Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड चौथा ( १८ वे शतक)

ह्या सात बखरींचें स्वरूपवर्णन स्थूलमानानें वर दिल्याप्रमाणें आहे. ह्या सर्व बखरी आपापल्या परीनें उपयोगाच्या आहेतच. परंतु त्यांतल्या त्यांत सभासदी बखर, मल्हार रामरावकृत चरित्र व शिवदिग्विजय ह्या तीन बखरी फार महत्त्वाच्या आहेत. इतर बखरींप्रमाणें ह्याहि बखरींतून कालविपर्यास, प्रसंगलोप, नायकाच्या महताचें अज्ञान, संगतवार व तपशीलवार माहितीचा अभाव, वगैरे दोष सडकून आहेत. अशी जरी ह्या बखरीची स्थिति आहे, तत्रापि त्यांचा उपयोग जितका होईल तितका करून घेतला पाहिजे. बखरी लिहिणारे गृहस्थ समजूतदार असून शिवाजीच्या पराक्रमांचें वर्णन करावें अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. आपण जें कांहीं लिहींत आहों, तें जाणूनबुजून खोटें लिहीत नाहीं, अशी त्यांची पक्की खात्री होती. असंबद्ध, परस्परविरुद्ध, संदिग्ध किंवा सध्यांच्या कालीं अविश्वसनीय भासणारीं विधानें त्यांच्या बखरींतून सांपडतात, तीं त्यांनीं मुद्दाम लिहून ठेविलीं असा प्रकार नाहीं. तेव्हां असलीं विधानें जेथें जेथें भेटतील तेथें तेथें तत्कालीन समजुतीकडे, लिहिणा-यांच्या शास्त्रीय ज्ञानाच्या अभावाकडे व त्यांच्या प्रामाणिकपणाकडे लक्ष देऊन त्या विधानांतील अर्थाचा स्फोट करण्याकडे लक्ष दिलें पाहिजे. सकृद्दर्शनीं सदोष वाटणा-या प्रत्येक वाक्याची व शब्दाची अर्थपरिस्फुटता केल्याशिवाय पुढें जातां कामा नये. आपले विचार नीट रीतीनें व्यक्त करण्याच्या कठिण कलेचा अभ्यास ह्या बखरनविसांनीं केला नसल्यामुळें, त्यांचें लिहिणें आपल्याला परस्परविरोधी व संदिग्ध वाटण्याचा संभव आहे. हीहि गोष्ट लक्षांत ठेवणें जरूर आहे. ह्या बखरकारांनीं केलेलीं कांहीं कांहीं विधानें तर केवळ असंभाव्यहि वाटण्याचा संभव आहे. तेव्हां ह्या सकृद्दर्शनीं दुष्ट भासणा-या विधानांचा मुळापर्यंत छडा लाविल्यावांचून त्यांची ग्राह्याग्राह्मता ठरविणें, अशास्त्र झाल्याविना राहणार नाहीं. ह्या गोष्टी लक्षांत ठेऊनच ह्या बखरींची परीक्षा मी करणार आहें. परंतु परीक्षेला प्रारंभ करण्यापूर्वी दुस-या एका गोष्टीचा उल्लेख करणें येथें इष्ट आहे. ह्या बखरींमधून आढळणारा संदिग्धपणा व परस्परविरोध सर्वस्वी बखरनाविसांच्या माथ्यावरच मारणें योग्य होणार नाहीं. ह्या दोषांचा वाटा अंशतः ह्या बखरी छापून प्रसिद्ध करणा-या संपादकांच्याहि पदरी पडतो हेंहि लक्षांत घेतलें पाहिजे. जुन्या लेखांतील मजकूर निरनिराळी पाठांतरें देऊन व शास्त्ररीत्या शुद्ध करून छापलेला असा माझ्या पहाण्यांत फारच थोडा आलेला आहे. जुन्या बखरींच्या मूळ प्रती शोधून काढून त्या छापण्याचा प्रयत्न बहुतेक झालाच नाहीं म्हटले तरी चालेल. हातीं येतील तीं तीं बाडें दुस-या तिस-यांदा नक्कल केलेलीं, अर्थात् दुष्ट झालेलीं अशींच, छापिलीं गेलीं आहेत. मिळालीं तींच बाडें महत्प्रयासानें मिळालीं, ही सबब ह्या आक्षेपावर आणितां येईल. परंतु ती काढून टाकितां आली नसतीच असें नाहीं. बखरींच्या ह्या हस्तोहस्तीं झालेल्या नकलांतून असणा-या संदिग्ध व दुर्बोध स्थलांचा छडा लावून अर्थ केलेलाहि फारच थोड्या ठिकाणीं पाहण्यांत येतो. बहुशः अशीं स्थलें टाकून दिलेलींच फार आढळतील. कित्येक ठिकाणीं दुर्बोधपणा केवळ मोडी वाचण्याचा नीट प्रयत्न न केल्यामुळें झालेला आहे. सारांश, संपादकांच्या हयगयीमुळें, अज्ञानामुळें व शिक्षणाभावामुळें जेवढा म्हणून दुर्बोधपणा ह्या बखरींतून आलेला असेल, तेवढा वगळून बाकी राहिलेल्या दोषांची जबाबदारी सर्वस्वीं ह्या बखरनविसांच्या माथीं मारणें न्याय्य होईल. आजपर्यंत मराठींत जुने गद्य व पद्य ग्रंथ जितके म्हणून छापले गेले आहेत, त्यांत सशास्त्र रीतीनें छापलेले असे ग्रंथ फारच विरळा आहेत. रा. शंकर पांडुरंग पंडित ह्यांनीं शके १७९१ त छापलेली तुकारामाची गाथा, त्यांच्या त्यावेळच्या माहितीप्रमाणें, सशास्त्र तयार केलेली आहे. अलीकडे इतकी जाडी विद्वत्ता जुने ग्रंथ प्रकाशित करण्याच्या कामीं उपयोजिलेली माझ्या पाहण्यांत नाहीं. रा. मोडक व रा. ओक ह्यांच्या काव्यसंग्रहाचाहि ह्या बाबतींत पंडितांच्या गाथेच्या खालींच नंबर लागतो. जुन्या गद्य ग्रंथांच्या म्हणजे बखरींच्या प्रकाशनाच्या कामीं जो अव्यवस्थितपणा दृष्टोत्पत्तीस येतो, तो तर सांगतां पुरवत नाहीं. खरें म्हटलें असतां, जुन्या बखरी छापण्यांत वैदिक लोकांचा वेदपठणाच्या कामीं दिसून येणारा निष्ठुर शुद्धपणा अनुकरणें अत्यंत अवश्य आहे. आपल्या राष्ट्राच्या, समाजाच्या व महापुरुषांच्या जीवनचरित्राचीं साधनें प्रकाशित करण्यांत शुद्धपणाकडे जितकें लक्ष द्यावें तितकें थोडेंच होणार आहे.