मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

बाकी फारशी दरबारी पत्रांतील मायन्यांत बंदा हा शब्द योजण्याची ज्या अर्थी फार पुरातनपासूनची चाल आहे, त्याअर्थी प्रस्तुत वाक्यांतील सेवक हा शब्द बंदा ह्या शब्दाचें भाषान्तर आहे, असेंच म्हणणें वाजवी दिसतें. ह्या वाक्यातील दियानतराऊ हा शब्द अर्धा फारशी व अर्धा मराठी आहे; बाकीचे शब्द शुद्ध संस्कृत आहेत. दुस-या वाक्यांतील मौजे, किल्ले, माहताजी, नूरखानास व रवान् हे शब्द फारशी आहेत आणि बाकीचे प्रायः सर्व शब्द व प्रयोग फारशी शब्दांचे व प्रयोगांचे तर्जुमे आहेत. एकटा ‘गाव’ हा शब्द तेवढा मराठी आहे. “मौजे उझार्डे किल्ले वंदन माहताजी गांव चालत असतां,” ह्या वाक्यांशाचा अर्थ येणेंप्रमाणेः- “ओझर्ड्याचें गाव किल्ले वंदन ह्या प्रांतांखालीं चालत असतां.” ह्या वाक्यांत, मौजे उझार्डे व केल्ले वंदन, ह्या दोन स्थलीं इजाफत म्हणजे षष्ठीची इ आहे व ती तशीच मराठींत ठेविली आहे. मौजे उझार्डे=मौजा इ उझार्डे व किल्ले वंदन=किल्ला इ वंदन; म्हणजे ओझर्ड्याचें गांव व वंदनचा किल्ला. शुद्ध मराठी लिहावयाचें म्हटले म्हणजे ओझर्ड्याचें गांव किंवा ओझर्डे गांव व वंदनचा किल्ला किंवा वंदन किल्ला असें लिहावयाला पाहिजे होतें. परंतु लेखकानें फारशीच पद्धत कायम ठेविली आहे व हीच पद्धत सध्यांच्याही दप्तरांत अशीच चालू आहे. माहताजी हा संयुक्त शब्द आहे. माह् म्हणजे प्रांत व ताज् म्हणजे चालणारा, धांवणारा. प्रांताखालीं चालणारा तो माहताज्. ह्याची एक संख्या दाखवावयाची असली म्हणजे ई प्रत्यय लावून माहताजी असें रूप करतात. तेव्हां माहताजी म्हणजे प्रांतांखालीं चालणारा एक. आतां मौजे उझार्डे किल्ले वंदन ह्या स्थलीं ही एक इजाफत आहे. मौजा इ उझार्डे इ किल्ला इ वंदन=वंदन किल्ल्याचें ओझर्डे गांव वंदन=वंदन किल्ल्याखालील ओझर्डे गांव. अर्थात्, ‘मौजे उझार्डे किल्ले वंदन माहाताजी गांव चालत असतां=वंदन किल्ल्याखालील ओझर्डे गांव त्या प्रातांखालीं चालणारें एक गांव चालत असतां. येथें वाचकांच्या हें लक्षांत आलेंच असेल कीं, उपान्त्य चालत हा शब्द ह्या वाक्यांशांत फाजील आहे. खरें म्हटलें असतां, माहताजी ह्या शब्दाचा अर्थ प्रांताखालीं चालणारें एक असा असल्यामुळें, उपान्त्य चालत हा शब्द येथें नको होता. “मौजे उझार्डे किल्ले वंदन माहताजी गांव असतां” असा वाक्यांशा वस्तुतः पाहिजे होता. परंतु दियानतरावासारख्या सर्वश्रेष्ठ अधिका-यानें ज्या अर्थी चालत हा फाजील शब्द योजिला आहे, त्या अर्थी ह्या प्रयोगाची जास्त चिकित्सा करणें अवश्य आहे. “प्रांताखालीं किंवा प्रांतांत गांव चालणें,” हा प्रयोग शुद्ध फारशी आहे. प्रांतांत गांव चालणें, ह्या प्रयोगाचा अर्थ प्रांतांत गांव असणें, असा आहे. ग्रामो गडप्रदेशे अंतर्भवति असा प्रयोग संस्कृतांत होतो. ग्रामो गडप्रदेशे चलति किंवा चरति असा प्रयोग संस्कृतांत नाहीं. असणें ह्या अर्थी चर किंवा चाल् ह्या धातूची शक्ति संस्कृतांत नाहीं व जुन्या महाराष्ट्रांतहि नाहीं. आतां फारशींत असा प्रयोग होतो. देहे नूरखानरा रवान् शूदा, बूद, म्हणजे गांव नूरखानाकडे चालू झाला होता, असा प्रयोग फारशींत करतात. रफ्तन्, चालणे, ह्याचें रवान् चालत हें वर्तमानकालवाचक धातुसाधित रूप आहे. इंग्रजांच्या संसर्गानें सध्यां मराठी बोलण्यांत अशा त-हा पुष्कळ येऊ लागल्या आहेत. तो गार्ड ही लाईन वर्क करीत असतो, असा प्रयोग रेल्वेकडील लोक करतांना आढळतात. तो गार्ड ह्या रस्त्यावर काम करीत असतो, ह्या शुद्ध मराठी प्रयोगाच्या ऐवजीं वरील प्रयोग रेल्वेकडील नोकरलोक करतात. वर काम करणे ह्या अर्थी वर्क हे सकर्मक क्रियापद योजणें रास्त होईल. खरें पाहिलें तर हें वाक्य असे पाहिजेः- तो गार्ड ही लाईन वर्कतो. परंतु हा प्रयोग वेडाबागडा दिसतो अशी भावना असल्यामुळें, वर्क हे क्रियापद घालून शिवाय करणें ह्या मराठी क्रियापदाची जोड देतात. हाच प्रकार मुसलमानांच्या कारकीर्दीतहि चालू होता. माहताजी म्हणजे प्रांताखालीं चालणारें असा अर्थ असतां, आणखी चालत हें क्रियापद त्या वेळीं योजीत असत. ही एवढी दुस-या वाक्याची चिकित्सा झाली. आतां तिस-या वाक्याकडे वळूं. ह्या वाक्यांत दहा शब्दांपैकी सहा शब्द फारशी आहेत. आणि मालूम होणें व मोकर्रर करणें हीं संयुक्त क्रियापदें मालूम शूदन् व मोकर्रर कर्दन् ह्या फारशी संयुक्त क्रियापदांची शब्दशः भाषांतंरे आहेत.