Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

७. ह्या खंडांत शिवाजीची एकंदर ३६ पत्रें आहेत. त्यांच्यासंबंधानें पहिली विचार करण्यासारखी बाब म्हटली म्हणजे अक्षराची होय. मोडी अक्षर प्रथम इस १२६० पासून १३०९ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य करणा-या महादेव व रामदेव जाधव ह्यांच्या कारकीर्दीत दफ्तरदारीचें काम करणा-या हेमाडपंतानें सुरू केलें, अशी एक फारा दिवसांपासून चालत आलेली ऐतिहासिक कथा आहे; व ही कथा खरी आहे असें पुढील कारणावरून दिसतें. इ. स. १२६० सालापूर्वीचे एकोनएक लेख शिलांवर, ताम्रपटांवर किंवा ताडपत्रांवर लिहिलेले आढळतात. ह्या तिन्ही जिनसांवर प्रत्येक अक्षर हात थांबविल्यावांचून लिहितां येत नाहीं. अर्थात्, एका हातासरशीं दहापांच अक्षरें जलद लिहिण्याची सोय आपल्या ह्या देशांत बाराव्या शतकापर्यंत माहीत होती असें दिसत नाहीं. त्यावेळीं व्यवहारांतील सामान्य पत्रें ताडपत्रांवर, भूर्जपत्रांवर, कातड्यावर व ब-याच वेळां कापडावर लिहून पाठवीत असत असें विधान करण्यास हवा तितका आधार आहे. मजजवळ पर्शराम पंडितानें केलेला भूपालवल्लभनामक ग्रंथाचा सारभूत पर्शरामोपदेश नांवाचा एक यंत्रग्रंथ आहे. त्याच्या परिसमाप्तीचा श्लोक येणेंप्रमाणें­­­:-

श्रीशालिवाहनशकेष्टमुनिद्विचंद्र १२७८।।
संख्ये गते सति च दुर्मुखनाम्नि वर्षे॥
आषाढमाससितयुग्मतिथौ सुरेज्य।
धिष्ठ्ये दिने व्यरचयदि्द्वजपर्शरामः ॥३४॥
ह्या श्लोकावरून पर्शरामोपदेश हा ग्रंथ शक १२७८ त म्हणजे इ. स. १३५६ त लिहिला गेला, असें होतें, ह्या ग्रंथांत प्रथम शक १२४८ पासून म्हणजे इ. स. १३२६ पासून प्रभवादि संवत्सरांची फलें दिली आहेत, व नंतर शेकडों यंत्रांच्या आकृति कशा व कशावर काढाव्या तें सांगितलें आहे.

हरिद्रा तालकशिलामेषमूत्रसमन्चिता।
कोकिकाख्यस्य लेखन्या नीलरक्तपटे लिखेत्॥९६॥
कालेयरोचनाचंद्रैर्लज्जलुगजवारिभिः ।
मदनद्रुलेखन्या यंत्रं भूर्जे लिखेदिदम् ॥१०५॥
रोचनाकुंकुमाभ्यां तु भूर्जपत्रे सुशोमने।
सुवर्णमयलेखन्या पद्मगष्टदलं लिखेत् ॥१३२॥
व्रणहीने भूर्जपत्रे खरवामाश्रवोसृजः ।
वीतांगारेण संयुक्तः कृष्णोन्मत्तरसेन च ॥ १४३॥
विलिखेत्।।१४४॥
आनयेन्निर्व्रणं भूर्ज ग्रंथिहीन सुशोभनं ॥१७०॥
पर्शरामोपदेशे भूपालवल्लभे मंत्रयंत्रप्रकरणम् ॥

हे श्लोक इ. स. १३२६ पासून १३५६ पर्यंतच्या तीस वर्षात केव्हां तरी लिहिले आहेत. इ. स. १३१८ त मुसुलमानांचें राज्य महाराष्ट्रांत सुरूं झालें. १३१८ च्या पूर्वी २५ वर्षे म्हणजे इ. स. १२९३ त अल्लाउद्दिन खिलजीनें यादवांच्या देवगिरीवर पहिली स्वारी केली. १२९३ सनापूर्वी बराबर शंभर वर्षे म्हणजे इ. स. ११९३ त शहाबुद्दिन घोरीनें दिल्लीच्या पृथ्वीराज चव्हाणाला जिंकिलें. इ. स. ११९३ त देवगिरीस म्हणजे महाराष्ट्रांत यादववंशी जैत्रपाळराजा राज्य करीत होता. इ. सन ११९३ पासून १२९३ पर्यंत जैत्रपाळ, सिंघण, कृष्ण, महादेव व रामचंद्र असे पांच राजे देवगिरीस झाले. रामदेव १३०७ व त्याचा मुलगा शंकरदेव १३१२ त वारला. १३१८ त रामचंद्राचा जावई हरपाळ याला सुलतान मुबारिकानें ठार मारिलें व देवगिरी कायमची घेतलीं. त्यानंतर आठ वर्षांनीं पर्शरामपंडितानें आपला पर्शरामोपदेश नांवाचा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथांत भूर्जपत्रें व कापडाचे तुकडे यांवर यंत्रे लिहावीं असें अनेक ठिकाणी म्हटलें आहे.