Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
ह्यावरून एवढें सिद्ध होतें की मंत्र व यंत्रे लिहिण्यास भूर्जपत्रें व वस्त्रपट ह्यांचा उपयोग इ. स. १३२६ च्या सुमारास व पूर्वी लोक करीत असत. ज्ञानेश्वरींत चामावर म्हणजे चर्मावर व कापडावर लिहिण्याचा उल्लेख आहे. कायमचीं दानपत्रें तांब्याच्या पत्र्यावर लिहिण्याचा प्रघात इ.स. १३२६ त होता, ह्याला अनेक ताम्रपत्रांचा पुरावा आहे; इतकेंच नव्हे तर १३२६ च्या पुढें तीन चारशें वर्षे ताम्रपत्रांवर लिहिण्याचा प्रघात चालू होता, असें व पेशव्यांच्या रियासतींतील ब-याच ताम्रपत्रांवरून उघड होतें. सारांश, भूर्जपत्रे, ताडपत्रें, वस्त्रपट, ताम्रपंत्रे व चर्मपत्रें, ह्यांवर १३२६ पर्यंत व कचित् प्रसंगीं पुढें बरींच वर्षे, लेख लिहिण्याचा महाराष्ट्रांत बराच प्रचार होता. परंतु ह्यासुमारास म्हणजे १३२६ च्या पन्नास साठ वर्षे अगोदर लिहिण्याकरितां दुसरा एक जिन्नस प्रचारांत येऊं लागला. तो जिन्नस कागद हा होय. ह्या कागदावर लिहिण्यासबंधांनें ज्ञानेश्वरींत काही दूरचे उल्लेख आहेत.
हें बहू असो पंडितू।
धरूनु बालकाचा हातू।
बोली लेहे वेगवंत्।
आपणचि. ॥अध्याय १३ ,ओवी ३०७॥
सुखाची लिपि पूसिली. ॥अध्याय ३, ओवी २४६॥
दोषांची लिहिलीं फाडीं ॥अध्याय ४, ओवी ५२॥
आखरें पूसिलेया न पुसे
अर्थ जैसा॥ अध्याय ८ ओवी १७४ ॥
*ह्या उता-यांत 'सुखाची लिपि पूसिली' हें वाक्य मोठं अर्थप्रचुर आहे भूर्जपत्रें, ताडपत्रें, ताम्रपत्रें व वस्त्रपट ह्यांवर काढलेलीं अक्षरें पुसून टाकता येत नाहींत; फार तर खोडून टाकितां येतात ताम्रपत्रांवर लोखंडी लेखणीनें काढिलेली अक्षरें आडव्या रेघा मारून खोडून टाकितात. भूर्जपत्रें व ताडपत्रें ह्यांवर लोखंडी लेखणीनेंच लिहावें लागतें व तें लिहिणें पुसतां येत नाहीं. ह्यांच्यावरील लिहिणें नाहीसें करावयाचें असल्यास हरताळ वगैरे जिनसांचा उपयोग करावा लागतो. वस्त्रपटावरील लेखांनाहि हरताळाचाच लेप द्यावा लागतो. एकट्या कागदावरील ओल्या अक्षरांना मात्र “पुसून” टाकतां येतें. “दोषांचीं लिहिलीं फाडलीं” हेंहि वाक्य असेंच अर्थप्रचुर आहे. ताम्रपट तर मुदलांतच फाडितां येत नाहींत. भूर्जपत्रें व ताडपत्रें उभीं फाडतां येत नसल्यामुळें त्यावरचीं लिखितें फाडून तुकडे करून टाकितां येत नाहींत. फार झालें तर त्यांच्या आडव्या चिरफळ्या करतां येतात. आतां रहातां राहिलें वस्त्रपट. वस्त्रपटांवरील लिखितें फाडतां येतील. परंतु ज्ञानेश्वरींत ग्रंथ, पुस्तक वगैरे शब्द आलेले आहेत; व वस्त्रपटांचे ग्रंथ, किंवा पुस्तकें होणें अशक्य आहे. तेव्हां ज्ञानेश्वरांनीं उल्लेखिलेलीं “लिहिलीं” म्हणजे कागदावरील लिखितें होत ह्यांत संशय नाहीं. शिवाय, वर दिलेल्या उता-यांतील पहिल्या ओवींत, पंतोजी जलदीनें वोळी लिहितो असें विधान केलें आहे. आतां, ताम्रपत्रें, भुर्जपत्रें, ताडपत्रे किंवा वस्त्रपट, ह्यांवर जलदीनें वोळी लिहितां येणार नाहींत हें उघड आहे. तेव्हां जलदीनें लिहितां येणयासारखा ज्ञानेश्वरीला माहीत असलेला जिन्नस म्हटला म्हणजे कागदच होय ह्यांत संशय नाहीं. आतां इतकें खरें आहे कीं ज्ञानेश्वरींत कागद हा शब्द कोठेंहि आलेला नाहीं व येणें शक्यहि नाहीं परंतु कागद ह्मा अर्थी ज्ञानेश्वरानें दुसरा एक शब्द योजिलेला आहे, तो शब्द पाट हा होय,
पाटेयावरिलें आखरें।
जैसीं पुसता येतीं करें।lअध्याय १८, ओवी १०९९.