प्रस्तावना

२. मनोहर लक्ष्मण पुराणिक हा गृहस्थ मूळचा भीमेच्या काठच्या खेड ह्या गावचा रहाणारा. खेडाहून चिंचवडास पहिले बाजीराव बल्लाळ यांच्या कारकिर्दीच्या सुमारास ह्याने स्थलांतर केले. हा यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण बराच व्युत्पन्न असून ह्याला प्राकृत व संस्कृत कविता करण्याचा चांगलाच नाद असे. रबड्यांच्या घरात जो ग्रंथसमूह मला सापडला त्यापैकी बहुतेक सर्व पोथ्या मनोहर लक्ष्मण पुराणिकाच्या आहेत. ह्या ग्रंथसमूहात वेद, इतिहास, पुराण, व्याकरण, न्याय, वेदांत, काव्य नीति इत्यादीविषयक संस्कृत ग्रंथ असून, ज्ञानेश्वर, एकनाथ, मुक्तेश्वर, वामन, कृष्णयाज्ञवल्कि वगैरे प्राकृत ग्रंथ आहेत. शिवाय ह्याने स्वत: रचलेली काही प्राकृत अभंग, श्लोक वगैरे मराठी ग्रंथरचना आहे. हा आपल्याला मनकवी, मनोहरकवी असे अभंगाच्या किंवा श्लोकप्रबंधाच्या समाप्तीस वारंवार म्हणतो. कित्येक स्थली याने आपले गाव, नाव, मातापितरे, गुरू, शक, महिना, मित्ती इत्यादी त्रोटक तपशीलही दिला आहे. त्यावरून दिसते की हा व्युत्पन्न कवी बाजीराव बल्लाळ व बाळाजी बाजीराव या दोन पेशव्यांच्या कारकिर्दीत चिंचावटग्रामी वास्तव्य करून होता. ह्याच्या संग्रहास असलेली राधामाधवविलासचंपूची प्रस्तुत पोथी, अर्थात, शक १६५० च्या पूर्वीची आहे. किती पूर्वीची असावी ह्या बाबीचा अंदाज पोथीच्या जीर्णत्वावरून व अक्षराच्या वळणावरून अदमासाने ताडता येतो. इ, क, ज, य, भ वगैरे अक्षरांची मोडणी शिवकालीन दिसते. सबब, पोथी बहुश: शक १६०० च्या सुमारची असावी. मूळ पोथीतील अक्षरे न लागल्यामुळे कोठे कोठे जागा रिकामी सोडली आहे व कोठे कोठे श्लोकांचे सबंद चरणच्या चरण खाल्ले आहेत किंवा अर्थ न लागल्यामुळे अंदाजाने काही तरी अक्षरे एका पुढे एक लिहून वेळ मारून नेलेली आहे. त्यावरून असेही म्हणता येते की, ही शिवकालीन पोथी तीहून जुन्या अशा एका पोथीवरून नकललेली आहे. सगळ्यात अत्यंत जुनाट पहिली पोथी शहाजीराजे भोसले यांची पहिली राजधानी जे बंगळूर शहर तेथे लिहिली गेली व तीवरून किंवा तिच्या प्रतीच्या प्रतीवरून सध्याची ही पोथी शिवकाली नकलली गेली. अर्थात् ह्या चंपूच्या आणिक प्रती म्हैसूर, मद्रास व तंजावर या प्रांतांत असण्याचा संभव आहे. त्या धुंडाळून मिळविणे ही बहुत कालांतराची बाब होणार. सबब ह्या एकाच पोथीवरून प्रस्तुत प्रकाशन इतिहासज्ञानमात्रलब्ध्यर्थ आरंभिले आहे.