मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)

ह्या प्रमाणांखेरीज फारशी मोडी अक्षरांवरून मराठी मोडी अक्षर घेतलें ह्याला दुसरें एक प्रमाण आहे. मराठी बाळबोध लिपींत प्रत्येक अक्षर निरनिराळें लिहितात, त्याप्रमाणें, फारशींत नस्ख म्हणून ठळठळीत अक्षर लिहिण्याची जी एक त-हा आहे ती नवशिक्यांनाहि समजण्यासारखी असते. परंतु ती देखील मराठी बाळबोध अक्षरांपेक्षा जास्त मोडलेली असते व तींत अनेक अक्षरें एकाच झटक्यासरशीं एकदम लिहिलीं जातात. तशांत उत्तम फारशी नस्ख अक्षर जातीचेंच मोडी वळणाचें असतें व त्याच्या मानानें शिकस्ता अक्षर तर अतीच मोडलेलें असून त्यांत नुक्त्यांचा बहुतेक लोप झालेला असतो. सारांश, फारशी अक्षरें लिहिण्याची पद्धत ज्यानें एकदां पाहिली त्याला देवनागरी बाळबोध अक्षरें एका झटक्यानें लिहिण्याची क्लृति सुचण्याचा संभव आहे. कागदावर लिहिण्याचा प्रघात पडल्याबरोबर मोडी लिहिण्याचाहि प्रघात महाराष्ट्रांत लवकरच पडला व हा प्रघात पाड-याचें प्रथम श्रेय जाधवांचा दफ्तरदार जो हेमाद्रि त्यास विद्वत्तेच्या व अधिकाराच्या वजनावर सहजासहजीं घेतां आलें. आतां, कागदावर लिहिण्याचा प्रघात महाराष्ट्रांत पडल्यापासून मोडी लिहिण्याची चाल ह्या देशांत सुरू झाली अशी जर वस्तुस्थिति आहे, तर हेमाद्रीनें मोडी लिहिण्याची चाल लंकेहून आणिली अशी जी कथा आहे तींत कितपत अर्थ आहे तें पाहिलें पाहिजे. देवगिरीच्या जाधवांचें साम्राज्य सर्व दक्षिणभर कन्याकुमारीपर्यंत होतें हें प्रसिद्ध आहे. साम्राज्यांतील दफ्तरें तपासण्यास कन्याकुमारी किंवा रामेश्वर ह्या दक्षिणेकडील प्रांतांत जाऊन व कदाचित् लंकेची यात्रा करून परत आल्यावर सर्व दप्तर मोडींत लिहिण्याचा वटहुकूम हेमाद्रीनें काढिला असावा असें दिसतें. लंकेहून परत येण्याला व हा नवा वटहुकूम काढण्याला एकच गांठ पडल्यामुळें, लंकेचा व मोडी अक्षराचा लोकांनीं विनोदानें संबंध जोडून दिला असेल असें वाटतें. बाकी लंकेतील त्यावेळच्या सिंहली भाषेचा व मोडीचा कांहीं संबंध होता ह्याला बिलकुल प्रमाण नाहीं. सिंहली भाषेंत मोडीचा प्रचार अद्यापहि नाहीं व पूर्वीहि नव्हता. अर्थात् मोडीचा प्रघात फारशी लिपी व फारशी कागद ह्या्च्या आगमनाने् पडला ह्या्त फारसा संशय नाहीं. तशांत मोडी म्हणजे देवनागरी लिपीहून भिन्न अशा तामीळ, तेलगु, कानडी किंवा सिंहली अक्षरमालिकेपासून घेतलेली आहे असाहि प्रकार नाहीं. मोडी अक्षर देवनागरी अक्षरें मोडून तयार केलेलें आहे, हें चारपांचशें वर्षांची जुनीं पत्रे व महजर पाहिले म्हणजे स्पष्ट दिसून येतें. मजजवळ इ. स. १४१६ पासून आतांपर्यंतचे अनेक जुने मोडी लेख आहेत. इ. स. १२५० पासून १४१६ पर्यंतचा मात्र एकहि मोडी लेख अद्यापयर्पंत उपलब्ध झाला नाहीं. १४१६ च्या पुढील कागदपत्रांवरील मोडी अक्षर देवनागरी अक्षराशीं ताडून पाहतां, देवनागरी बालबोध अक्षरें एका झटक्यासरशीं लिहिल्यानें मोडी अक्षर सिद्ध होतें हें नामी कळतें. प्रायः देवनागरी बाळबोध प्रत्येक अक्षर दोन तीनदां हात थांबविल्यावांचून लिहितांच येत नाहीं. उदाहरणार्थ, अ, इ, उ, क वगैरे पाहिजे तें अक्षर घ्या. अ ला चारदां, इ ला दोनदां, उ ला दोनदां, क ला तीनदां किंवा चारदां हात थांबवावा लागतो. हींच अक्षरे हात न थांबवितां लिहिलीं म्हणजे त्यांचीं मोडीं रूपें सिद्ध झालीं. आतां जसजशी मोडी पद्धति जास्त प्रचारांत आली व तिचा दरबारांत जास्त प्रवेश झाला, तसतसें मोडी अक्षर जास्त वळणदार, डौलदार, सफाईदार झालें, हें उघड आहे. ज्यांनीं मोडी अक्षराच्या ऐतिहासिक परंपरेकडे लक्ष्य दिलें नाहीं त्यांना मोडींतील कित्येक अक्षरें देवनागरी अक्षरांपासून निघाली हें विधान बराच विचार केल्यावांचून व माहिती मिळविल्यांवाचून खरेंहि वाटणार नाहीं इतका मूळ देवनागरी अक्षरांत व त्यांच्या डौलदार व भपकेदार मोडींत फरक झालेला आहे. उदाहरणार्थ, प्रस्तुतचें मोडी सा हें अक्षर घ्या. ह्याला वरची पोकळ गांठ व मधलें गरगरीत ढेर कोठून आलें हें वरवर पाहणा-याला सांगतां येणार नाहीं. परंतु इ. स. १४१६ पासून आतांपर्यंतच्या मोडी लेखांत सा ह्या अक्षराची मोडी परंपरा कशी होत आली आहे, हें पाहिलें म्हणजे सध्याचा हा पोकळ गांठीचा व ढेरपोट्या सा मूळ देवनागरी साचेंच रूपांतर किंवा वेषांतर आहे, हें ओळखतां येतें. प्रथम, सा मधील रचें खालचें शेपूट व र आणि त्याचा पहिला काना ह्यांजमधील आडवी रेघ एकदम लिहूं लागले. त्यामुळें, खालच्या शेपटाला व आडव्या रेघेला जोडणारी एक अर्धकंसाकार वक्र रेषा प्रथम नव्यानें उपयोगांत आली. इ. स. १४१६ पासून १५५० पर्यंतच्या लेखांत हा जोड नुसता साधा वक्र आहे.