प्रस्तावना

३. शहाजीराजे भोसले यांची मूळ राजधानी जे बंगळूर शहर तेथे ह्या राधामाधवविलासचंपूग्रंथाची मूळ पहिली प्रत लिहिली गेली या विधानाचा अर्थ असा होतो की, हा राधामाधवविलासचंपू ग्रंथ प्रथम बंगळूर प्रांती उदयास आला. स्वत: ग्रंथकारच म्हणतो की, शहाजी महाराजांनी हे काव्य श्रवण केले.

॥ द्वादशभाषाललित शाहनरेश्वरानें आकर्णिलें ॥

कोठे श्रवण केले? तर बंगळूरप्रांती श्रवण केले. इतर तैलंगणादि प्रांतांत कशावरून श्रवण केले नाही? तर कवी स्वत: दोन तीन ठिकाणी महाराष्ट्र देशाहून शहाजी महाराजांसन्निध आल्याचा उल्लेख करतो.

॥ महाराष्ट्रदेशादागत्य प्राह॥
॥ महाराष्ट्रदेशादागतो जयरामो नाम कवीश्वर: ॥

महाराष्ट्र देशाहून शाहाजी महाराजासन्निध येणे म्हणजे बंगळूर प्रांती येणे हे सांगावयाला नको. कारण कर्नाटकात बंगळूर प्रांताखेरीज शाहाजी महाराजांचे वास्तव्य शेवटची पंधरा वर्षे नव्हते. ह्या विधानावरून हेही उघड झाले की, प्रस्तुत काव्य शहाजी महाराजांच्या शेवटल्या पंधरा वर्षांच्या अवधीत केव्हा तरी निर्माण झाले. नक्की केव्हा निर्माण झाले तेही स्थूलमानाने अनुमानण्यास प्रस्तुत ग्रंथात पुरावा आहे. काव्यात खालील पद्य आले आहे.

जगदीश विरंचिकु पुछत है कहो शिष्टि रची रखे कोन कहां ।
कर जेरि कही जयराम विरंच्ये तिरिलोक जहां के तहां ॥
ससि वो रवि पूरब पश्चिम लों तु सोय रहो सिरसिंधु महा ॥
अरु उत्तर दछन रछन को इत साहजु है उत साहिजहां ॥१॥

परमेश्वर ब्रह्मदेवाला विचारतात की, तू सृष्टी रचलीस तीत राखण कोण कोठे ठेवलेस ते सांग. तेव्हा ब्रह्मदेव सांगतो की, पूर्वेचा रक्षक रवि व पश्चिमेचा रक्षक चंद्र केला आहे; तसेच उत्तर दिशेचा लोकपाल शाहजहान पातशाहा केला आहे व दक्षिण देशचा रक्षक शाहाजी महाराज केले आहेत. पद्यातील शहाजहानच्या उल्लेखावरून उघड आहे की, शहाजहानाची राज्यच्युती होण्यापूर्वी म्हणजे शक १५८० पूर्वी ह्या काव्याची रचना झाली असली पाहिजे. तसेच ह्या पद्यात शहाजी महाराजांना दक्षिणदेशाचा लोकपाल म्हणून गौरविले आहे. हा गौरव सार्थ व्हावयाचा म्हणजे तो शक १५७५ नंतर विजापूराहून शहाजीची सुटका होऊन कर्नाटकात त्याचा अंमल ठाकठीक झाल्यानंतरच्या काळात सार्थ होणे शक्य आहे. सबब, निश्चयाने म्हणता येते की प्रतुत चंपूकाव्याची रचना शक १५७५ च्या नंतर व शक १५८० च्या पूर्वी जी तीन चार वर्षे गेली त्या अवधीत झाली आहे. कवीची व शहाजीमहाराजाची प्रथम भेट झाल्यापासून दोघांच्या ज्या अनेक बैठकी झाल्या व इतर दरबाऱ्यांबरोबर ज्या अनेक मुलाखती झाल्या त्या बैठकीत व मुलाखतीत जे जे उद्गार प्रस्तुत कवीच्या व इतर कवींच्या मुखातून निघाले त्यांचा संग्रह एकत्र करून कवीने हे काव्य गुंफिलेले आहे. हे काव्यगुंफन शक १५७५ त सुरू होऊन शक १५८० च्या सुमारास संपूर्ण झाले असावे असे विधान, विशेष शंका न बाळगता, करता येण्यासारखे दिसते.