुत्र रंग या नावाच्या आलंकारिकाने एक लहानसा उपोद्घात ऊर्फ प्रस्तावना लिहिली आहे व अलंकारशास्त्रग्रंथ पढून कवित्वशक्ती येत नसून मूळचीच प्रतिभा कवीच्या ठायी ईश्वरानुग्रहप्राप्त असावी लागते असे विवेचन केले आहे. त्यात काव्यप्रकाश, चंद्रलोक, काव्यकल्पकता, काव्यादर्श इत्यादी अलंकारग्रंथांचा उल्लेख केला आहे. ह्या पाच उल्लासात संभोग, विप्रलंभ, स्त्रियांचे नखशिखांत वर्णन इत्यादी मनोन्मादक, बालिश व चार्गट वर्णने कवीने अपूर्ववर्णित रीतीने दिली आहेत. त्यात इतिहासभाग असलाच तर तो इतकाच आहे की शहाजीकालीन समाजात कवित्व कशाला म्हणत ते समजण्यास एक साधन उत्पन्न होते. काव्यातील खरा इतिहासभाग सहाव्या उल्लासापासून लागतो. सहाव्या उल्लासापासून ग्रंथसमाप्तीपर्यंतच्या सबंध भागात म्हणजे ग्रंथाच्या दोन तृतीयांश भागात राधाकृष्णाचे नावही नाही, इतकेच नव्हे तर अस्पष्ट उल्लेख सुद्धा नाही. या दोन तृतीयांश भागात येथून तेथून शहाजी महाराजांची प्रशंसा भरली आहे. तत्रापि, ह्या भागांची गणना कवी राधामाधवविलासचंपूत करतो. असे करण्यात कवीचा मतलब कदाचित असा असावा की, प्रामुख्याने ग्रंथ मनुष्यस्तुतिपर समजला न जाता ईशस्तुतिपर समजला जावा व मनुष्यस्तुतिपर जो दोन तृतीयांश भाग आहे तोही शाहनृपतिरूप कृष्णाच्याच स्तुतिपर आहे असा समज व्हावा. नाविष्णु: पृथिवीपति: अशी ग्रंथकाराची परंपरागत श्रद्धा होती. तेव्हा राधाकृष्णविलासाला व शहानरेशप्रशंसेला एकाच ग्रंथात कवीने संवलित केले हेही त्याच्या मते योग्यच झाले. सहाव्या उल्लासाचे राजदर्शनसमस्यापूरण असे नाव असून, सातव्याचे राजसभावर्णन, आठव्याचे राजरीतिवर्णन, नवव्याचे युवराज्यावाप्ति व दहाव्याचे राजनीतिवर्णन, अशी नावे आहेत. सहाव्यापासून दहाव्या उल्लासापर्यंतचा सर्व ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. परंतु शहाजी महाराजांच्या समोर व इतर राजपुरुषांच्या समोर जयराम कवीने व इतर भाषाकवींनी प्रसंगोपात्त संस्कृत व्यतिरिक्त इतर अकरा भाषांत जे कवित्व व समस्यापूरण केले ते संस्कृतसंदर्भात अंतर्भाविणे सुयुक्त नव्हे अशा बुद्धीने स्वतंत्र परिशिष्टात संग्रहणे ग्रंथकर्त्यास इष्ट वाटले. हे परिशिष्टखंड सर्व ग्रंथाचा एक तृतीयांश भाग आहे. म्हणजे राधाकृष्णवर्णनाचा एक तृतीयांश संस्कृत भाग, शहाजी राजवर्णनाचा एक तृतीयांश संस्कृत भाग आणि एक तृतीयांश प्राकृत भाग, असा एकंदर ग्रंथाचा विभाग आहे.